Friday, 30 March 2018

Text AIR NEWS BULLETIN AURANGABAD 30.03.2018 13.00



 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 March 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० मार्च २०१ दुपारी १.०० वा.

****

करदात्यांना कराचा भरणा करणं सोयीचं व्हावं यासाठी उद्या ३१ मार्चला भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्यालयं आणि कर भरण्याची सुविधा असलेल्या बँकांच्या शाखा रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवणार आहे. तसंच इलेक्ट्रॉनिक व्यवहार रात्री बारा वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. सरकारी भरणा आणि पोचपावतीसाठी आवश्यक व्यवस्था केली असून, आरटीजीएस आणि एनइएफटी या सुविधा देखील वाढवलेल्या वेळेत सुरू राहतील. दोन एप्रिल २०१८ रोजी बँकांना त्यांचा वार्षिक ताळेबंद पूर्ण करण्यासाठी सुटी जाहीर केली असली तरी रिझर्व्ह बँकेची कार्यालयं या दिवशी सुरू राहतील, मात्र आरटीजीएस आणि एनइएफटी सेवा या बंद राहतील असं बँकेच्या प्रसिद्धपत्रकात म्हटलं आहे.

****

सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीनं एकाच दिवसात ७१ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या डिजिटल व्यवहार प्रक्रियेचा विक्रम केला आहे. गेल्या बुधवारी एकूण ९८ लाख व्यवहारातून ही उलाढाल झाल्याचं अर्थ मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

****

पंतप्रधान रोजगार प्रोत्साहन योजनेची व्याप्ती वाढवत असंघटीत क्षेत्रात एक एप्रिल २०१६ नंतर रूजू झालेल्या आणि मासिक वेतन १५ हजार रूपये असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पहिल्या तीन वर्षांचा भविष्य निर्वाह निधी भरण्याची तयारी केंद्र सरकारनं दर्शवली आहे. या निर्णयामुळे सरकार पहिल्या तीन वर्षांपर्यंत कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या १२ टक्के हिस्सा निवृत्ती वेतनासाठी देणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

पेजयल आणि स्वच्छता मंत्रालय तसंच मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सहकार्यानं उन्हाळी सुट्टीत स्वच्छ भारत प्रशिक्षण आयोजित करणार आहे. या सुट्टीत गावांमधल्या स्वच्छता कार्यात युवकांना सहभागी करुन घेणं हा त्यामागचा उद्देश आहे. शंभर तासांच्या या प्रशिक्षणात श्रमदान, स्वच्छता सुविधांची निर्मिती, व्यवस्था उभारणी, आणि आसपासच्या गावांमधे स्वच्छतेच्या दृष्टीनं वर्तनात बदल घडवून आणण्याची मोहिम यांचा समावेश आहे. हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन श्रेयांक द्यायचं विद्यापीठ अनुदान आयोगानं मान्य केलं आहे.

****

आदिवासी विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत मुख्य सचिव सुमित मल्लिक यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्यानं महाराष्ट्र रोजंदारी कर्मचारी संघटनेनं आपलं आंदोलन मागं घेतलं आहे. काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत या कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत दुर्गम आदिवासी भागांमध्ये केलेल्या सेवेचा सहानुभूतीपूर्वक विचार करून भरती प्रक्रियेबाबतचा प्रस्ताव तीन महिन्यात मंत्रिमंडळापुढे सादर करण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी संबंधितांना दिले.

****

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिल्ली इथं आपलं उपोषण मागे घेताच अहमदनगर जिल्ह्यातल्या राळेगणसिद्धी इथल्या ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. अण्णांना पाठिंबा म्हणून ग्रामस्थांनी साखळी उपोषण, ग्रामसभा, रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला होता.

****

जम्मू काश्मीरमध्ये अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात, एक विशेष पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी जखमी झाली.

दुसऱ्या एका घटनेत, शोपियान जिल्ह्यात लष्कराच्या गस्ती पथकावर संशयित दहशतवाद्यांनी गोळीबार केला. शोपियान जिल्ह्यातच आज सकाळी दहशतवाद्यांनी सैन्यदलाच्या एका तात्पुरत्या शिबीराला आग लावल्याचं वृत्त आहे. या हल्ल्यात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही. कुलगाममधे संशयित दहशतवाद्यांनी काल एका मदरसा शिक्षकावर गोळीबार केल्याचं वृत्त आहे.

****

छत्तीसगढमधल्या बस्तर पसिरात काल नक्षलवाद्यांच्या ५९ समर्थकांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. यात १६ महिलांचा समावेश आहे. हे नागरिक नक्षलग्रस्त गावांमधले असल्याचं सुकमाचे पोलिस अधिक्षक अभिषेक मीणा यांनी सांगितलं. या आत्मसमर्पणासाठी पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा दबाव टाकला नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

****

ख्रिस्ती समाजाचा प्रेषित येशू ख्रिस्त याच्या बलिदानाची आठवण, गुडफ्रायडे निमित्त आज जगभरातल्या चर्चेसमध्ये आज विशेष प्रार्थना सभांचं आयोजन करण्यात येत आहे. येशू ख्रिस्तांना सुळावर चढवण्यात आल्याच्या घटनेचं स्मरण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. यानिमित्तानं औरंगाबाद शहरातल्या चर्चमध्ये सकाळी प्रार्थना सभा घेण्यात आल्या.

****

परभणी आणि पूर्णा शहरासाठी पिण्याच्या पाण्याची आवश्यकता असल्यानं, निम्न दुधना प्रकल्पातून परवा एक एप्रिल रोजी दुधना नदीपात्रात पाणी सोडण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे दुधना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी नदीपात्रात जाऊ नये किंवा आपली जनावरे नदीपात्रात जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी, तसंच नदीपात्रात सोडण्यात आलेल्या पाण्याचा उपसा विद्युत मोटारीद्वारे कोणीही, कोणत्याही प्रयोजनासाठी करु नये, असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.

//**********//


No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...