Thursday, 22 March 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 22.03.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 March 2018

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ मार्च २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

ग्रॅच्युइटी अर्थात कर्मचारी उपदान देयक सुधारणा विधेयक संसदेत पारित झाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. हे एक महत्वपूर्ण विधेयक असून, लाखो भारतीयांना याचा फायदा होणार असल्याचं पंतप्रधानांनी ट्विटरच्या संदेशात म्हटलं आहे. राज्यसभेत आज हे विधेयक चर्चेविना पारित करण्यात आलं. लोकसभेत याआधीच हे विधेयक मंजूर झालं आहे. कर्मचारी आणि विशेषत्वानं महिला कर्मचाऱ्यांसाठी हे विधेयक महत्त्वपूर्ण असल्याचं मत कामगार मंत्री संतोष कुमार गंगवार यांनी व्यक्त केलं.

****

भारतीय जवान शहीद झाले किंवा देशाची सुरक्षा करताना बेपत्ता झाले, तर त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाचा संपूर्ण भार यापुढे सरकार उचलणार आहे. अशा जवानांच्या मुलांना दर महिन्याला कमाल १० हजार रुपयांचं शैक्षणिक अनुदान देण्याची मर्यादा हटवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली.

****

सर्व शेती उत्पादनांच्या खरेदीसाठी सरकार योग्य ती पावलं उचलेल आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील, असं आश्वासन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधानसभेत दिलं. २०१७ - १८ या आर्थिक वर्षात आतापर्यंत १२ पूर्णांक ६९ लाख टन तूरडाळ, ५४ हजार टन मूग डाळ आणि पाच पूर्णांक ८६ लाख टन उडीद डाळ सरकारकडून खरेदी करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दरानं शेतकऱ्यांचा माल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर योग्य कारवाई करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचंही देशमुख यांनी सांगितलं.

****

तूर, हरभरा, उडीद आणि सोयाबीनचे भाव अभूतपूर्व पडल्याचं सांगत विधानपरिषदेत आज विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी फेटाळून लावला. यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज एकदा अर्धा तास, तर त्यानंतर १५ मिनिटं तहकूब करावं लागलं. या मुद्यावर अल्पकालीन चर्चा घेण्याची परवानगी सभापतींनी दिली. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, बोंडअळीची मदत नाही, गारपिटीची नुकसान भरपाई नाही, असं सांगत सरकार शेतकऱ्यांना मारत आहे, असा आरोप मुंडे यांनी यावेळी केला.

****

दारिद्र्यरेषेखालच्या मागासवर्गीय आणि नवबौध्द भूमिहीनांना जमीन देण्यासाठी यापुढे शंभर टक्के अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी आज विधानसभेत ही माहिती दिली. या योजनेसाठी २००४ पासून २७४ कोटी रूपये खर्च करण्यात आले. तीन लाख रूपयात ही योजना पूर्ण करण्यात अडचणी असल्यानं, बागायतीकरता आठ लाख आणि कोरडवाहूसाठी पाच लाख रूपये स्थानिक रेडिरेकनरच्या दरानुसार द्यायचा निर्णय राज्य सरकार घेईल, असं त्यांनी सांगितलं.

****

वीज जोडण्यांसाठी पैसे भरले असूनही ज्यांना जोडण्या मिळाल्या नाहीत, अश्या सर्व वीजजोडण्या ऑक्टोबर २०१९ पूर्वी दिल्या जातील, अशी घोषणा उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत केली.

****

स्वच्छ भारत अभियानाविषयी जागृती करण्यासाठी प्रत्येक नागरिकानं प्रयत्नशील असलं पाहिजे असं प्रतिपादन, राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलं आहे. मुंबई इथं आज हिंगोली आणि औरंगाबाद जिल्हा उघड्यावर शौचापासून मुक्त झाल्याबद्दल सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. लोणीकर यांच्या हस्ते यावेळी हिंगोली आणि औरंगाबाद जिल्ह्यात या कामी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या चमूंचा गौरव करण्यात आला.

****

लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आज बीड आणि जालना जिल्ह्यात एक वरिष्ठ अधिकारी, त्याचा सहकारी आणि पोलीस उपनिरीक्षका विरूध्द कारवाई केली आहे.

बीडचे जिल्हा पुरवठा अधिकारी नरहरी शेळके यांना त्यांच्या सहकाऱ्यासह एक लाख पंधरा हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं. एका स्वस्त धान्य दुकानाचा परवाना पूर्ववत करण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. तसंच, जालना जिल्ह्यात शहागड इथल्या गोंदी पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षकाविरूध्द लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अवैध वाळू उपसा प्रकरणी पकडलेला ट्रक सोडवण्यासाठी कोकाटे यानं लाच मागितली होती.

****

औरंगाबाद शहरातल्या कचरा व्यवस्थापनासंदर्भात महानगरपालिकेनं घनकचरा व्यवस्थापन कायदा २०१६ची अंमलबजावणी तीव्र केली आहे. प्रभाग क्रमांक तीन अंतर्गत एका खासगी दवाखाना चालकानं जैविक कचरा रस्त्यावर टाकल्याचं निदर्शनास आल्यानं त्याला १० हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.

****

नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर रस्त्यावर वासाळी गावाजवळील नदीच्या पुलाखाली २६८ काडतुसं सापडली आहेत. पोलिसांनी हा साठा जप्त केला असून, तपास सुरु आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 15 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...