Tuesday, 27 March 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 27.03.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 March 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ मार्च २०१ दुपारी १.०० वा.

****



 विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आजही बाधित झालं. लोकसभेत  कामकाज  सुरु  होताच  अखिल  भारतीय  अण्णा  द्रमुक  मुनेत्र कळघम - एआयएडीएमकेच्या सदस्यांनी कावेरी पाणीप्रश्नी व्यवस्थापन मंडळ स्थापन करण्याची मागणी करत गदारोळ केला. सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनासमोर हौद्यात उतरुन फलक झळकावल्याण अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सदनाचं कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत स्थगित केलं, मात्र कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही गदारोळ सुरूच होता.

 काँग्रेस पक्षाचे नेते मल्लिकाजुर्न खरगे यांनी अविश्वास प्रस्तावावर पुढे कार्यवाही करण्याची मागणी केली. मात्र अध्यक्षांनी या प्रस्तावासाठी आवश्यक ५० सदस्यांचा पाठिंबा मोजता येत नसल्यानं, या प्रस्तावावर कार्यवाही करण्यास असमर्थ असल्याचं सांगितलं. गदारोळ वाढत गेल्यानं, अखेरीस अध्यक्षांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं. ही कोंडी फोडण्यासाठी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी आपल्या कक्षात पक्षनेत्यांची बैठकही घेतली.

 राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनीही आज सकाळी गदारोळामुळे सदनाचं कामकाज १५ मिनिटांसाठी स्थगित करून, पक्षनेत्यांची बैठक घेऊन चर्चा केली. मात्र त्यानंतर कामकाज सुरु झाल्यावनंतरही विरोधक आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं. दरम्यान, राज्यसभेत कार्यकाळ पूर्ण होत असलेल्या सुमारे ४० सदस्यांना आज निरोप दिला जाणं अपेक्षित होतं.

****

 सरकार लोकसभेत अविश्वास प्रस्तावाचा सामना करण्यास तयार असल्याचं संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी म्हटलं आहे. ते आज संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला सदनात दोन तृतीयांश बहुमत प्राप्त असून, या प्रस्तावावर चर्चा करण्यास सरकारला कोणतीच अडचण नसल्याचं ते म्हणाले.  

****



 राज्य विधानसभेत आजही अविश्वास प्रस्तावाच्या मुद्यावरून चर्चा सुरू राहिली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार यांनी सरकारनं ज्या पद्धतीनं विश्वासदर्शक ठराव मंजूर केला, त्यावर पुन्हा टीका केली, तर मुख्यमंत्र्यांनी सरकारनं संवैधानिक रित्या हा ठराव मंजूर केल्याचं सांगितलं.

****



 कर्नाटक विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर झाला. विधानसभेच्या २२४ जागांसाठी येत्या १२ मे रोजी मतदान होणार आहे, तर मतमोजणी १५ मे रोजी होणार आहे. या निवडणुकीची अधिसूचना १७ एप्रिलला जारी होणार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी आज वार्ताहर परिषदेत सांगितलं. या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र - इव्हीएम आणि मतदानाची पोचपावती देणारं यंत्र - व्हीव्हीपॅटचा वापर होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****



 छत्तीसगडमध्ये दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात, केन्द्रीय राखीव पोलिस दलातला एक अधिकारी जखमी झाला. कोंडासावली परिसरात रस्ते बांधकामाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांवर नक्षलवाद्यांनी यावेळी गोळीबारही केला. या घटनेनंतर, कोंडासावली इथं, सुरक्षा दलाची अतिरिक्त कुमक पाठवली असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

****

 ठाणे पोलिसांनी आज दाईघर परिसरातून स्वदेशी बनावटीचे २९२ बॅाम्ब जप्त केले. यासंदर्भात एका व्यक्तीलाही पोलिसांनी अटक केली आहे. प्रवीण पाटील असं त्याचं नाव असून, हे कमी क्षमतेचे हे बॉम्ब जंगली जवानरांना मारण्यासाठी असल्याचं त्यानं सांगितलं. विस्फोटकांचा अवैध व्यापार होत असल्याच्या संशयावरुन पोलिस त्याची चौकशी करत आहेत.

****



 औरंगाबाद इथले ज्येष्ठ साहित्यिक डॉ गंगाधर पानतावणे यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी नागरिकांनी गर्दी केली आहे. विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी पानतावणे यांचं अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. अस्मितादर्शचे संस्थापक संपादक असलेले पानतावणे यांचं वयाच्या एक्क्यांशीवाव्या वर्षी, आज पहाटे रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं, आज सायंकाळी छावणी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****



 इंडियन प्रीमिअर लीग - आयपीएलच्या अकराव्या मालिकेतून स्टीव्ह स्मिथनं माघार घेतली आहे. ही स्पर्धा पुढच्या महिन्याच्या सात तारखेला सुरू होणार आहे. राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार असलेल्या स्मिथनं दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात चेंडू कुरतडल्याचं मान्य केलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद - आयसीसीनं त्याच्यावर एका कसोटी सामन्याची बंदी घातल्यानंतर त्यानं हा निर्णय घेतला. आता अजिंक्य रहाणे, राजस्थान संघाचं नेतृत्व करेल.

****



 सिडनी इथं आय एस एस एफ कनिष्ठ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या अनिष भानवालानं पुरूषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. या स्पर्धेत सहा सुवर्ण, तीन रौप्य आणि सहा कांस्य पदकांसह भारतानं १५ पदकांची कमाई करत, पदकतालिकेत दुसरा क्रमांक मिळवला आहे.  

*****

***

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 15 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...