Thursday, 22 March 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 22.03.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२२   मार्च   २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



राज्यात अंगणवाडी सेविकांना लावलेला आवश्यक सेवा कायदा - मेस्मा रद्द करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत ही घोषणा केली. हा कायदा रद्द करण्याची मागणी शिवसेनेसह विरोधी पक्षांनी लाऊन धरली होती. 

****



 जागतिक जल दिन आज पाळण्यात येत आहे. पाण्याचं महत्व आणि वारपाबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी २२ मार्च रोजी हा दिवस पाळला जातो. नेचर फॉर वॉटर अर्थात २१व्या शतकात जगाला भेडसावणाऱ्या पाण्याच्या समस्यांवर निसर्ग आधारित उपाय शोधणं ही यावर्षीची संकल्पना आहे. पाण्याचं महत्व अधोरेखित करण्याचा, तसंच पाणी बचतीबाबत सगळ्यांची कटीबद्धता दृढ करण्याचा हा दिवस असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटरवरील संदेशात म्हटलं आहे.

****



 औरंगाबाद शहरातला कचऱ्याचा प्रश्न कृतीबध्द कार्यक्रमानुसार मार्गी लावण्याचे निर्देश, मुख्य सचिव सुमित मलिक यांनी काल दिले. या कचऱ्याच्या प्रश्नासंदर्भात काल मुंबईत बैठक झाली. नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसेकर यांनी औरंगाबाद इथला कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी, पंचसूत्री तयार केली असून, या पंचसूत्रीनुसार हा कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देशही मलिक यांनी दिले.

****



 नांदेड जिल्ह्यातल्या दहा तालुक्यांमधल्या एक हजार १६८ गावांची खरीप हंगामातली अंतिम पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आल्यामुळे प्रशासनानं ही गावं दुष्काळग्रस्त जाहीर केली आहेत. या गावांसाठी दुष्काळी उपाययोजना करण्यात येणार असून, विविध आठ प्रकारच्या सवलती देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी वार्ताहर परिषदेत दिली.

****



 बीड इथल्या सानप रुग्णालयात बेकायदेशिर गर्भपात प्रकरणी बीड जिल्हा आणि सत्र न्यायालयानं डॉक्टर शिवाजी सानप याना दोषी ठरवलं असून, आज त्यांना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. २०११ मध्ये या रुग्णालयात एकाच दिवशी हे तीन गर्भपात झाल्याचं उघडकीस आलं होतं. 

****



 सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यात कूळकजाई इथल्या तलाठी आणि कोतवालास तीन हजार रुपयाची लाच स्वीकारताना सातारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली. शेततळ्याची नोंद करण्यासाठी माजी सैनिकाकडून त्यांनी ही लाच मागितली होती.

*****

***




No comments: