Tuesday, 27 March 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 27.03.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 March 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७   मार्च २०१ सकाळी .५० मि.

*****



Ø  औरंगाबाद शहरात, विमानतळाजवळच्या ३० एकर जागेत कचऱ्यापासून मिथेन गॅस तयार करण्याचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय

Ø  कोरेगाव- भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे यांना आठ दिवसात अटक न केल्यास, आंदोलन तीव्र करण्याचा भारतीय रिपब्लिकन पक्ष- बहुजन महासंघाचा इशारा

Ø  तूर खरेदीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर टप्प्या टप्यानं जमा करण्यात येतील - कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत

आणि

Ø  असंघटीत क्षेत्रातल्या  महिलांसाठी  महामंडळाची  स्थापना  करण्यात  येणार - विजया रहाटकर

*****



 औरंगाबाद शहरात, कचरा साठवून त्यावर मिथेन गॅसचा प्रकल्प उभारण्यासाठी शहरातल्या जालना रस्त्यावर विमानतळाजवळची ३० एकर जागा निश्चित करण्यात आली असल्याची माहिती, महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त नवलकिशोर राम यांनी काल दिली. कचरा जाळून टाकण्याच्या शहरातल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरातल्या ९ विभागात स्वतंत्र अधिकारी -कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असल्याचं ही त्यांनी सांगितलं.

 दरम्यान, औरंगाबाद शहरातल्या कचरा समस्येवर तोडगा काढण्यासाठी रस्त्यावर कचरा टाकू नका, असं आवाहन औरंगाबाद महानगर पालिकेतर्फे केलं जात आहे. शहराच्या अनेक भागात नागरिक रात्रीच्या वेळी दुभाजकावर कचरा आणून टाकत असल्याचं निदर्शनास आल्यानं, महानगरपालिकेचे अधिकारी पाहणी करत असताना, काल शहरातल्या जवाहर कॉलनी भागात रस्त्यावर कचरा आणून टाकणाऱ्या एका औषधांच्या दुकानदारास पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

****

 कोरेगाव- भीमा इथं हिंसाचार भडकावल्याचा आरोप असलेले, शिव प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांना आठ दिवसात  अटक करण्याची मागणी, भारतीय रिपब्लिकन पक्ष- बहुजन महासंघाचे अध्यक्ष, प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली आहे. आंबेडकर यांच्या नेतृत्वात काल मुंबईत एल्गार मोर्चा काढण्यात आला होता, त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ही मागणी केली. मागणी मान्य न झाल्यास, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंबेडकर यांनी वार्ताहरांशी बोलताना दिला.

 दरम्यान, या एल्गार मोर्चाच्या पार्श्वभूमीवर, विधान परीषदेत, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी करण्यासाठी आणलेला स्थगन प्रस्ताव सभापतींनी फेटाळून लावला. या विषयावर यापूर्वी चर्चा झाली असल्याचं सांगत, उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी हा प्रस्ताव फेटाळला.

****

 विधानसभेत काल सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रालयात उंदीर मारण्यासंदर्भात देण्यात आलेल्या कंत्राटाबाबत खुलासा करणारं निवेदन सादर केलं. पूर्वीच्या सरकारच्या काळात प्रचलित असलेल्या पध्दतीनुसार मजूर संस्थेला  हे काम देण्यात आलं होतं, मात्र ही संस्था अस्तित्वात आहे का, याचा शोध घेतला जात असल्याचं ते म्हणाले. या संस्थेच्या मुंबई जिल्हा बँकेतल्या खात्यावर पैसे जमा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

****

 राज्यातल्या प्रत्येक शासकीय रुग्णालयात टप्प्या-टप्प्यानं कर्करोग पूर्व तपासणी केंद्र, -प्री- कॅन्सर डिटेक्शन सेंटर सुरू करण्यात येणार असून, केमोथेरपीची सुविधा उपलब्ध करुन देण्याचंही प्रस्तावित आहे अशी माहिती, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी काल विधानसभेत दिली. राज्यात सध्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून शासकीय आणि खासगी अशा एकूण २२९ रुग्णालयात वेगवेगळ्या कर्करोगावर उपचार केले जातात अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

****

 राज्यातल्या शेतकऱ्यांकडून आधारभूत दरानं खरेदी केलेल्या तुरीच्या एकूण रकमेपैकी, सुमारे २०० कोटी  रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असून, उर्वरित रक्कम भारतीय राष्ट्रीय सहकारी कृषी विपणन महासंघ – नाफेडकडून घेऊन टप्प्या टप्यानं देण्यात येईल, असं पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काल विधान परिषदेत  सांगितलं. राज्यात एकूण १८९ तूर खरेदी केंद्रं सुरू करण्यात आली होती. या सर्व केंद्रांवरून हमी भावानं आतापर्यंत सुमारे ८०० कोटी रुपयांची तूर खरेदी झाली आहे.  ही खरेदी एप्रिल २०१८ पर्यंत चालू राहणार आहे. यावर्षीची ही  रक्कम लवकरच शेतकऱ्याच्या खात्यात टाकण्यात येणार असल्याचं खोत यांनी यावेळी सांगितलं.

****

 केंद्रीय भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचं कामकाज येत्या १५ ऑगस्टपासून कागदरहित होणार आहे. त्यामुळे कर्मचारी भविष्य निधी योजनेच्या सर्व सभासदांनी त्यांचं के वाय सी, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक आणि कायम खातेक्रमांक -पॅन आदी माहिती वैश्विक खाते क्रमांक - यू ए एन शी जोडून घेण्याचं आवाहन केंद्रीय भविष्य निर्वाह निधी कार्यालयानं केलं आहे.

****

 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

*****

 असंघटीत क्षेत्रातल्या महिलांसाठी महामंडळाची स्थापना करण्यात येणार असून, त्याचा आकृतीबंध तयार करण्याचं काम झालं आहे असं, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी म्हटलं आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा इन्स्टिट्यूट आणि राज्य महिला आयोग यांच्यावतीनं औरंगाबाद इथं आयोजित, ‘मराठवाड्यातल्या असंघटीत क्षेत्रातल्या महिला’ या विषयावरील चर्चासत्राच्या उद्घाटनपर भाषणात त्या काल बोलत होत्या. असंघटीत क्षेत्रातल्या महिलांकरता कायदे होणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त करतानाच त्यांनी, या महिलांनी, आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन स्थानिक समितीकडे तक्रार करण्याचं आवाहन केलं.

 ‘आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातल्या महिला शेतकऱ्यांचे प्रश्न’ या विषयावरच्या दोन दिवसीय चर्चासत्राचं उदघाटनही काल रहाटकर यांच्या हस्ते झालं. महसूल प्रबोधिनीच्या सभागृहातल्या या चर्चासत्रात बोलतांना रहाटकर यांनी या महिलांच्या सक्षमीकरणासाठी क्षमताबांधणी आणि प्रशिक्षणाचे कार्यक्रम स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं राबवण्यात येणार असल्याचं सांगितलं.

****

 जालना इथल्या टपाल कार्यालयात कालपासून पारपत्र सेवा केंद्र सुरु झालं. भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, पुणे पारपत्र कार्यालयाचे विभागीय अधिकारी अनंत ताकोले, जालन्याच्या नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल आणि जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या उपस्थितीत या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं.

****

 महिलांच्या ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट तिरंगी मालिकेत काल मुंबईत झालेल्या सामन्यात, ऑस्ट्रेलियानं भारतीय संघाचा ३६ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत, ऑस्ट्रेलियाच्या संघानं १८६ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं, त्याचा पाठलाग करताना भारतीय संघ निर्धारीत २० षटकात १५० धावाच करु शकला.

****

 नांदेड जिल्हा कृषी महोत्सवाचं उद्घाटन जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्या काल हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलतांना त्यांनी जिल्ह्यातल्या कृषि पूरक व्यवसायासाठी शेतकऱ्यांना तांत्रिक तसंच आर्थिक मदत केली जाईल, असं सांगितलं.

****

 गारपिटीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करुन, तालुक्यातल्या संपूर्ण गावांमधल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, या आणि इतर मागण्यांसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं, काल परभणी जिल्ह्यातल्या पालम तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. गारपीटग्रस्तांसाठी शासनानं अनुदान पाठवलं आहे, मात्र  प्रत्यक्ष शेतांना भेटी न देऊन गारपीट झाली नसल्याचा अहवाल प्रशासनानं जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यानं, शेतकऱ्यांपर्यंत हे अनुदान पोहोचलं नसल्याचा आरोप, भाजपचे नेते गणेश रोकडे यांनी यावेळी केला.

****

 औरंगाबाद महानगरपालिकेचा २०१८-१९ या वर्षासाठीचा १ हजार ७४ कोटी ७४ लाख रुपयांचा अर्थसंकल्प पालिकेचे प्रभारी आयुक्त नवलकिशोर राम यांनी स्थायी समितीच्या बैठकीत काल सादर केला. यात गेल्या आर्थिक वर्षात अपूर्ण राहिलेल्या कामांसाठी ४१४ कोटी रुपये, विकास योजनांच्या भूसंपादनासाठी २५ कोटी रुपये, रस्ते दुरुस्तीसाठी ९ कोटी रुपये, जलनिस्सारण देखभाल दुरुस्तीसाठी ११ कोटी, २५ लाख रुपये, उद्यानांसाठी १४ कोटी, ५५ लाख रुपये,  महिला आणि बालकल्याण योजनेसाठी ६ कोटी; तर दिव्यांगांसाठी ९ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद आहे.

****

 औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यातल्या उंडणगाव इथं विहिरीत पडून काल दोन जणांचा मृत्यू झाला. स्वत:च्याच शेतात काम करत असलेल्या, छाया भारती या पाणी पिण्यासाठी विहिरीवर गेल्या असता, पाय घसरून विहिरीत पडल्या .त्यांना वाचवण्यासाठी गेलेले, संतोष धनवई हे देखील पोहता येत नसल्यामुळे विहिरीत बुडून मृत्यू पावले.

****

 औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी पाच महिला उमेदवार रिंगणात आहेत. काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तीन जणींनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. नगरसेवकांच्या २३ जागांसाठी एकूण ५४ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

*****

***

No comments: