Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 24 March 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २४ मार्च २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
जागतिक क्षयरोग निर्मूलन दिवस आज पाळण्यात येत आहे. क्षयरोगामुळे आरोग्यावर होणारे विनाशकारी परिणाम आणि त्यामधून उद्भवणार्या सामाजिक आणि आर्थिक समस्या यांच्याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी, त्याचबरोबर या जागतिक पातळीवर गंभीर ठरलेल्या साथीच्या रोगाचं निर्मूलन करण्याच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी हा दिवस पाळला जातो. १८८२ मध्ये याच दिवशी डॉ. रॉबर्ट कोच यांनी क्षयरोग अर्थात टीबी च्या जीवाणूंचा शोध लावला होता. ‘होय आपण क्षयरोगाचा नायनाट करू शकतो; वचनबद्धता, गुंतवणूक आणि परिणामी प्रयत्न’ अशी यंदाच्या क्षयरोग दिवाची संकल्पना आहे.
भारत सरकारने क्षयरोगाचं उच्चाटन करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं प्रकाशित केलेल्या अहवालानुसार भारतात क्षयरोगाच्या संसर्ग दरात १७ पूर्णांक सात दशांश टक्के घट झाली आहे.
****
जम्मू काश्मीरच्या पूंछ इथंल्या जंगल क्षेत्रात सुरक्षा दलांनी दहशतवादी तळ शोधून, हल्ल्याचा कट उधळून लावला. याठिकाणाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आयोजित केलेल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट समिट - वेव्ह्ज अंतर्गत, वेव्ह्ज यंग फिल्ममेकर स्पर्धेसाठी देशभरातून तेराशेपेक्षा जास्त स्पर्धकांनी नाव नोंदणी केली आहे. यातल्या वीस स्पर्धकांची अंतिम यादीत निवड झाली आहे. अमोल गुप्ते आणि चैतन्य चिंचलीकर यांचं मार्गदर्शन तसंच व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनलची मदत या स्पर्धकांना मिळाली. व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनलमध्ये मार्गदर्शन तसंच प्रशिक्षण दिलं जातं.
****
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा विकास करण्यासाठी राज्य सरकारनं ५०० कोटी रुपयांचा निधी दोन टप्प्यात द्यावा, अशी मागणी, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगर इथं पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयात सेंटर ऑफ एक्सलंस लर्निंगचं उद्घाटन करताना ते बोलत होते. पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा विस्तार करून वैद्यकीय महाविद्यालय, परिचर्या महाविद्यालय, वसतिगृह आदी उपक्रम, तसंच महाविद्यालयांच्या जुन्या इमारतींचं नूतनीकरण करण्यासाठी हा निधी दोन टप्प्यात द्यावा, असं ते म्हणाले.
****
राज्यातल्या नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त पुण्यात गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट महाअधिवेशन तसंच प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक बाळासाहेब अनासकर उपस्थित होते.
****
महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी राज्यात ५० उमेद मॉल उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं. अहिल्यानगर जिल्ह्यात अकोले इथं काल उमेद अभियानाअंतर्गत 'कळसुआई' महिला बचतगटांच्या वस्तू विक्री आणि प्रदर्शन महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. नागपूर शहरातल्या ३० हजार महिलांनी या योजनेच्या मदतीने पतसंस्था स्थापन केली असून, आज तिच्यात ३५ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. या धर्तीवर इतरही जिल्ह्यात महिलांनी एकत्र येऊन पतसंस्था सुरू कराव्यात, असं आवाहन तटकरे यांनी केलं.
****
गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातल्या मुरूमगाव, पेंढरी आणि रांगी गावासाठी गावकऱ्यांच्या मागणीनुसार राज्य परिवहन महामंडळाने बस फेऱ्या सुरू केल्या आहेत. अशा अतिदुर्गम भागात गावकऱ्यांची सोय या बसफेऱ्यांमुळे झाली असून, ही बस त्यांच्यासाठी आनंदाची बस ठरली आहे.
****
आगामी येणाऱ्या सणानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात शांतता प्रस्थापित व्हावी तसंच सर्व धर्मियांना आपापले सण उत्सव साजरे करता यावे, यासाठी उद्या २५ तारखेपासून आठ एप्रिल पर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरचे पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी काल याबाबतचे आदेश जारी केले.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, सीएसएन फर्स्ट आणि पूर्णम ईकोव्हिजन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बेस्ट आऊट ऑफ ई-वेस्ट’ या आंतरशालेय स्पर्धेची अंतिम फेरी काल पार पडली. यानिमित्त ३३ शाळांच्या १५० नाविन्यपूर्ण प्रकल्पांचं भव्य प्रदर्शनही भरवण्यात आलं होतं. सीएसएन फर्स्टचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी यावेळी बोलताना, ई- कचऱ्याचा पुनर्वापर करणं काळाची गरज असल्याचं मत व्यक्त केलं.
****
नवी दिल्लीत सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत कालचा तिसरा दिवस महाराष्ट्रासाठी सुवर्णमय ठरला. तीरंदाजीमध्ये मुंबईच्या आदिल अन्सारीने, नेमबाजीत मिश्र दहा मीटर एअर रायफल प्रोन एसएच वन प्रकारात लातूरच्या सागर कातळेनं, तर ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत नाशिकच्या दिलीप गावितने सुवर्ण पदकाची कमाई केली.
****
No comments:
Post a Comment