Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 March 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ मार्च
२०१८
दुपारी १.०० वा.
****
संसदेत
आजही गदारोळाची स्थिती कायम राहिली. तेलगु देशम, अखिल भारतीय अण्णाद्रमुक पक्षांची
आपापल्या विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली घोषणाबाजी आजही कायम
राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तर लोकसभेचं कामकाज प्रथम तासाभरासाठी तहकूब
झालं.
लोकसभेचं
कामकाज बारा वाजल्यानंतर पुन्हा सुरू झाल्यावरही गदारोळ कायम राहिला. सरकारविरोधात
दाखल झालेल्या अविश्वास प्रस्तावावर कार्यवाही करण्यासाठी विरोधकांनी सहकार्य करण्याचं
आवाहन अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी केलं, मात्र गदारोळ कायम राहिल्यानं, त्यांनी सदनाचं
कामकाज मंगळवार पर्यंत तहकूब केलं.
त्यापूर्वी संसदेच्या दोन्ही सभागृहांनी हुतात्मा भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव,
यांना आदरांजली वाहिली. या थोर क्रांतिकारकांचं मातृभूमीसाठीचं अतुल्य समर्पण आणि निस्वार्थ
त्याग, या गुणांनी त्यांना अमरत्व मिळवून दिलं आहे, असं राज्यसभेचे सभापती एम.व्यंकय्या
नायडू यांनी म्हटलं.
****
लोकपाल निर्णयाची अंमलबजावणी आणि इतर मागण्यांसाठी
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आजपासून दिल्लीत बेमुदत उपोषण सुरू करत आहेत.
लोकपालची अंमलबजावणी, शेतमालाला हमीभाव, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी अशा विविध मागण्यांसाठी,
आज शहीद दिनापासून हे आंदोलन पुकारत असल्याचं, हजारे यांनी सांगितलं.
****
भारतीय नौदलात, तीन दशकांहून जास्त काळ सेवा बजावलेल्या आयएनएस गंगा, या स्वदेशी
बनावटीच्या युद्धनौकेला काल मुंबई इथे सेवेतून निवृत्त करण्यात आलं. ३० डिसेंबर १९८५
ला सेवेत रुजू झालेली ही युद्धनौका म्हणजे, देशाच्या युद्धनौका बांधणी क्षमतेचं प्रतीक
होती. व्हाईस ॲडमिरल ए.के.भाल, यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या शानदार सोहळ्याला
भारतीय नौदलाचे, या नौकेवर काम केलेले अनेक अधिकारी उपस्थित होते.
****
मुंबईच्या वर्सोवा किनाऱ्यावर काल ऑलिव्ह रिडले, या समुद्री प्रजातीच्या कासवांचा
जन्मसोहळा पहायला मिळाला. या किनाऱ्याची स्वच्छता करणाऱ्या एका स्वयंसेवी गटानं ही
घटना पाहिल्याबरोबर वनाधिकाऱ्यांना त्याबाबत माहिती दिली. साधारणपणे हिंदी महासागर
तसंच प्रशांत महासागरात दिसून येणाऱ्या या ऑलिव्ह रिडले कासवांची सुमारे ऐंशी पिलं
समुद्रात सुरक्षितपणे पोहोचेपर्यंत वनाधिकाऱ्यांनी त्यांची निगराणी केली.
****
अल्पसंख्याक समाजाच्या युवक-युवतींमध्ये कौशल्यं विकसित होऊन त्यांना रोजगाराच्या
संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी औरंगाबाद इथे अल्पसंख्याकांसाठीचं एक कौशल्य विकास विद्यापीठ
स्थापन करण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, अशा सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
यांनी दिल्या आहेत. अल्पसंख्याक लोकप्रतिनिधींच्या एका बैठकीत ते काल बोलत होते. अल्पसंख्याकांसाठीच्या
योजनांच्या कार्यवाहीची सद्यस्थिती आणि अल्पसंख्याकांच्या विकासासाठीचा पंतप्रधानांचा
पंधरा कलमी कार्यक्रम राज्यात कशा पद्धतीनं राबवला जात आहे, यासंदर्भातली माहिती, यापुढच्या
चार एप्रिलला होणाऱ्या बैठकीत सादर करावी, असे निर्देशही अर्थमंत्र्यांनी दिले.
****
अहमदनगर शहरातल्या माळीवाडा परिसरात खासगी कुरियर पार्सलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा
तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपवण्यात आला आहे. गुन्ह्याची पद्धत आणि लक्ष्य असणारी
व्यक्ती, यावरून काश्मीर खोऱ्यात कार्यरत असलेल्या एखाद्या दहशतवादी संघटनेचा हात या
घटनेत असल्याची शक्यता गृहीत धरून गृह खात्यानं हा निर्णय घेतला आहे.
****
बुलडाणा जिल्हयातल्या मलकापूरचे तहसीलदार विजय पाटील यांच्या पथकानं सुमारे
एक कोटी रुपये किमतीची वाळू उपसा करणारी यंत्रं आणि वाळूचा अवैध साठा जप्त केला आहे.
मलकापूर तालुक्यातल्या काळेगाव शिवारात त्यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी पंचेचाळीस
जणांच्या विरोधात मलकापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
१६ ते २२ मार्चदरम्यान नांदेड जिल्ह्यात साजरा झालेल्या जलजागृती सप्ताहाचा
काल जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या उपस्थितीत समारोप झाला. जलजागृती सप्ताह साजरा
करण्याची गरज,पाण्याचं महत्त्व आणि बचत, या विषयांवर यावेळी मान्यवरांची व्याख्यानं
झाली. जलजागृती सप्ताहाच्या निमित्तानं आयोजित निबंध स्पर्धेतल्या विजेत्यांना यावेळी
प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं.
****
पुण्यभूषण फाऊंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या पुण्यभूषण पुरस्काराची
काल घोषणा करण्यात आली. यंदाचा हा पुरस्कार किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉक्टर
प्रभा अत्रे यांना, गायनक्षेत्रातल्या त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी, दिला जाणार आहे.
//**********//
No comments:
Post a Comment