Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 March 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ मार्च
२०१८
दुपारी १.०० वा.
****
संसदेचं कामकाज आज सलग तेराव्या
दिवशीही होऊ शकलं नाही. राज्यसभेत तेलगु देशम पक्षाच्या सदस्यांनी आंध्र प्रदेशाला
विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी, द्रमुक आणि अण्णाद्रमुकच्या सदस्यांनी
कावेरी जलव्यवस्थापन मंडळाच्या स्थापनेसाठी, सभापतींच्या आसनासमोर हौद्यात उतरून घोषणाबाजी
सुरू केली. काँग्रेसच्या सदस्यांनीही या सर्वांना पाठिंबा दर्शवत घोषणाबाजी सुरू केली.
दरम्यान विरोधी पक्षनेते गुलाम नवी आझाद यांनी इराकमध्ये
मोसुल इथं ३९ भारतीय मारले गेल्या प्रकरणी सदनात चर्चेची मागणी केली. मात्र गदारोळ
वाढत गेल्यामुळे सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं.
लोकसभेतही तेलगु देशम, द्रमुक, अण्णाद्रमुक, तसंच
काँग्रेस पक्षाच्या खासदारांचा याच मुद्यांवरुन गदारोळ सुरू असल्यानं, अध्यक्षांनी
पहिल्या काही मिनिटातच कामकाज तासाभरासाठी स्थगित केलं, मात्र बारा वाजता कामकाज पुन्हा
सुरू झालं, तेव्हाही अनेक पक्षांच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनासमोर जमा होऊन, फलक
झळकावत घोषणाबाजी सुरु ठेवली, कामकाज सुरळीत नसल्यानं, सरकारविरोधात आलेल्या अविश्वास
प्रस्तावावर कार्यवाही होऊ शकत नसल्याचं सांगत, अध्यक्षांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब
केलं.
****
लिंगायत समाजास अल्पसंख्याकाचा दर्जा देण्याच्या
कर्नाटक सरकारच्या निर्णयावर संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी टीका केली आहे.
हा निर्णय म्हणजे समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.आज संसद परिसरात पत्रकारांशी बोलाताना
कुमार यांनी, संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनेच 2013 साली असा प्रस्ताव फेटाळला होता,
याकडे लक्ष वेधलं.
****
साखरेची निर्यात वाढवण्याच्या हेतूनं
सरकारनं साखरेवरचं निर्यात शुल्क रद्द केलं आहे. केंद्रीय अबकारी आणि जकात मंडळानं
जारी केलेल्या एका अधिसूचनेत ही माहिती देण्यात आली आहे.२०१७-१८ च्या हंगामात साखरेचं
विक्रमी, म्हणजे दोन कोटी पंचाण्णव लाख टन इतकं उत्पादन होण्याचा अंदाज आहे.
****
क्षय रुग्णांवर होत असलेल्या उपचारांची
योग्य माहिती मिळवण्यासाठी औषध दुकानदारांची मदत घेण्याचं सरकारनं ठरवलं आहे. या दुकान
चालकांनी क्षयरुग्णांची आणि त्यांना विकलेल्या औषधांची माहिती जिल्ह्याच्या नोडल अधिकाऱ्याकडे
इलेक्ट्रॉनिक किंवा लिखित स्वरूपात द्यावी, असे निर्देश सरकारनं दिले आहेत.
****
राज्याच्या डोंगराळ भागाच्या विकासासाठी
राबवण्यात येत असलेल्या कार्यक्रमांतर्गत, राज्यात सहा नवीन डोंगरी तालुके तसंच उपगटांची
निर्मिती करण्यात आली असून, त्यांच्या विकासासाठी साडेचार कोटी रुपयांचा निधी देण्यात
येणार असल्याची माहिती वित्तराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. या नवीन तालुक्यांमध्ये
नांदेड जिल्ह्यातल्या माहूर तालुक्याचा आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्री या उपगटाचा
समावेश आहे. माहूर तालुक्याला एक कोटी रुपये तर फुलंब्री उपगटाला पन्नास लाख रुपये
निधी देण्याची तरतूद अर्थसंकल्पात प्रस्तावित आहे.
****
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला परवानगी देण्याच्या
प्रक्रियेला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं दाखल करून घेतली आहे. कोकण
बचाव समिती आणि जनहित सेवा समितीनं ही याचिका दाखल केली होती. या प्रकल्पाला परवानगी
देताना नियम आणि शर्तींचं पालन झालं नसल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई लक्षात
घेत, खामगाव, देऊळगावराजा, मेहकर, बुलडाणा आणि शेगाव तालुक्यांमधल्या सात गावांसाठी
जिल्हाधिकाऱ्यांनी टँकरद्वारे पाणी पुरवठ्याला परवानगी दिली आहे. या टँकर्सनी केलेल्या
खेपांची ग्रामपंचायतींनी नोंद ठेवावी आणि गटविकास अधिकाऱ्यांनी या नोंदीची नियमित तपासणी
करावी, असे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
****
परभणी इथं जिल्हा कृषी महोत्सवाला आजपासून प्रारंभ
होत आहे. कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान संस्थेच्या वतीनं आयोजित हा महोत्सव शहरातल्या
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरात आयोजित करण्यात आला आहे. येत्या २५ तारखेपर्यंत
हा महोत्वस चालणार आहे.
****
प्रसिद्ध सनईवादक उस्ताद बिस्मिल्ला खान
यांची आज एकशे दोनवी जयंती आहे. बिस्मिल्ला खान यांचा २००१ मध्ये भारतरत्न पुरस्कार
देऊन सन्मान करण्यात आला होता. हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे संगीत कलाकार होते. गूगल
या इंटरनेटवरच्या सर्च इंजिननं आज विशेष डूडल बनवून बिस्मिल्ला खान यांना आदरांजली
वाहिली आहे.
*****
***
No comments:
Post a Comment