Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 09 March 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ मार्च २०२५ दुपारी १.०० वा.
****
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं
दुसरं सत्र उद्यापासून सुरू होत आहे. यामध्ये २०२५-२६ च्या अनुदान मागण्या आणि संबंधित
विनियोग विधेयकावर चर्चा आणि मतदान होईल. या काळात एकंदर वीस बैठका नियोजित आहेत तसंच, बँकिंग कायदे-सुधारणा विधेयक,
किनारी जहाज वाहतूक-कोस्टल शिपिंग विधेयक आणि रेल्वे सुधारणा विधेयक
यासह अनेक विधेयकांवर या सत्रामध्ये मंजूरीसाठी चर्चा होईल. येत्या ४ एप्रिलपर्यंत
हे सत्र सुरु असणार आहे.
****
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना प्रकृती
अस्वास्थ्यामुळं आज पहाटे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अस्वस्थता
आणि छातीत त्रास होत असल्यानं ७३ वर्षीय धनखड यांच्यावर हृदयरोग विभागात तज्ज्ञ डॉक्टरांचं
पथक उपचार करत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
****
नागपूरच्या मिहान विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये
आज सकाळी केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितिन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या उपस्थितीत पतंजली मेगा फूड आणि हर्बल पार्कचं उद्घघाटन करण्यात आलं.
संत्र प्रक्रीया उद्योगाशी संबंधित अशिया खंडातील सर्वात मोठं केंद्र म्हणून हे केंद्र
असल्याचं वृत्त आहे. ज्यामुळे विदर्भात पिकवल्या जाणाऱ्या संत्र्यांची एका दिवशी जवळपास आठशे
टन फळांवर अशाप्रकारे प्रक्रिया केली जाऊ शकते. याद्वारे स्थानिक
शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे.
****
देशात दर आठ मिनिटांना एका महिलेचा
गर्भाशय कर्करोगानं मृत्यू होत असून हे थांबवण्यासाठी ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस-एचपीव्ही
प्रतिबंधक लस ही माता, मुली
बहिणींसाठी कवचकुंडले आहेत असं प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी
केलं.
कोल्हापूर इथं औद्योगिक सामाजिक
जबाबदारी- सीएसआर अंतर्गत हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीनं काल संपूर्ण जिल्ह्यातील
९ वर्षे पूर्ण झालेल्या मुली ते २६ वर्षापर्यंतच्या आणि त्यापुढील अविवाहित महिलांसाठी
एचपीव्ही लसीकरणाचं आयोजन करण्यात आलं. या लसीकरण शुभारंभ कार्यक्रमात वैद्यकीय शिक्षण
मंत्री हसन मुश्रीफ बोलत होते.
एचपीव्ही लस घेतलेल्या मुलींना कोणताही
त्रास होत नाही. जागतिक आरोग्य संघटनेनं या संदर्भात सुरक्षित लस म्हणून मान्यता दिलेली
आहे. यामुळं न घाबरता गर्भाशय कर्करोग टाळण्यासाठी ही लस घ्यावी, असं ते म्हणाले.
****
भंडारा जिल्ह्याच्या लाखनीनजीक राष्ट्रीय
महामार्गावर मौजे गडेगाव शिवारात जनावरांची अवैध वाहतूक करणारी मालवाहू जीप पोलिसांनी
ताब्यात घेत १३ गोवंशाची सुटका केली. महामार्गावर गस्तीवर असणाऱ्या पोलिसांच्या पथकानं
संशयाच्या आधारे पाठलाग करुन हे वाहन थांबवलं. त्यावेळी या वाहनात अवैधरित्या दाटीवाटीनं
कोंबून कत्तलीच्या हेतुनं जनावरं नेण्यात येत असल्याचं आढळलं. याप्रक्ररणी वाहन चालकाला
ताब्यात घेण्यात आलं असून पोलिसांनी सुमारे साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
पीएच. डी. संशोधन कार्य करणाऱ्या
इतर मागास वर्गातील विद्यार्थ्यांना संशोधन प्रगती अहवाल प्राप्त होताच त्यांच्या तपासणीनंतर, अधिछात्रवृत्तीची रक्कम अदा करण्याची
कार्यवाही करण्यात येत आहे, त्यामुळे निधी वितरणाबाबत विद्यार्थ्यांनी
संभ्रम बाळगू नये, असं आवाहन महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि
प्रशिक्षण संस्था- महाज्योतीतर्फे करण्यात आलं आहे.
आतापर्यंत २५ जुलै, २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीतील
संशोधन अहवाल सादर केलेल्या ४१४ विद्यार्थ्यांना निधी वितरीत झालेला आहे. पात्र संशोधक
विद्यार्थ्यांना नोंदणी तारखेपासून शंभर टक्के दरानं सरसकट अधिछात्रवृत्ती अदा करण्यासाठी
अंदाजित एकूण सव्वाशे कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी लागणार असून महाज्योती कार्यालयानं
या निधीची मागणी ही पूरक मागणीद्वारे शासनाकडे केलेली आहे.
****
येत्या दोन दिवसांत कोकण, गोवा, सौराष्ट्र
आणि कच्छमध्ये उष्णतेच्या लाटेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने
वर्तवली आहे. गुजरात, कर्नाटक किनारी, केरळ
आणि माहे इथे काही ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थितीचा अंदाज आहे.
****
आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट
स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात लढत होणार
आहे. दुपारी अडीच वाजता दुबई इथं सामन्याला सुरुवात होईल. चुरशीच्या या सामन्यात कोण
बाजी मारणार याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलं आहे. चॅम्पियन्स करंडक चषक पटकावण्यासाठी
भारतीय संघ पूर्ण
कौशल्य पणाला लावण्यासाठी सज्ज झालेला आहे.
या स्पर्धेत आतापर्यंत भारतानं एकही सामना गमावलेला नाही. मात्र, चिवट खेळ करत क्षेत्ररक्षणातही तितकीच सरस भूमिका बजावणाऱ्या न्युझीलंडचा संघही
विजयासाठी आतूर आहे.
****
भारतीय महिला कबड्डीपटूंनी आशिया
करंडक पाचव्यांदा जिंकला आहे. इराणमध्ये तेहरान इथं सहाव्या आशिया महिला कबड्डी अजिंक्यपदाच्या
सामन्यात त्यांनी काल यजमान इराणचा ३२-२५ अशा गुणांनी पराभव केला. या संपूर्ण स्पर्धेत
भारतीय महिला संघ अजिंक्य राहिला आहे.
****
भारताच्या सिद्धांत बांथिया आणि
त्याचा बल्गेरियन सहकारी अलेक्झांडर डोन्स्की यांनी एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेचं
दुहेरी गटातील विजेतेपद पटकावलं. रवांडाची राजधानी किगाली इथं हा सामना खेळला गेला.
बांथिया आणि डोन्स्की या जोडीनं
फ्रान्सचा जेफ्री ब्लँकेनॉक्स आणि चेक प्रजासत्ताकचा झ्डेनेक कोलार या जोडीनं दोन विरुद्ध
एक असा पराभव करत ही स्पर्धा जिंकली. आज एकेरी सामन्यानंतर या स्पर्धेचा समारोप होणार
आहे.
****
No comments:
Post a Comment