Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 27 March 2018
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ मार्च २०१८ सायंकाळी
५.२५ मि.
****
दोन
सज्ञान व्यक्तींनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय त्यांच्या मर्जीनं घेतला असेल तर
त्यामध्ये कुणीही हस्तक्षेप करू शकत नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. शक्ती
वाहिनी नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेनं खाप पंचायतीविरोधात याचिका दाखल केली होती.
यासंदर्भात सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षेखालील समितीनं आज हा निर्णय दिला.
या प्रकरणावर केंद्र सरकार कायदा करत नाही, तोपर्यंत न्यायालयाचे निर्णय लागू राहणार
असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.
****
आयकरदात्यांना
आयकर विवरणपत्रं दाखल करता यावीत आणि त्यासंबंधीची सर्व कामं पूर्ण करता यावीत यासाठी,
आयकर विभागाची देशभरातली कार्यालयं येत्या २९, ३० आणि ३१ मार्चला सुरु राहणार आहेत.
या विभागाचे चौकशी कक्षही तीनही दिवस सुरु राहणार असल्याचं अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या
निवेदनात म्हटलं आहे.
****
दहावी
तसंच बारावी परीक्षेत होणारी कॉपी तसंच पेपरफुटी प्रकरणांना प्रतिबंध करण्यासाठी सरकार
कठोर कायदा आणण्याच्या प्रयत्नात असल्याचं, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधान
परिषदेत सांगितलं. अशा प्रकरणांमुळे अभ्यासू विद्यार्थ्यांचं नुकसान होत असल्याबद्दल
शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालिन चर्चेला ते उत्तर देत होते.
प्रश्नपत्रिका फुटणं किंवा कॉपी प्रकरणांमुळे परीक्षा केंद्र आयत्या वेळी बदलणाऱ्या
अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, पेपर फुटीनंतर राज्यातल्या सगळ्या केंद्रांऐवजी
फक्त पेपर ज्या केंद्रावर फुटला तिथलाच पेपर बदलण्याचा विचार होईल असं तावडे यांनी
यावेळी सांगितलं. या प्रकरणांमध्ये कठोर कारवाई करण्यासाठी आणि कॉपीमुक्त महाराष्ट्रासाठी
शिक्षक आमदारांनी सहकार्य करावं, असं आवाहन तावडे यांनी यावेळी केलं.
****
विधानसभा
अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या विरोधात
विरोधी पक्षांनी दाखल केलेला अविश्वास ठराव आज मागे घेण्यात आला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण
विखे पाटील यांनी ही घोषणा केली. याविषयावर झालेल्या चर्चेनंतर हा ठराव मागे घेण्याचा
निर्णय झाल्याचं, विखे पाटील यांनी सभागृहात सांगितलं.
****
राज्यात
तूर खरेदी आणि तूर भरडाई प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते
धनंजय मुंडे यांनी केला आहे. आज विधान परिषदेत बोलताना मुंडे यांनी, पणन महासंघानं
तूर भरडाईसाठी फेरनिविदा काढून ठराविक ठेकेदारांना लाभ मिळवून देण्यासाठी, प्रतिदिन
भरडाईची मर्यादा पन्नास मेट्रिक टनावर आणल्याचा आरोप केला. या संदर्भात पणन महासंघाचे
प्रभारी सरव्यवस्थापक अनिल देशमुख यांना निलंबित करावं, संबंधित संस्थेला दिलेलं तूर
भरडाईचं कंत्राट रद्द करून, कंपनीच्या आयात निर्यात व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी
मुंडे यांनी केली आहे.
****
राज्याच्या
अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या वतीनं ‘सर्व्ह सेफ फूड’ या प्रकल्पाअंतर्गत रस्त्यावर
खाद्यपदार्थ विक्रेत्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठीच्या मोबाईल व्हॅनचं
उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज विधान भवन परिसरात करण्यात आलं.
राज्यातल्या सुमारे साडे तीन हजारावर खाद्यपदार्थ विक्रेत्यांना स्वच्छ आणि आरोग्यदायी
पद्धतीनं अन्न पदार्थ बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
****
व्यासंगी
प्राध्यापक, कृतीशील विचारवंत आणि परखड समीक्षक म्हणून एक स्वतंत्र ओळख निर्माण केलेले
डॉ गंगाधर पानतावणे यांच्या निधनानं आंबेडकरी चळवळ आणि साहित्याला वैचारिकतेचं अधिष्ठान
देणारा एक ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
पानतावणे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. पानतावणे यांच्या निधनानं आंबेडकरी चळवळीचा
मार्गदर्शक हरपला, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी, तर पानतावणे
यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रातला हिरा निखळला, अशा शब्दांत ग्रामविकास
मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
****
लातूर
इथल्या नियोजित मेट्रो रेल्वे डबेबांधणी कारखान्याचं भूमिपूजन येत्या शनिवारी ३१ तारखेला
होणार आहे. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आज लातूर इथं वार्ताहर परिषदेत
ही माहिती दिली. या कारखान्यामुळे १५ हजार तरुणांना रोजगार मिळणार असून, यासोबतच ४८
विविध सहउद्योगही सुरु होणार असल्याचं निलंगेकर यांनी सांगितलं.
****
जालना
जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातल्या ५० गावांची नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत
निवड झाली आहे. घनसावंगी पंचायत समिती कार्यालयात आयोजित पाणीटंचाई आढावा बैठकीत आमदार
राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. पाणीटंचाई असलेल्या गावात आवश्यक उपाययोजना तत्काळ
करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
****
मरावाड्यात
आज परभणी इथं सर्वाधिक ४० पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, उस्मानाबाद
इथं ३९, तर औरंगाबाद इथं ३८ पूर्णांक ३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं.
****
No comments:
Post a Comment