Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 March 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ मार्च
२०१८
दुपारी १.०० वा.
****
राज्यसभेत आज कामकाज सुरु होताच विविध मागण्यांसाठी
विरोधकांनी सुरु केलेल्या घोषणाबाजीतच ग्रॅच्युइटी अर्थात कर्मचारी उपदान देयक सुधारणा
विधेयक कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात आलं. लोकसभेत हे विधेयक आधीच पारित करण्यात
आलं आहे.
दरम्यान, विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज
आज सलग चौदाव्या दिवशीही बाधित झालं. दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात
आलं.
राज्यसभेत तेलगु देसम पक्षाच्या सदस्यांनी आंध्र
प्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी, द्रमुक आणि अण्णाद्रमुकच्या
सदस्यांनी कावेरी जलव्यवस्थापन मंडळाच्या स्थापनेसाठी, सभापतींच्या आसनासमोर हौद्यात
उतरून घोषणाबाजी सुरू केली. सभापती व्यंकय्या नायडू यांनी सदस्यांच्या वागणुकीबद्दल
नाराजी व्यक्त केली. संसदीय कार्य राज्यमंत्री विजय गोयल यांनीही कामकाज चालवण्यासाठी
विरोधकांनी सहकार्य करण्याचं आवाहन केलं, मात्र तरीही गदारोळ सुरुच राहील्याचं राज्यसभेचं
कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं.
****
लोकसभेतही कामकाज सुरु होताच तेलगु देसम पक्ष, द्रमुक
आणि अण्णा द्रमुक पक्षाच्या सदस्यांनी आपल्या विविध मागण्या लाऊन धरत घोषणाबाजी केल्यानं
अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सदनाचं कामकाज सुरवातीला दुपारी १२ वाजेपर्यंत, आणि नंतर
दिवसभरासाठी स्थगित केलं.
****
ब्राम्होस या क्षेपणास्त्राची आज राजस्थानमधल्या
पोखरण इथून यशस्वी चाचणी करण्यात आली. स्वदेशी बनावटीचं हे क्षेपणास्त्र अत्याधुनिक
सोयीसुविधा आणि तंत्रज्ञानानं सुसज्ज आहे. या यशस्वी चाचणीबद्दल संरक्षण मंत्री निर्मला
सितारामन यांनी, सशस्त्र बल, संरक्षण संशोधन विकास संस्था - डीआरडीओचं अभिनंदन केलं
आहे.
****
छत्तीसगढमधल्या सुकमा जिल्ह्यात आज दोन महिलांसह
१५ नक्षलवाद्यांना पकडण्यात आलं. गेल्या आठवड्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या वाहनावर
झालेल्या हल्ल्यात या नक्षलवाद्यांचा हात असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या हल्ल्यात
नऊ जवानांचा मृत्यू झाला होता.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी २५ मार्चला
आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा
हा ४२वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा
कार्यक्रमा प्रसारित होईल.
****
अंगणवाडी सेविकांवर लावण्यात आलेला आवश्यक सेवा कायदा
- मेस्मा रद्द करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत
केली. सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
राज्य सरकारनं अंगणवाडी सेविकांवर मेस्मा लावण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर मित्रपक्ष
शिवसेनेसहित विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली होती. याच मुद्द्यावरुन काल आठ वेळा
सभागृहाचं कामकाज तहकूब झालं होतं.
****
चेन्नईस्थित गोल्ड कनिष्क प्रायवेट लिमिटेडनं केलेल्या
८२४ रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं गुन्हा नोंदवला
असून, तपास सुरु आहे. या कंपनीनं २००९ पासून कर्ज मिळवण्यासाठी आर्थिक कागदपत्रात चुकीची
माहिती दिल्याचा आरोप स्टेट बँकेनं केला आहे. २०१७-१८ मध्ये विविध कर्ज पुरवठादार बँकांनी
या कंपनीचं खातं बोगस आणि अनुत्पादित मालमत्ता म्हणून घोषित केलं.
****
प्राप्तीकर कायदा १९६१ चा आढावा घेण्यासाठी आणि देशाच्या
आर्थिक गरजांच्या अनुषंगानं नवीन प्रत्यक्ष कर कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सरकारनं
एका कृती दलाची स्थापना केली आहे. या नवीन कर कायद्याचा मसुदा तयार करताना संबंधित
घटक आणि सामान्य नागरिकालाही सहभागी करुन घेणं गरजेचं आहे, असं अर्थ मंत्रालयानं जारी
केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट इनकम टॅक्स इंडिया डॉट जीओव्ही
डॉट इन या विभागीय संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या प्रारुप आराखड्यात नागरिकांनी सूचना
आणि प्रतिक्रिया नोंदवाव्यात, असं मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
केंद्र सरकारनं काळ्या मिरी साठीचे आयात नियम आधिक
कठोर केले आहेत. काळ्या मिरीची आयात ५०० रुपये प्रति किलोच्या वर नि:शुल्क असेल आणि
त्यापेक्षा कमी किंमतीची आयात करता येणार नाही, असं परराष्ट्र व्यापार महासंचालनालयानं
म्हटलं आहे. देशाअंतर्गत उत्पादकांना मदत करण्यासाठी सरकारनं मिरीसाठी ५०० रुपये प्रति
किलो इतकं किमान आयात मूल्य निश्चित केलं आहे. कर्नाटक आणि केरळ ही देशातली प्रमुख
मिरी उत्पादक राज्य आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment