आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२४ मार्च
२०१८ सकाळी
११.०० वाजता
****
जागतिक क्षयरोग दिन आज पाळण्यात येत आहे. क्षयरोगावर
मात करण्यासाठी सर्वांनी मिळून काम करायला पाहिजे, आणि या रोगाचं समूळ उच्चाटन करण्याचं
उद्दीष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या पाहिजे, असं राष्ट्रपती रामनाथ
कोविंद यांनी म्हटलं आहे. क्षयरोग सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातलं मोठं आव्हान असल्याचं,
त्यांनी नमूद केलं. २०२५ पर्यंत देश क्षयरोग मुक्त करण्याचा संकल्प असल्याचं त्यांनी
सांगितलं. यानिमित्त विविध ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
या दिनानिमित्त काल बीड शहरात जनजागृती फेरीचं आयोजन
करण्यात आलं होतं. बीड जिल्हा क्षयरोग नियंत्रण समितीतर्फे आयोजित या फेरीत शालेय तसंच
नर्सिंगचे विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
****
विरोधी पक्ष निवडणुकांमधल्या पराभवांमुळेच सरकारविरोधात
जनतेमध्ये खोटं पसरवत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ते काल
नवी दिल्लीत पक्षाच्या संसदीय समितीच्या बैठकीत बोलत होते. तसंच पक्ष कार्यकर्त्यांनी
जनतेपर्यंत सत्य पोहचवण्यासाठी तंत्रज्ञानाचा परिणामकारक वापर करण्याचं आवाहनही त्यांनी
केलं. पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी या बैठकीत पक्षांच्या खासदारांना त्यांच्या मतदारसंघात
पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्ष संसदेचं कामकाज होऊ देत नसल्याबद्दलची माहिती देण्यास
सांगितलं. यावेळी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी देशातल्या मागास ११५ जिल्ह्यांच्या
विकासाबाबत सादरीकरण केलं.
****
जम्मू काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यात लष्करी जवान
आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. मध्यरात्री ही चकमक झाली.
या परिसरात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळताच लष्करानं शोधमोहीम सुरु केली
होती.
****
काँग्रेस नेते आणि माजी मंत्री
पी. चिदंबरम यांचे पुत्र, कार्ती चिदंबरम यांना दिल्ली उच्च न्यायालयानं आय.एन.एक्स.
मिडीया गैरव्यवहार प्रकरणी जामीन मंजूर केला आहे. कार्ती यांनी १० लाख रुपयांची हमी
भरावी, तसंच देशाबाहेर जायचं असल्यास सीबीआयची परवानगी घ्यावी लागेल, अशी अट न्यायालयानं
घातली आहे. गेल्या २८ फेब्रुवारीला कार्ती यांना सीबीआयनं चेन्नई इथं अटक केली होती.
*****
***
No comments:
Post a Comment