Thursday, 29 March 2018

AIR News Bulletin, Aurangabad 29.03.2018....17.25

Text - AIR News Bulletin, Aurangabad 29.03.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 March 2018

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ मार्च २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

जनलोकपाल लागू करण्याच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरु केलेलं उपोषण मागे घेण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अण्णांची भेट घेतल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं. यावेळी अण्णांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं आज जी-सॅट सहा-ए या दळणवळण उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं. संध्याकाळी चार वाजून ५६ मिनिटांनी आंध्र प्रदेशातल्या श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन जीएसएलव्ही एफ झिरो एट या प्रक्षेपकातून हा उपग्रह अवकाशात झेपावला. हा उच्च शक्तीचा एस बँड दळणवळण उपग्रह असून, तो दहा वर्षं काम करेल.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा प्रकार दुर्दैवी असून, यात सहभागी असलेल्यांना योग्य ती शिक्षा केली जाईल, असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलत होते. सीबीएसईनं दहावीचा गणित विषय तसंच बारावीच्या अर्थशास्त्र या विषयाची पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला असून, येत्या सोमवारी किंवा मंगळवारी ही परिक्षा होणार आहे. या प्रकरणी आतापर्यंत १८ विद्यार्थ्यांसह २५ जणांची चौकशी केल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितलं.   

दरम्यान, जावडेकर आणि सीबीएसईच्या अध्यक्ष अनिता कारवाल यांना निलंबित करण्याची आणि न्यायालयीन चौकशीची मागणी काँग्रेसनं केली आहे.

****

राज्यात लोकसहभागातून ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला असून, हरित महाराष्ट्राच्या चळवळीत सहभागी होण्यासाठी राज्यभरात ४६ लाख लोकांची हरित सेना सज्ज झाली आहे. यामध्ये सर्वाधिक चार लाख ६६ हजार एकशे सदुसष्ट इतकी नोंदणी लातूर जिल्ह्यात झाली असून, त्यापाठोपाठ उस्मानाबाद, बीड, नाशिक, यवतमाळ या जिल्ह्यातही हरित सेनेसाठी मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली आहे.

****

जैन धर्माचे २४वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती आज सर्वत्र भक्तिभावात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. औरंगाबाद इथं यानिमित्त पैठणगेट परिसरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. बाबा पेट्रोल पंप परिसरातील भगवान महावीर चौकात ध्वजारोहणही करण्यात आलं.

****

औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळावर भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे आज १०० फूट उंचावर राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे पश्चिम क्षेत्राचे कार्यकारी संचालक केशव शर्मा यांच्या हस्ते आज या ध्वजाचं लोकार्पण झालं. यावेळी विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, विमानतळाचे निदेशक डी.जी.साळवे उपस्थित होते. देशातल्या १२० विमानतळापैकी २९ विमानतळांची शंभर फूट उंच राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी निवड केली होती, त्यामध्ये औरंगाबाद विमानतळाचा समावेश करण्यात आला होता.

****

शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणं ही प्रशासनासोबतच अधिकाऱ्यांचीही नैतिक जबाबदारी असल्याचं लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटलं आहे. लातूर इथं आज रमाई घरकुल योजनेअंतर्गत ६४८ लाभार्थ्यांना निलंगेकर यांच्या हस्ते धनादेशाचं वाटप करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. लातूर जिल्ह्यातला एकही लाभार्थी या योजनेतून वंचित राहू नये, याची महानगरपालिकेनं दक्षता घ्यावी, असं ते म्हणाले.

****

नगर जिल्ह्यात पोलिसांनी आज गो-तस्करांवर कारवाई केली असून, विविध कत्तलखान्यांवर छापे मारत ५० गायी, बैलांची सुटका केली, तर दोन हजार किलोपेक्षा अधिक गोमांस जप्त केलं. अजूनही ही कारवाई सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

येत्या दोन एप्रिल पासून जबलपूर ते सिकंदराबाद दरम्यान उन्हाळी विशेष रेल्वेगाडी सुरू करण्यात आली आहे. ही गाडी जबलपूर इथून दर सोमवारी रात्री आठ वाजता निघणार असून अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड मार्गे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सात वाजता सिकंदराबादला पोहोचेल. तर, परतीच्या प्रवासात ही रेल्वेगाडी सिकंदराबाद इथून दर मंगळवारी रात्री साडेआठ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी जबलपूरला पोहोचेल.

****

महिलांच्या ट्वेंटी ट्वेंटी तिरंगी क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईत झालेल्या सामन्यात भारतानं इंग्लंडचा आठ गडी राखून पराभव केला. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र त्यांचा डाव १०७ धावांवर संपुष्टात आला. भारतानं हे लक्ष्य १६व्या षटकातच पूर्ण केलं.

****

राज्यात आज सर्वात जास्त ४२ अंश सेल्सिअस तापमान परभणी इथं नोंदवलं गेलं. उस्मानाबाद आणि नांदेड सरासरी ४०, तर औरंगाबाद इथं ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

****

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.03.2018_13.00.

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.03.2018 13.00


 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 March 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९  मार्च २०१८ दुपारी १.०० वा.

****



राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकात सुधारणा करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. यामुळे वादग्रस्त ब्रिज अभ्यासक्रम हटवण्यात आला आहे. या अभ्याक्रमामुळे पर्यायी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांना अ‍ॅलोपॅथी उपचार पद्धती वापरण्याची मुभा देण्यात आली होती. अपात्र व्यावसायिकांना कडक शिक्षेची तरतूद या विधेयकात आहे. एम बी बी एस अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाची परीक्षा देशभरात समान पातळीवर घेण्याचा निर्णयही या बैठकीत झाला.

 सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, शिक्षक शिक्षण या तीन योजना एकत्रित करुन शालेय शिक्षणासाठी सर्वंकष योजना तयार करण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला आर्थिक व्यवहार विषयक केंद्रीय समितीनं मंजुरी दिली आहे. ही योजना एक एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०२० या कालावधीसाठी असून, यासाठी अंदाजे ७५ हजार कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.

 शैक्षणिक कर्ज योजनेसाठी कर्ज हमी निधीलाही समितीनं मंजुरी दिली आहे. केंद्रीय कर्ज अनुदान योजनेत बदल करण्यात आला असून, २०१७-१८ ते २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी सहा हजार ६०० कोटी रुपयांचा खर्च निश्चित करण्यात आला आहे.

****



 चालू आर्थिक वर्षात सरकारनं सार्वजनिक अंगिकृत उपक्रमांमधली गुंतवणूक काढून घेत एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळवली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ट्विटरवर ही माहिती दिली. गेल्या वर्षी सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांचे समभाग विकून ४६ हजार २५० कोटी रुपये मिळाले होते, त्यापेक्षा ही रक्कम मोठी आहे. निर्गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागानं आतापर्यंत यंदाचं लक्ष्य पार केलं असून, समभाग विक्रीतून एक लाख ५६ कोटी रुपये उभे केले असल्याचं जेटली यांनी सांगितलं.

****



 नीति आयोगानं ११५ महत्वाकांक्षी जिल्ह्यांसाठी आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कृषी आणि जलसंपदा, आर्थिक समावेशकता आणि कौशल्य विकासासह पाच क्षेत्रांमधील ४९ निर्देशांकांवर आधारित बेसलाईन क्रमवारी सुरु केली आहे. देशातल्या अतिमागास जिल्ह्यांचं जलद आणि प्रभावीपणे परिवर्तन घडवून आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी महिन्यात ‘महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांचं परिवर्तन’ हा कार्यक्रम सुरु केला होता.

****



 स्मार्ट इंडिया हॅकथॉन २०१८ ची अंतिम फेरी उद्या आणि परवा देशभरातल्या २८ केंद्रांवर होणार आहे. याअंतर्गत विद्यार्थी देशाचा कायापालट करण्यासाठी योगदान देऊ शकतील, अशा आपल्या नव्या कल्पनांचा आविष्कार करतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तरुण विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि उर्जेला आकार देण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा हा उपक्रम आहे.

****

 भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रो आज जी- सॅट सहा ए हा दळणवळण उपग्रह अवकाशात सोडणार आहे. आज संध्याकाळी चार वाजून ५६ मिनिटांनी आंध्र प्रदेशातल्या श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन हे प्रक्षेपण केलं जाईल. हा उच्च शक्तीचा एस बँड दळणवळण उपग्रह असून, तो दहा वर्षं काम करेल.

****

 मराठी भाषा भवन मुंबईत उभारण्याचा निर्णय कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यासंदर्भात लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत दिली. पहिली ते बारावी पर्यंत मराठी भाषा सक्तीची करावी या मागणी संदर्भात विचार करण्यात येईल, असंही तावडे यांनी सांगितलं.

****



 पालघर जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य या विविध पदांवर निवडून आलेल्या उमेदवारांबाबत ग्रामपंचायत अधिनियमातील विविध कलमांचा भंग केल्यानं त्यांना अपात्र ठरवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर सुनावणी झाली. यात पाम चे माजी उपसरपंच कृणाल पिंपळे, तळासरीचे ग्रामपंचायत सदस्य संतोष रांधे, टेणचे धर्मेश दळवी आणि वाढवणच्या हेमा पागी यांना तीन अपत्य असल्यानं त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे.

****



 वाशिम जिल्ह्यात नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया येत्या ३१ मार्चपूर्वी करण्याचे निर्देश शासनानं स्थानिक पातळीवरील प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत. वाशिम जिल्ह्यातल्या ५४ गावांमधून जात असलेल्या या समृद्धी महामार्गासाठी एकूण ९८८ पूर्णांक २५ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे.

****



 दक्षिण आफ्रिकेत चेंडूशी छेडछाड केल्याबद्दल ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळानं स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एका वर्षाची आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची बंदी घातली आहे. तर या वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट याला नऊ महिन्यांसाठी निलंबित केलं आहे.

*****

***

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.03.2018_11.00AM.

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.03.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२९ मार्च   २०१८ सकाळी ११.०० वाजता

****

जैन धर्माचे २४वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती आज देशभरात भक्तिभावानं साजरी होत आहे. यानिमित्त ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रम तसंच शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जगात प्रेम आणि सद्भावनेचा प्रसार करण्यासाठी आपल्याला भागवान महावीरांच्या जीवनापासून प्रेरणा घेतली पाहिजे, असं राष्ट्रपती आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले. महावीरांनी अहिंसा आणि करुणेचा उपदेश देऊन, मानवजातीला आनंददायी जीवनाचा मार्ग दाखवला, असं उपराष्ट्रपती म्हणाले, तर महावीरांचा शांतता, अहिंसा आणि सद्भावनेचा संदेश आपल्या सर्वांसाठी प्रेरणा असल्याचं, पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

 औरंगाबाद इथं महावीर जयंतीनिमित्त दुचाकी फेरी, शोभायात्रा, तसंच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****



 दरम्यान, महावीर जयंतीनिमित्त आज शासकीय सुट्टी असल्यानं औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीचा बाह्यरुग्ण विभाग बंद राहणार आहे. मात्र उद्या शासकीय सुटी असली तरी विभाग सुरु राहणार असल्याचं घाटी प्रशासनातर्फे कळवण्यात आलं आहे.

****



 ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद देशपांडे यांच्या स्मृतीनिमित्त देण्यात येणारा गोविंद सन्मान पुरस्कार पक्षी मित्र डॉ.दिलीप यार्दी यांना काल औरंगाबाद इथं समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. पाच हजार रूपये रोख आणि स्मृती चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. लोकांनी आपला पक्षांबद्दलचा दृष्टीकोन बदलण्याची गरज व्यक्त करत, यार्दी यांनी, राज्य शासनाचा प्लास्टीक बंदीचा निर्णय पर्यावरण आणि पक्षी संवर्धनासाठी महत्वपूर्ण असल्याचं सांगितलं.

****



 कोल्हापूर इथल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शासकीय पुजारी नियुक्ती संबंधीचं विधेयक काल एकमतानं मंजूर झालं. यामुळे आता राज्यस्तरीय परीक्षा घेऊन मंदिरात शासकीय पुजारी नेमण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये महिलांसाठी ५० टक्के आरक्षणही ठेवण्यात आलं आहे. गेल्या वर्षी देवीच्या मूर्तीला घागरा घालण्यावरुन निर्माण झालेल्या वादामुळे पुजेसाठी शासकीय पुजारी नेमण्याची मागणी करण्यात आली होती, त्यासाठी शहरात गेल्या एक वर्षापासून विविध  आंदोलनं करण्यात आली होती.

*****

***






29.03.2018_8.40_8.45_AM_URDU.mp3


Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...