Sunday, 25 March 2018

AIR NEWS BULLETIN, AURNAGABAD 25.03.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 March 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५  मार्च २०१ सकाळी .५० मि.

*****

Ø राज्यात प्लास्टिक आणि थर्माकोल बंदी लागू झाल्याची अधिसूचना जारी

Ø  अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या गैरवापराबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाविरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल करणार- केंद्रीय राज्यमंत्री  रामदास आठवले

Ø  मराठी वृत्तपत्रांमधल्या मांडणी आणि सजावटीचे शिल्पकार, औरंगाबादचे ज्येष्ठ पत्रकार विद्याधर सदावर्ते यांचं दीर्घ आजारानं निधन

आणि

Ø  ऑस्ट्रेलियातल्या कनिष्ठ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत मनू भाकरला वैयक्तिक तसंच सांघिक गटात सुवर्ण पदक, गौरव राणाला रौप्य तर अनमोल जैनला कांस्य पदक

*****

      संपूर्ण राज्यात प्लास्टिक आणि थर्माकोल बंदी लागू झाली असून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे, असं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी काल मंत्रालयात वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले असल्याचं कदम म्हणाले. लग्न आणि महत्त्वाच्या कार्यक्रमात सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या थर्माकोलवर तसंच पिण्याच्या पाण्याच्या छोट्या बाटलीवर पूर्ण बंदी असून मोठ्या बाटलीवरच्या बंदीसाठी तीन महिन्यांचा अवधी दिला असल्याचं ते म्हणाले.

****

 अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम -ॲट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापराबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाविरुद्ध आपला पक्ष पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री  रामदास आठवले यांनी सांगितलं. मुंबईत काल ते वार्ताहरांशी बोलत होते.

 केंद्र सरकार अनुसूचित जाती-जमातींच्या हितासाठी दक्ष आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या  निर्णयावरून काँग्रेस पक्षानं राजकारण करू नये, असं आठवले म्हणाले.

****



 राज्यातल्या क्षयरोग निर्मुलनासाठी शासन प्रयत्नशील असून, याबाबत शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात वैद्यकीय अधिकारी यांच्यासह आशा कर्मचारी यांच्याकडून क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यात येत असल्याचं आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं काल क्षयरोग दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.  क्षयरोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध प्रकारच्या उपचार पद्धती उपलब्ध झाल्या असून, जनजागृतीच्या माध्यमातून नागरिकांच्या मनातील गैरसमज दूर करण्याचं काम आरोग्य विभागानं सुरु केलं असल्याचं ते म्हणाले.

 नांदेड इथंही यानिमित्त जनजागृती फेरी काढण्यात आली होती. क्षयरोग निमुर्लनासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज असल्याचं मत नांदेड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. आर. मेकाने यांनी यावेळी व्यक्त केलं.

****



 औरंगाबाद शहरातला कचऱ्याच्या प्रश्नासंदर्भात आढावा बैठकही पालकमंत्री डॉक्टर सावंत यांनी घेतली. यावेळी बोलतांना त्यांनी हा प्रश्न परस्पर सहकार्यानं सोडवण्याचं आवाहन केलं. जिल्हाधिकारी आणि प्रभारी महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी यावेळी बोलताना, शहरात साठलेल्या १५ हजार १६८ टन कचऱ्यापैकी १४ हजार ४६६ टन कचऱ्याची विल्हेवाट लावली असल्याचं सांगितलं. 

****

 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ४२वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****



 मराठी वृत्तपत्रांमधल्या मांडणी आणि सजावटीचे शिल्पकार, औरंगाबादचे ज्येष्ठ पत्रकार श्री विद्याधर सदावर्ते यांचं आज पहाटे एक वाजता दीर्घ आजारानं निधन झालं. ते ८० वर्षांचे होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते मधुमेहाच्या आजारानं ग्रस्त होते. मांडणी आणि सजावटीबरोबरच बातम्यांना अचूक आणि आकर्षक मथळे देण्यातही त्यांचा हातखंडा होता. याशिवाय बातमीत रंजकता निर्माण करून ती अधिक वाचनीय करण्यातही ते प्रविण होते. अजिंठा या वृत्तपत्रातून पत्रकारितेला प्रारंभ केल्यानंतर सदावर्ते यांनी दैनिक लोकमत या वृत्तपत्रांमधून दीर्घकाळ पत्रकारीता केली. त्यानंतर देवगिरी तरूण भारत, सांजवार्ता यासारख्या वृत्तपत्रांमध्येही संपादक म्हणून त्यांनी काही काळ काम केलं. प्रारंभीच्या काळात शासकीय नोकरीच्या अनेक संधी नाकारत त्यांनी पत्रकारीतेला समर्पित होण्याचा निर्णय घेतला आणि शेवटपर्यंत ते त्या निर्णयाशी बांधिल राहिले. सुंदर हस्ताक्षराची उपजत देणगी लाभलेले सदावर्ते औरंगाबादच्या पत्रकार सृष्टीत विद्याभाऊ या नावानं परिचित होते. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी १२ वाजता प्रतापनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 देशात धर्म आणि जातींच्या कल्पना कायम राजकारणाच्या हितासाठी वापरण्यात आल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार निळू दामले यांनी व्यक्त केलं. ते काल औरंगाबाद इथं ‘भारताचे मतमानस’  या विषयावर बापू- सुधा काळदाते प्रतिष्ठाननं आयोजित केलेल्या व्याख्यानात बोलत होते.  जात धर्माच्या ताण- तणावाखाली जगण्याची सवय आपल्याला लागल्याचं सांगतांना ते म्हणाले.

जातीतल्या धर्माच्या या ताण-तणावा सकट जगण्याची एक सवय जी भारताला लागली ती बाहेरच्या जगामध्ये कुठे लागलेली नाही. पण या जातीबीती सकट या देशामध्ये हजार दोन हजार वर्ष माणसं हे एकत्र जगत आली कायम. आणि या जगण्याची गमंत आहे. याला सोशीयालॉजीकली, अँथ्रोपॉलॉजीकली सुध्दा याचा विचार करावा लागतो. या जगण्यामध्ये नेहमी आपसात जे फरक आहेत. या फरकासगट जगणं एकसाची समाजामध्ये तणाव नसतात आणि तणाव नसलेला समाजच असू शकत नाही.समाज हा  बेसीकली तणावावरच चालतो.

****



 ऑस्ट्रेलियातल्या सिडनी इथं सुरु असलेल्या कनिष्ठ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत काल मनू भाकरनं मुलींच्या दहा मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं. तर, मनूसह देवांशी राणा आणि महिमा अग्रवाल यांच्या संघानं सांघिक सुवर्ण पदक जिंकलं. मुलांच्या दहा मीटर एअर पिस्टल प्रकारात गौरव राणानं रौप्य आणि अनमोल जैननं कांस्य पदक जिकलं. तसंच या दोघांसह अर्जुन सिंग चिमा या तिघांच्या संघानं सांघिक सुवर्ण पदक आणि अंहद जवांदा, अभिषेक आर्यासह आदर्श सिंग यांच्या संघानं  सांघिक कांस्य पदक जिंकलं. या स्पर्धेमध्ये पाच सुवर्णसह अकरा पदक मिळवत भारत दुसऱ्या स्थानावर आहे.

****

 हिंगोली जिल्ह्यातला सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठीची सर्व कामं लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचं पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी काल सांगितलं. जिल्ह्यातल्या लिंबाळा तांडा इथं एका कार्यक्रमात ते काल बोलत होते. ग्रामीण भागाचा विकास, शेती साठी पाणी, वीज आणि मजबूत रस्ते यासाठी शासन कटिबध्द असून ही कामं लवकरच सुरु केली जाणार असल्याचं ते म्हणाले.

****

 अरविंद वैद्य स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार नागनाथ फटाले यांना, तर युवा पत्रकार पुरस्कार संकेत कुलकर्णी यांना काल ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ‘काळानुसार विकास’ या संकल्पनेत नवनवीन गोष्टींना नैतिकतेची जोड मिळाली तर आधीच्या पिढीचं शाश्वत विकासाचं स्वप्न खऱ्या अर्थानं पूर्ण होईल, असं मत फटाले यांनी यावेळी व्यक्त केलं.

****



        लातूर जिल्हा कृषि महोत्सवाचं पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं. शेतीसाठी विकसित नवनवीन तंत्रज्ञानाची तसंच विविध योजनांची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास या महोत्वाच्या माध्यमातून मदत होणार असून या तंत्रज्ञानाचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****



 जालना इथल्या राजा बाग शेर सवार यांच्या उरुसाला कालपासून सुरुवात झाली. तीन दिवस चालणाऱ्या या उरुसाचं हे ७४०वं वर्ष आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

*****

***


No comments: