Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 29 March 2018
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ मार्च २०१८ सायंकाळी
५.२५ मि.
****
जनलोकपाल
लागू करण्याच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरु केलेलं उपोषण मागे
घेण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अण्णांची भेट घेतल्यानंतर हे
उपोषण मागे घेण्यात आलं. यावेळी अण्णांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्याचं
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
भारतीय
अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं आज जी-सॅट सहा-ए या दळणवळण उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण
केलं. संध्याकाळी चार वाजून ५६ मिनिटांनी आंध्र प्रदेशातल्या श्रीहरीकोटा इथल्या सतीश
धवन अंतराळ केंद्रावरुन जीएसएलव्ही एफ झिरो एट या प्रक्षेपकातून हा उपग्रह अवकाशात
झेपावला. हा उच्च शक्तीचा एस बँड दळणवळण उपग्रह असून, तो दहा वर्षं काम करेल.
****
केंद्रीय
माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका
फुटल्याचा प्रकार दुर्दैवी असून, यात सहभागी असलेल्यांना योग्य ती शिक्षा केली जाईल,
असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली
इथं वार्ताहरांशी बोलत होते. सीबीएसईनं दहावीचा गणित विषय तसंच बारावीच्या अर्थशास्त्र
या विषयाची पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला असून, येत्या सोमवारी किंवा मंगळवारी
ही परिक्षा होणार आहे. या प्रकरणी आतापर्यंत १८ विद्यार्थ्यांसह २५ जणांची चौकशी केल्याचं
दिल्ली पोलिसांनी सांगितलं.
दरम्यान,
जावडेकर आणि सीबीएसईच्या अध्यक्ष अनिता कारवाल यांना निलंबित करण्याची आणि न्यायालयीन
चौकशीची मागणी काँग्रेसनं केली आहे.
****
राज्यात
लोकसहभागातून ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला असून, हरित महाराष्ट्राच्या
चळवळीत सहभागी होण्यासाठी राज्यभरात ४६ लाख लोकांची हरित सेना सज्ज झाली आहे. यामध्ये
सर्वाधिक चार लाख ६६ हजार एकशे सदुसष्ट इतकी नोंदणी लातूर जिल्ह्यात झाली असून, त्यापाठोपाठ
उस्मानाबाद, बीड, नाशिक, यवतमाळ या जिल्ह्यातही हरित सेनेसाठी मोठ्या प्रमाणात नोंदणी
झाली आहे.
****
जैन
धर्माचे २४वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती आज सर्वत्र भक्तिभावात विविध कार्यक्रमांनी
साजरी करण्यात आली. औरंगाबाद इथं यानिमित्त पैठणगेट परिसरातून भव्य शोभायात्रा काढण्यात
आली. बाबा पेट्रोल पंप परिसरातील भगवान महावीर चौकात ध्वजारोहणही करण्यात आलं.
****
औरंगाबादच्या
चिकलठाणा विमानतळावर भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे आज १०० फूट उंचावर राष्ट्रध्वज
फडकवण्यात आला. भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे पश्चिम क्षेत्राचे कार्यकारी संचालक केशव
शर्मा यांच्या हस्ते आज या ध्वजाचं लोकार्पण झालं. यावेळी विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम
भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, विमानतळाचे निदेशक डी.जी.साळवे उपस्थित होते. देशातल्या
१२० विमानतळापैकी २९ विमानतळांची शंभर फूट उंच राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी निवड केली
होती, त्यामध्ये औरंगाबाद विमानतळाचा समावेश करण्यात आला होता.
****
शासनाच्या
विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणं ही प्रशासनासोबतच अधिकाऱ्यांचीही
नैतिक जबाबदारी असल्याचं लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटलं आहे.
लातूर इथं आज रमाई घरकुल योजनेअंतर्गत ६४८ लाभार्थ्यांना निलंगेकर यांच्या हस्ते धनादेशाचं
वाटप करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. लातूर जिल्ह्यातला एकही लाभार्थी या योजनेतून
वंचित राहू नये, याची महानगरपालिकेनं दक्षता घ्यावी, असं ते म्हणाले.
****
नगर
जिल्ह्यात पोलिसांनी आज गो-तस्करांवर कारवाई केली असून, विविध कत्तलखान्यांवर छापे
मारत ५० गायी, बैलांची सुटका केली, तर दोन हजार किलोपेक्षा अधिक गोमांस जप्त केलं.
अजूनही ही कारवाई सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
येत्या
दोन एप्रिल पासून जबलपूर ते सिकंदराबाद दरम्यान उन्हाळी विशेष रेल्वेगाडी सुरू करण्यात
आली आहे. ही गाडी जबलपूर इथून दर सोमवारी रात्री आठ वाजता निघणार असून अकोला, वाशिम,
हिंगोली, नांदेड मार्गे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सात वाजता सिकंदराबादला पोहोचेल.
तर, परतीच्या प्रवासात ही रेल्वेगाडी सिकंदराबाद इथून दर मंगळवारी रात्री साडेआठ वाजता
निघेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी जबलपूरला पोहोचेल.
****
महिलांच्या
ट्वेंटी ट्वेंटी तिरंगी क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईत झालेल्या सामन्यात भारतानं इंग्लंडचा
आठ गडी राखून पराभव केला. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला,
मात्र त्यांचा डाव १०७ धावांवर संपुष्टात आला. भारतानं हे लक्ष्य १६व्या षटकातच पूर्ण
केलं.
****
राज्यात
आज सर्वात जास्त ४२ अंश सेल्सिअस तापमान परभणी इथं नोंदवलं गेलं. उस्मानाबाद आणि नांदेड
सरासरी ४०, तर औरंगाबाद इथं ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
****
No comments:
Post a Comment