Thursday, 29 March 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.03.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 March 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९  मार्च २०१ सकाळी .५० मि.

*****



Ø  औरंगाबाद शहरातल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली शासन नियुक्त समितीनं निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

Ø  राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा समारोप;  पावसाळी अधिवेशन चार जुलैपासून

Ø  ३० एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांनी शाळेत येण्याबाबतचा निर्णय रद्द

Ø  औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर बी. ए. चोपडे यांच्या चौकशीचे आदेश जारी; डॉक्टर एस.एफ.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त

आणि

Ø  लातूर, बीड आणि नांदेड इथं पारपत्र सेवा केंद्र सुरु होणार

*****



 औरंगाबाद शहरातल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भातला निर्णय विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली शासन नियुक्त समितीनं घ्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. नारेगाव इथं कचरा न टाकण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाला, औरंगाबाद महानगरपालिकेनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं, त्यावर सर्वोच्च न्यायालयानं औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप न करता हा  आदेश दिला. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखालील या समितीनं, नारेगाव परिसरातल्या ग्रामस्थांची तसंच महानगरपालिकेची बाजू ऐकून घेऊन, निर्णय घ्यावा असं न्यायालयानं म्हटलं आहे.

 सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर आज या समितीची बैठक होत आहे.

 दरम्यान, गेल्या ७ मार्च पासून आजपर्यंत  शहरात साठलेल्या कचऱ्यावर कशा पद्धतीनं प्रक्रिया केली यासंदर्भातला  सविस्तर अहवाल महापालिकेनं सादर करावा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत. शहरातल्या कचरा विलगीकरण प्रक्रियेसंदर्भात महापालिकेनं दिलेली माहिती विसंगत असल्याचं एका याचिका कर्त्यानं निदर्शनास आणून दिल्यामुळं यासंदर्भात शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश न्यायालयानं महापालिकेला दिले आहेत.

****



 राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा काल समारोप झाला. शेवटचा दिवस असल्यानं विधानसभेत काल अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेसह, प्रलंबित तीन विधेयकं विधानसभेत मंजूर करण्यात आली. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात विविध विभागातल्या ७२ हजार रिक्त जागा भरण्यात येणार असल्याचं सांगितलं. या अधिवेशनात विधानसभेत १९ विधेयकं मंजूर झाली असल्याचं अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी सांगितलं. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात १३ विधेयक मंजूर झाली असून पावसाळी अधिवेशन चार जुलैपासून सुरू होणार आहे.

****



 ३० एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांनी शाळेत येण्याबाबतचा निर्णय मागे घेत असल्याचं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काल विधानपरिषदेत बोलतांना सांगितलं. राज्यातल्या तासिका तत्वावर नेमण्यात येणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असून याबाबत लवकरच मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढण्यात येईल असंही तावडे म्हणाले.

****



 औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर बी. ए. चोपडे यांच्या कामकाजाच्या चौकशीचे आदेश काल उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने जारी केले. यासाठी, निवृत्त कुलगुरू डॉक्टर एस.एफ.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीला येत्या दोन महिन्यात अहवाल देण्यास सांगण्यात आलं आहे. चोपडे यांच्याविरोधात अनेक व्यक्ती तसंच संघटनांकडून राज्यपालांना तक्रारी प्राप्त झाल्यानंतर, राज्यपालांनी शासनाला वस्तुस्थिती दर्शक प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. विधानपरीषदेतही कुलगुरू चोपडे यांच्या कामकाजासंदर्भात आमदार सतीश चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित करून चौकशीची मागणी केली होती.

****



 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईनं दहावीचा गणित विषय तसंच बारावीच्या अर्थशास्त्र या विषयाची पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही विषयांच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचा प्रकार समोर आला होता, त्यामुळे पुनर्परीक्षेचा निर्णय घेतल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असं मंडळाच्यावतीन सांगण्यात आलं.

****



 विविध सरकारी योजनांचा लाभ आणि अनुदान थेट बँक खात्यात जमा होण्यासाठी लाभार्थींनी आधार जोडणी करून घेण्याची मुदत केंद्र सरकारनं ३० जून पर्यंत वाढवली आहे. प्राप्तीकर विवरण पत्र भरण्यासाठी स्थायी खाते क्रमांक- पॅन आणि आधार क्रमांक जोडणीची मुदतही नुकतीच ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र, बँक खाती आणि मोबाईल सिमकार्ड आधार क्रमांकाशी जोडणं सर्वोच्च न्यायालयानं घटनापीठाचा निकाल येईपर्यंत लांबणीवर टाकलं आहे.

*****

 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

*****



 येत्या दीड महिन्यात राज्यात १३ नवी पारपत्र सेवा केंद्र सुरु होणार असून यात मराठवाड्यातल्या लातूर, बीड आणि नांदेड या तीन जिल्ह्यांचा समावेश असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी काल जळगाव इथं बोलतांना दिली. “पारपत्र आपल्या दारी” या तत्वानुसार टपाल कार्यालयाच्या मदतीनं देशभरात २५१ पारपत्र केंद्र उभारण्यात येणार असल्याचं मुळे यांनी सांगितलं.

****



 तिहेरी तलाक विधेयकाच्या विरोधात तसंच अन्य मागण्यांसाठी काल परभणी शहरात मुस्लिम महिलांनी मोर्चा काढला. दुपारी दोन वाजता निघालेला हा मोर्चा सायंकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला.

****



 राज्य सरकारनं घेतलेल्या संपूर्ण प्लास्टिक बंदीच्या निर्णयात तात्काळ सुधारणा करून व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा या मागणीसाठी बीड जिल्हा व्यापारी महासंघानं काल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यांनी आपल्या मागण्याचं निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला दिलं. काळ्या फिती लावून निषेधही त्यांनी नोंदवला. मोर्चात सहभागी होण्यासाठी व्यापाऱ्यांनी दुपारपर्यंत दुकानं बंद ठेवली होती. 

****



 लातूर बाजार समितीमध्ये ई-नाम योजनेअंतर्गत झालेला पहिला व्यवहार काल यशस्वीपणे पार पडला. या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर १ लाख ६ हजार ३०९ रुपये थेट जमा करण्यात आले. या योजनेत शेतकऱ्यांनी आपला माल व्यापारी किंवा आडत्याला विकल्यानंतर त्याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातात. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला बँक खाते क्रमांक आणि आधार क्रमांकाची बाजार समितीकडून ई-नाम पोर्टलवर नोंदणी करुन घ्यावी असं आवाहन लातूर बाजार समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे.

****



 ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या मागण्यांवर सरकार गांभीर्यानं विचार करत नसल्याचा आरोप करत, राळेगण सिद्धीच्या ग्रामस्थांनी आजपासून सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. अण्णांच्या मागण्यांना पाठिंबा म्हणून, जेलभरो आंदोलन करण्याचा निर्धार या ग्रामस्थांनी केला आहे. राळेगण सिद्धी इथं काल दुपारी झालेल्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथंही काल या आंदोलनाला पाठिंबा देत मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला.

 दरम्यान, दिल्लीत गेल्या सहा दिवसांपासून उपोषण करत असलेल्या अण्णाचं वजन पाच किलोनं घटलं असून त्यांचा रक्तदाबही कमी झाल्याचं अण्णांचे कार्यकर्ते दत्ता आवारी यांनी सांगितलं.

****



 कोरेगाव प्रकरणात संभाजी भिडे यांना गोवण्यात आल्याच्या निषेधार्थ राज्यात काल अनेक ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चे काढल्याचं वृत्त आहे. सांगली, नाशिक, धुळे, नांदेड, कोल्हापूर आणि सातारा इथं मोर्चे काढून नागरिकांनी भिडे यांना पाठिंबा दर्शवल्याचं, आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.

****

 हिंगोली जिल्ह्यात वाळू माफियांनी महसूल विभागाच्या पथकावर काल सकाळी हल्ला केला. औंढा नागनाथ तालुक्यातल्या बेरुळा शिवारात ही घटना घडली. या हल्ल्यामध्ये तलाठी विठ्ठल शेळके हे गंभीर जखमी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. याप्रकरणी औंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

 लातूर महापालिकेनं मालमत्ता कराचा भरणा करून घेण्यासाठी आज गुरुवार २९ मार्च तसंच शुक्रवार ३० मार्च रोजी सर्व क्षेत्रीय कार्यालयं तसंच मनपा मुख्य कर भरणा कार्यालय सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व करदात्यांनी मालमत्ता कराचा भरणा करून, महापालिकेला सहकार्य करावं, असं आवाहन लातूर महापालिका आयुक्तांनी एका पत्रकाद्वारे केलं आहे.

****



 लातूर इथं सुरु असलेल्या जिल्हा कृषी प्रदर्शनाचा काल समारोप झाला. चार दिवस चाललेल्या या प्रदर्शनात ग्राहकांनी थेट शेतकऱ्यांकडून जवळपास ४० लाख रुपयांची उत्पादनं खरेदी केली.

 दरम्यान, शेतकऱ्यांच्या सेंद्रिय उत्पादनासाठी कायमस्वरुपी जागा द्यावी अशी मागणी या प्रदर्शनात शेतकऱ्यांनी केली.

*****

***

No comments: