Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 30 March 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० मार्च २०१८ सकाळी ६.५० मि.
*****
· जळगाव इथल्या डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महविद्यालयाची
मान्यता आणि संलग्नता रद्द करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश
· सरकारनं मागण्या तत्वतः मान्य केल्यामुळे जेष्ठ सामाजिक
कार्यकर्ते अण्णा हजारे यांचं उपोषण मागे
· औरंगाबाद शहरात चिकलठाणा विमानतळाजवळच्या दुग्धनगरीच्या
आरक्षित जागेत कचरा विघटन प्रकल्प उभारण्याचा विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालच्या
समितीचा निर्णय
आणि
· जालना जिल्ह्यात भोकरदन- सिल्लोड रस्त्यावर दोन दुचाकींच्या
अपघातात तीन जण ठार
****
जळगाव इथल्या डॉक्टर उल्हास
पाटील वैद्यकीय महविद्यालयाची मान्यता आणि संलग्नता रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च
न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत. या महाविद्यालयानं २०१२ साली गुणवत्ता
यादीऐवजी असोसिएट सी ई टी मध्ये कमी गुण मिळालेल्या २० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला
होता. या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्याचा प्रवेश नियंत्रण समितीचा निर्णयही कायम
ठेवला आहे. याचबरोबर याप्रकरणी गुणवत्ता असूनही प्रवेश नाकारल्यामुळे न्यायालयात याचिका
दाखल केलेल्या तेजस्विनी फड या विद्यार्थीनीस २० लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्याचे
आदेशही न्यायालयानं दिले आहेत. या निर्णयामुळे एम बी बी एस ही पदवी मिळालेल्या या २०
विद्यार्थ्यांना आपली पदवी गमवावी लागणार आहे.
****
लोकपाल कायद्याच्या अंमलबजावणीसह
इतर विविध मागण्यांसाठी नवी दिल्ली इथं रामलीला मैदानावर गेले सात दिवस उपोषण करणारे
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी त्यांचं उपोषण काल मागे घेतलं. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश
महाजन यावेळी उपस्थित होते. आपल्या ११ मागण्या सरकारनं तत्वतः मान्य केल्या असल्याची
माहिती अण्णा हजारे यांनी उपोषण सोडल्यानंतर दिली.
****
राज्यात १६ जिल्ह्यांमधल्या
अंगणवाड्यांमध्ये २५ हजारहून अधिक परसबागा तयार करण्याच्या दृष्टीनं महिला आणि बालविकास
मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रिलायन्स फाउंडेशन आणि महिला – बालकल्याण
विकास विभाग यांच्यामध्ये काल मुंबई इथं सामंजस्य करार करण्यात आला. राज्य शासनामार्फत
राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्येदेखील ही योजना राबवण्यात येईल, अशी माहिती पंकजा मुंडे
यांनी दिली.
आता ही योजना मराठवाड्यातल्या
परभणी, उस्मानाबाद सह बीड, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे.
ग्रामीण भागात ज्या अंगणवाड्यांना
परसबागांसाठी जागा नाही, त्यांना ग्रामपंचायतींमार्फत जागा उपलब्ध करुन देण्यात येईल,
असं पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं.
****
उद्या म्हणजे ३१ मार्च रोजी
बँकांचे व्यवहार रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहणार असून रात्री बारा वाजेपर्यंत इलेक्ट्रॉनिक
व्यवहार करता येतील, असं भारतीय रिर्झव्ह बँकेनं कळवलं आहे. दोन एप्रिल रोजी बँकांना
सुटी जाहीर करण्यात आली असून, ग्राहकांना कोणताही व्यवहार करता येणार नाही मात्र वर्षांचा
ताळेबंद पूर्ण करण्यासाठी बँकाचं अंतर्गत कामकाज सुरू राहणार असल्याचंही रिर्झव्ह बँकेनं
म्हटलं आहे.
****
औरंगाबाद शहरातल्या चिकलठाणा
विमानतळाजवळच्या दुग्धनगरीच्या प्रस्तावित आरक्षित जागेत कचरा विघटन करणारा प्रकल्प
उभारण्यात येणार आहे. कचरा प्रश्न सोडवण्यासाठी शासनानं गठीत केलेल्या विभागीय आयुक्तांच्या
अध्यक्षतेखालच्या समितीनं काल हा निर्णय घेतला. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी बैठकीनंतर
ही माहिती दिली. सध्या शहरात काही ठिकाणी खड्डे खोदून ओला कचरा त्यात टाकून त्याचं
खतात रुपांतर करण्याची प्रकिया सुरू करण्यात आली आहे. ही पद्धत यापुढेही सुरु राहणार
असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं.
****
औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळावर भारतीय विमानतळ
प्राधिकरणातर्फे काल १०० फूट उंचावर राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. भारतीय
विमानतळ प्राधिकरणाचे पश्चिम क्षेत्राचे कार्यकारी संचालक केशव शर्मा यांच्या हस्ते
या ध्वजाचं लोकार्पण झालं. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम
भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, विमानतळाचे
निदेशक डी. जी. साळवे उपस्थित होते. देशातल्या
१२० विमानतळापैकी २९ विमानतळांची शंभर फूट उंच राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी निवड केली
होती, त्यामध्ये औरंगाबाद विमानतळाचा समावेश करण्यात आला होता.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती
काल सर्वत्र भक्तिभावानं विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. औरंगाबाद
इथं यानिमित्त पैठणगेट परिसरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. बाबा
पेट्रोल पंप परिसरातल्या भगवान महावीर चौकात
ध्वजारोहणही करण्यात आलं.
****
शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणं
ही प्रशासनासोबतच अधिकाऱ्यांचीही नैतिक जबाबदारी असल्याचं लातूरचे पालकमंत्री संभाजी
पाटील निलंगेकर यांनी म्हटलं आहे. लातूर इथं काल रमाई घरकुल योजनेअंतर्गत ६४८ लाभार्थ्यांना
निलंगेकर यांच्या हस्ते धनादेशाचं वाटप करण्यात आलं, त्यावेळी
ते बोलत होते. लातूर जिल्ह्यातला एकही लाभार्थी या योजनेतून वंचित राहू नये, याची
महानगरपालिकेनं दक्षता घ्यावी, असं ते म्हणाले.
****
बीड जिल्ह्यातल्या रेल्वे कामांसाठी केंद्र आणि राज्य
सरकार पुढाकार घेत असून आगामी वर्षात जिल्ह्यात रेल्वे नक्कीच धावेल, असं खासदार प्रीतम
मुंडे यांनी म्हटलं आहे. बीड इथल्या पारपत्र कार्यालयाचं उद्घाटन काल त्यांच्या हस्ते
झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. मराठवाड्यातलं हे दुसरं पारपत्र कार्यालय असून अनेक
वर्षांची मागणी पूर्ण झाली असल्याचं मुंडे यावेळी बोलतांना म्हणाल्या.
****
वैद्यकीय क्षेत्रातल्या उत्कृष्ट कार्याबद्दल उस्मानाबाद
जिल्ह्याच्या भूम तालुक्यातल्या वालवड प्राथमिक आरोग्य केंद्राला तसंच लोहारा तालुक्यातल्या
स्पर्श ग्रामीण रूग्णालयाला जिल्हास्तरीय डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कारानं गौरवण्यात
आलं आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्षा अर्चना पाटील आणि कार्यकारी
अध्यक्ष संजय कोलते यांच्या हस्ते काल या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. जिल्ह्यातल्या
प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वच्छता, दर्जेदार सेवा आणि गुणवत्ता पुरवणाऱ्या विविध आरोग्य
केंद्रांचा या कार्यक्रमात गौरव करण्यात आला.
****
नांदेड जिल्ह्यात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांवर धर्माबाद
पोलिसांनी कारवाई करत काल १८ जणांना अटक केली.
याशिवाय नऊ जेसीबी मशीन, २३ टिप्पर आणि ट्रॅक्टर, आठ मोटरसायकल आणि दहा हजार
ब्रास वाळू जप्त केली आहे. बिलोली, नायगाव
आणि उमरी तालुक्यात लिलाव न झालेल्या पट्ट्यावर गेल्या काही दिवसांपासून अवैध वाळू
उपसा सुरू असल्याच्या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी ही कारवाई केली.
****
ज्ञानवाणी, औरंगाबाद एफ एम रेडिओ केंद्राचं प्रसारण आज
सकाळी सहावाजेपासून १०५ पूर्णांक ६ मेगाहर्ट्झवर पुन्हा सुरु झालं आहे. इंदिरा गांधी
राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचं हे शैक्षणिक प्रसारण असून या केंद्रातून पत्रद्वारा प्रशिक्षण
घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम प्रसारित केले जातात. याशिवाय संगीतविषयक तसंच
प्रबोधनात्मक कार्यक्रमही प्रसारित केले जातात. दररोज सकाळी सहा ते १० आणि सायंकाळी
सहा ते रात्री १० वाजेपर्यंत या ज्ञानवाणी केंद्राचे कार्यक्रम श्रोत्यांना ऐकता येतील.
****
अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत राज्य शासनाची भूमिका
सकारात्मक असल्याचं पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी म्हटलं आहे. जालना जिल्हा परिषदेच्या महिला, बालकल्याण
विभागाच्या वतीनं आयोजित आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार वितरण कार्यक्रमात काल ते
बोलत होते. अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांसाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल, असं
आश्वासन खोतकर यांनी या वेळी दिलं. उत्कृष्ट
कार्य करणाऱ्या २४ अंगणवाडी केंद्रांसह, १२ पर्यवेक्षिका आणि २४ अंगणवाडी सेविकांचा
या कार्यक्रमात राज्यमंत्री खोतकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
****
जालना जिल्ह्यात भोकरदन- सिल्लोड रस्त्यावर मालखेडा गावाजवळ
काल झालेल्या दोन दुचाकींच्या अपघातात तीन जण ठार तर दोन जण जखमी झाले. सायंकाळी साडे
पाच वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातात ठार झालेले तिन्ही तरूण हे एकाच कुटुंबातले
असून लग्नपत्रिका वाटप करून ते गावी जात असतांना हा अपघात घडला.
//************//
No comments:
Post a Comment