आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
३१ मार्च २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
प्रबळ इच्छाशक्ती आणि मनुष्यबळ हेच कोणत्याही देशाची खरी संपत्ती असते, असं पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते
काल स्मार्ट इंडिया हॅकेथॉन - २०१८ मध्ये दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. जेंव्हा देशाचे नागरीकच एखादा बदल निश्चित करतात तेंव्हा सर्वकाही
शक्य होतं, असंही ते यावेळी म्हणाले. कोणत्याही समस्येचं मूळ कारण शोधणं गरजेचं असून, त्यावर तोडगा शोधण्यासाठी चौकटीबाहेर
जाऊन विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कोणतंही सरकार एकट्यानं अपेक्षित बदल
घडवून आणू शकत नाही त्यासाठी लोकसहभाग आवश्यक असतो, असंही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं. देशभरातल्या २८
केंद्रांवर हॅकेथेनचा हा अंतिम सोहळा पार पडला.
****
हनुमान जन्मोत्सव आज सर्वत्र भक्तीभावानं साजरा होत आहे. ठिकठिकाणच्या हनुमान मंदिरांमध्ये
सूर्योदयाच्या वेळी हनुमानाचा जन्मसोहळा पारंपरिक पद्धतीनं साजरा झाला. औरंगाबाद जिल्ह्यात
खुलताबाद इथं भद्रा मारोतीच्या दर्शनासाठी काल रात्रीपासूनच अनेक भाविक पायी चालत पहाटेच्या
सुमारास मंदिरात दाखल झाले. औरंगाबाद इथल्या प्रसिद्ध सुपारी हनुमान मंदिरातही भाविकांनी
पहाटेपासून दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. या निमित्तानं सर्वत्र धार्मिक कार्यक्रमांचं
आयोजन करण्यात आलं आहे.
****
देशाच्या आर्थिक विकासाचं सध्या रंगवलं जाणारं चित्र फसवं असल्याची टीका, माजी
केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी केली आहे. ते काल नाशिक इथं, महावीर व्याख्यानमालेत बोलत होते.
सत्तेवर येण्यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची भाजपनं पूर्तता केली नाही, त्यामुळे सर्वच
घटक नाराज असल्याचं, ते म्हणाले. विमुद्रीकरणाच्या निर्णयावरही सिन्हा यांनी यावेळी
टीका केली.
****
नांदेड इथं आयोजित कृषी महोत्सवाचा काल समारोप झाला. या महोत्सवात नांदेडसह परभणी आणि हिंगोली
जिल्ह्यातले २० हजार शेतकरी आणि ग्राहक सहभागी
झाले होते. गेल्या २६ तारखेपासून सुरु
असलेल्या या महोत्सवात जवळपास सदुसष्ठ लाख रुपयांच्या शेतमालाची विक्री झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
//*************//
No comments:
Post a Comment