आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२७ मार्च २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गंगाधर पानतावणे यांचं आज औरंगाबाद इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं, ते ८१ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. दलित साहित्याचा सखोल अभ्यास करणारे पानतावणे यांचे, ‘धम्मचर्या’, ‘मूल्यवेध’, ‘मूकनायक’, ‘विद्रोहाचे पाणी पेटले आहे’, ‘वादळाचे वंशज’, ‘दलित वैचारिक वाङमय’, ‘किल्ले पन्हाळा ते किल्ले विशाळगड’, ‘साहित्य, प्रकृती आणि प्रवृत्ती’, ‘साहित्य शोध आणि संवाद’ हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. . औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक असलेले पानतावणे, अस्मितादर्श या त्रैमासिकाचे संस्थापक संपादक होते. पानतावणे यांनी २००९ साली अमेरिकेतल्या सॅनहोजे इथं झालेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. भारत सरकारचा २०१८ या वर्षाचा पद्मश्री पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे. पानतावणे यांच्या पार्थिव देहावर आज संध्याकाळी औरंगाबाद इथल्या छावणी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
राज्यातल्या प्रत्येक शासकीय रुग्णालयात टप्प्या-टप्प्यानं कर्करोग पूर्व तपासणी केंद्र सुरू करण्यात येणार असून, केमोथेरपीची सुविधा उपलब्ध करुन देण्याचंही प्रस्तावित असल्याचं सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी काल विधानसभेत सांगितलं. राज्यात सध्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून शासकीय आणि खासगी अशा एकूण २२९ रुग्णालयात वेगवेगळ्या कर्करोगावर उपचार केले जातात.
****
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाला, तीन दिवसांच्या सुटीनंतर आज परत सुरुवात होत आहे. आंध्रप्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मागणीवरून तेलगु देसम पक्ष, तसंच कावेरी व्यवस्थापन मंडळाची पुर्नस्थापना करण्याच्या मागणीवरुन अण्णाद्रमुक या पक्षांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे गेले १५ दिवस दोन्ही सदनांचं कामकाज सुरळीत झालेलं नाही. येत्या सहा एप्रिलला हे अधिवेशनाचा समारोप होण्याची शक्यता आहे.
****
नाशिक जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीवरून शिवसेनेत वाद निर्माण झाला असून, स्वयंघोषित उमेदवार शिवाजी सहाणे यांची काल पक्षानं हकालपट्टी केली. मे महिन्यात होणार असलेल्या या निवडणुकीसाठी शिवसेनेनं अद्याप कुणालाही उमेदवारी दिलेली नाही.
****
No comments:
Post a Comment