Tuesday, 25 March 2025

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २५ मार्च २०२५ सकाळी ११.०० वाजता.

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 25 March 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २५ मार्च २०२५ सकाळी ११.०० वाजता.

****

छत्तीसगढ मधल्या दंतेवाडा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी मारले गेले. चकमकीच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात शास्त्रसाठा जप्त करण्यात आला. दंतेवाडा आणि बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलाकडून शोधमोहिम राबवण्यात येत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. 

****

मेक इन इंडिया सुरु झाल्यापासून २०२३-२४ या वर्षात भारतानं एक लाख २७ हजार कोटी रुपये किंमतीच्या संरक्षण सामग्रीचं उत्पादन केलं असून, स्वदेशी संरक्षण उत्पादनाचा हा आजवरचा उच्चांक आहे. स्वदेशी संरक्षण उत्पादनाच्या मूल्यात २०१४-१५ मधल्या ४६ हजार ४२९ कोटीवरुन १७४ टक्क्यांची वाढ झाली असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. 

****

देशातल्या उच्च शिक्षण संस्थांमधल्या विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्याकरता त्यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष पुरवण्यासाठी राष्ट्रीय कृती दलाची स्थापना करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. आय आय टी दिल्लीच्या दोन विद्यार्थ्यांनी कथित मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर त्यांच्या पालकांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाच्या खंडपीठाने हे निर्देश दिले. या कृती दलाने देशभरातल्या शिक्षण संस्थांना भेटी देऊन येत्या चार महिन्यांत अंतरिम अहवाल सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३० तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा १२०वा भाग असेल. 

****

मुंबईत येत्या एक ते चार मे दरम्यान होणाऱ्या वेव्ह्ज या शिखर परिषदेच्या निमित्ताने वेव्ज बाजार हा कायमस्वरूपी ऑनलाईन मंच सुरु करण्यात येणार असून, देशातल्या आशय निर्मात्यांसाठी जागतिक स्तरावर आदानप्रदान करण सोपं होणार आहे. क्रिएट इन इंडिया उपक्रमाचा भाग असणाऱ्या वेव्ह्ज २०२५ अंतर्गत नागपूरमध्ये वेव्ह्ज ॲनिमे आणि मँगा अर्थात व्हॅम स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

****

कोयना प्रकल्पाचा अंतर्भाव कृष्णा खोरे विकास महामंडळात करण्याबाबतची तरतूद असणारं महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ सुधारणा विधेयक काल विधान परिषदेत मंजूर झालं. महामार्गांचं संरेखन झाल्यानंतर भूसंपादनासाठीच्या एका वर्षाचा कालावधी वाढवून दोन वर्षांचा करण्यासाठीचं महाराष्ट्र महामार्ग सुधारणा विधेयक, तसंच महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक देखील सभागृहानं मंजूर केलं. ऑनलाइन शुल्क भरून आता ई -मुद्रांक प्रमाणपत्र घरबसल्या मिळवता येईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.

****

राज्याचं शालेय शिक्षण धोरण राबवताना मराठी भाषेचा सन्मान आणि स्थान अधिक उंचावण्यावर कटाक्षाने भर देण्यात येईल, अशी ग्वाही, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काल विधानसभेत दिली. या संदर्भात झालेल्या अल्पकालीन चर्चेला ते उत्तर देत होते. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवताना महाराष्ट्राच्या उज्ज्वल शैक्षणिक परंपरेला आधुनिक शिक्षण प्रणालीशी जोडण्याचा संकल्प असल्याचं भुसे यांनी सांगितलं. 

****

एसटी महामंडळातल्या तीन वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच मुख्यालयात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची तातडीनं इतर ठिकाणी बदली करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत ते काल मुंबईत बोलत होते. यावेळी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. 

****

राज्यात आतापर्यंत ७६ लाख ३९ हजार ८५२ शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आला आहे. यात अहिल्यानगर जिल्ह्यानं आघाडी घेत पाच लाखांचा टप्पा ओलांडला आहे. नाशिक जिल्हा चार लाख ५० हजार ६४० ओळख क्रमांक देऊन दुसऱ्या क्रमांकावर, तर पुणे जिल्हा चार लाख ३४ हजार ६३२ शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देऊन तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

****

राज्याच्या विविध भागात उष्णतेची तीव्रता वाढत असून उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागानं नागरिकांना खबरदारीचा इशारा दिला आहे. आरोग्य विभागानं सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये उष्णतेशी संबंधित समस्यांवर उपचार करण्यासाठी विशेष कक्ष सुरू केले आहेत. सर्व जिल्हा आणि महापालिका स्तरांवरील साथरोग वैद्यकीय अधिकाऱ्यांना उष्माघात विषयक प्रशिक्षण देण्यात आलं आहे. राज्यात २१ मार्चपर्यंत उष्माघाताचे २१ रुग्ण आढळून आले आहेत. 

****

नागपूर इथं झालेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या राज्यस्तरीय स्पर्धेत लातूरच्या खेळाडूंनी १८ पदकं पटकावली. या स्पर्धेत जिल्ह्यातल्या जवळपास १५ दिव्यांग विशेष शाळांमधल्या ६० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.

****

नवी दिल्लीत जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा गेम्समधे आज पाचव्या दिवशी पॉवरलिफ्टर्स आणि नेमबाजांनी उल्लेखनीय कामगिरी केली. सुमन देवींनी ५५ किलो वजनी गटात, पुरूष ५९ किलो वजनी गटात गुलफाम अहमदने, सीमा राणीने ६१ किलो वजनी गटात, जॉबी मॅथ्यूने ६५ किलो वजनी गटात, तर नेमबाज निहाल सिंगने मिश्र २५ मीटर पिस्तूल एसएच१ प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. 

****


No comments: