Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 25 March 2018
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ मार्च २०१८ सायंकाळी
५.२५ मि.
****
विमा नियामक मंडळ आणि विकास प्राधिकरण
- आय आर डी ए आयनं विविध विमा पॉलिसींना १२ अंकी विशेष ओळख क्रमांक म्हणजेच आधार पत्राशी जोडण्याची अंतिम मुदत वाढवली
आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत ही मुदत वाढवण्यात आली असल्याचं, याबाबतच्या वृत्तात
आहे. यापूर्वी
आधार जोडण्याची अंतिम तारीख ३१ मार्च निश्चित करण्यात आली होती. विमा नियामक मंडळानं प्रसिध्द केलेल्या
पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. पॉलिसी धारकांना आपलं खातं सुरू केलेल्या तारखेपासून
सहा महिन्याच्या आत कायम खाते क्रमांक - पॅन किंवा अर्ज क्रमांक ६० जमा करणं अनिवार्य असल्याचं
नियामक मंडळानं म्हटलं आहे.
****
भारतीय विशेष ओळख पत्र प्राधिकरणानं
आधार पत्रातली
माहिती लीक होण्याबाबतच्या
सर्व वृत्तांचं खंडन केलं आहे. आधार पत्राची माहिती पूर्णपणे सुरक्षित असून, गोपनीय माहिती लीक होऊ शकत
नसल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे.
****
नरेंद्र मोदी ॲपच्या माध्यमातून
पंतप्रधानांचे लाखो प्रशंसक आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना थेट पंतप्रधानांशी संवाद
साधण्याची संधी मिळते, या माहितीचा वापर केवळ विश्लेषणासाठी केला जात असल्याचं भारतीय
जनता पक्षानं म्हटलं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या ॲपचा दुरुपयोग होत
असल्याचा आरोप केल्यानंतर, भाजपनं हे स्पष्टीकरण दिलं. या अॅपवरुन भारतीयांची वैयक्तिक
माहिती चोरली जात असल्याचा आरोप गांधी यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.
****
कोणत्याही
विकासाला आपला विरोध नाही, परंतु व्यवहार्यतेचा विचार झाला पाहिजे, असं राष्ट्रवादी
काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज पालघर इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या
मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. मुंबई - बडोदा
महामार्ग, औद्योगिक मार्गिका, तसंच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन या तीन प्रकल्पांमुळे
डहाणू तसंच पालघर भागातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणावर जाणार असल्यानं,
जनतेत असंतोष आहे. भाजप सरकारच्या काळात पालघरमधले अनेक कारखाने, उद्योग बंद
झाल्यानं नवीन रोजगारनिर्मितीचं स्वप्न भंग पावल्याची टीका, पवार यांनी ट्विटरवरच्या
संदेशातून केली आहे.
****
पोलिस दलात नागरिकांना अत्याधुनिक
ई तक्रार नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं
असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं आज पोलिस आयुक्तालय
आणि पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या पोलिस भवनाचं भूमिपूजन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते
झालं, त्यावेळी ते बोलत होते. गुन्हेगार शोधण्यासाठी राज्यात क्राईम ॲण्ड क्रिमिनल
ट्रॅकींग नेटवर्क ॲण्ड सिस्टम - सीसीटीएनएस या प्रणालीचा प्रभावीपणे वापर सुरु असल्याचं
त्यांनी सांगितलं.
****
दलित अत्याचार प्रतिबंध कायदा
- ॲट्रॉसिटीबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालावर केंद्र सरकार पुनर्विचार याचिका
दाखल करणार असून, महाराष्ट्र सरकारलाही अशी याचिका दाखल करण्याची विनंती करणार असल्याचं
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते आज उस्मानाबाद
इथं वार्ताहरांशी बोलत होते. भीमा कोरेगाव दंगली प्रकरणी सखोल चौकशी करण्याची गरज असून,
दोषी आढळल्यास संभाजी भिडे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी
यावेळी केली. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजपच सत्तेवर येईल, असा विश्वास त्यांनी
व्यक्त केला.
****
जालना जिल्ह्यात रामनवमी उत्साहात
साजरी झाली. जालना शहरातल्या आनंदवाडी इथल्या श्रीराम मंदिरात रामजन्मोत्सव सोहळ्याचं
आयोजन करण्यात आलं होतं. या वेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर, पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे
यांच्यासह भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती.
****
नागरिकांनी देश हिताचा विचार
करुन एकत्र येऊन काम केल्यास भारत हा महासत्ता म्हणून उदयाला येईल, असं मत केंद्र सरकारचे
माजी सचिव डॉ. कमल टावरी यांनी व्यक्त केलं आहे. लातूर इथं आज विश्वशांती केंद्र, माईर्स
एमआयटी यांच्या वतीनं टावरी यांना आणि पुण्याचे माजी अतिरिक्त विभागीय आयुक्त शाम देशपांडे
यांना समर्पित जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
****
जालना औद्योगिक वसाहतीमधल्या
दोन कंपन्यांमध्ये तीन दिवसांपूर्वी सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या टोळीतल्या सात संशयितांना
जालना पोलिसांनी मुंबईच्या घाटकोपर भागातून अटक केली आहे. संशयितांकडून पोलिसांनी चोरीस
गेलेल्या १३ लाख ८७ हजार रुपयांच्या मुद्देमालासह एक ट्रक जप्त केल्याची माहिती स्थानिक
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी आज दिली.
****
महिला क्रिकेट मालिकेतील तिरंगी
ट्वेंटी-ट्वेंटी श्रृंखलेतील दुसऱ्या सामन्यात आज भारताला इंग्लंडकडून पराभव पत्करावा
लागला. सात गडी राखून इंग्लंडनं भारताचा पराभव केला.
****
No comments:
Post a Comment