Saturday, 24 March 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 24.03.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 March 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४  मार्च २०१ सकाळी .५० मि.

*****



Ø  विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावरचा विश्वासदर्शक ठराव विधानसभेत मंजूर

Ø  पाणीपुरवठ्याच्या थकबाकीचे चार कोटी रूपये चार दिवसांत न भरल्यास वीज पुरवठा खंडीत करण्याचा महावितरण कंपनीचा औरंगाबाद महानगरपालिकेला इशारा

Ø  सशक्त लोकपाल आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचं दिल्लीत उपोषण सुरू

आणि

Ø  औरंगाबाद शहरातला आयकर अधिकारी एस.व्ही. कोठावडेला दोन लाख रुपयांची लाच घेतांना अटक

*****



 विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावरचा विश्वासदर्शक ठराव काल विधानसभेत मंजूर झाला. विरोधी पक्षानं मांडलेल्या अविश्वास ठरावावर निर्णय होण्या आधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल हा विश्वासदर्शक  ठराव मांडला, या ठरावाला सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुमोदन दिलं, त्यानंतर सभागृहात  आवाजी मतदानानं तो मंजूर झाला. विरोधी पक्षांनी अध्यक्षांच्या विरोधात गेल्या पाच तारखेला अविश्वास प्रस्ताव दिला होता, मात्र हा ठराव सभागृहात चर्चेसाठी परवानगी देण्यात आली नव्हती.

 दरम्यान, काल हा ठराव मंजूर झाल्यानंतर विरोधी पक्षांनी नाराजी व्यक्त करत अशा प्रकारे हा ठराव मंजूर करणं म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याची टिका केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळानं याविरुद्ध राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेऊन हस्तक्षेप करण्याची मागणी करणारं निवेदन दिलं.

****



 सशक्त लोकपाल, शेतमालाला हमीभाव आणि स्वामिनाथन आयोगानं केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी, यासह विविध मागण्यांसाठी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी कालपासून दिल्लीत रामलिला मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. या उपोषणात अनेक  भ्रष्टाचार विरोधी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

****



 आंतरजातीय विवाहाबाबत स्वतंत्र कायदा तयार करण्यासाठी  मसुदा समिती गठित करण्यात आली असून या समितीच्या अध्यक्षपदी अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य सी. एल. थूल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती तीन महिन्यात शासनाला अहवाल सादर करणार आहे.

****



 शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करून आगामी निवडणुका काँग्रेस पक्ष लढवणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. ते काल यवतमाळ इथं वार्ताहरांशी बोलत होते. काँग्रेस सत्तेत आल्यास कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल केला जाईल अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

****



 पंतप्रधान  नरेंद्र मोदी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून उद्या देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ४२ वा भाग आहे.

****

 औरंगाबाद शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या थकबाकीचे चार कोटी रूपये येत्या चार दिवसांत भरले नाहीतर वीज पुरवठा खंडीत करण्याचा इशारा महावितरण कंपनीनं महानगरपालिकेला एका नोटीसद्धारे दिला आहे. महानगरपालिकेनं चालू महिन्याचं वीज देयक भरलं आहे, मात्र अजूनही महापालिकेकडे चार कोटी रूपयांची थकबाकी असल्याचं महावितरणनं नोटीसीत म्हटलं आहे.

 दरम्यान, औरंगाबाद परिमंडळातल्या ग्रामपंचायतींनी त्यांच्या हद्दीतल्या पथदिव्यांची जवळपास दीडशे कोटी रूपयांची थकबाकीही तात्काळ भरण्याचे निर्देश मुख्य अभियंता सुरेश गणोरकर यांनी दिले आहेत.

****



 औरंगाबाद शहरातला आयकर अधिकारी एस.व्ही. कोठावडे याला दोन लाख रुपयांची लाच घेतांना केंद्रीय तपास यंत्रणा - सीबीआयनं काल अटक केली. शहरातल्या एका कापड व्यापाऱ्याच्या २०१०-११ या वर्षाच्या आयकरातल्या रकमेत तडजोड  करण्यासाठी कोठावडे यानं त्याच्याकडे लाचेची मागणी केली असता व्यापाऱ्यानं सीबीआयकडे तक्रार दाखल केली. कोठावडे याला सीबीआयच्या विशेष न्यायालयानं, न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

 दरम्यान, हिंगोली जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातल्या उपअभियंत्यासही पाच हजार रुपयांची लाच घेतांना काल पकडण्यात आलं. एका शेतकऱ्यांच्या सिंचन विहीरीच्या मोजमाप पुस्तिकेवर स्वाक्षरी करुन अहवाल पाठवण्यासाठी मधुकर खडके यानं त्याच्याकडे पाच हजार रुपयांची मागणी केली होती.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

*****

 राज्यातल्या दहा वस्ती स्तर संघांना काल राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातल्या तीन संघांचा समावेश आहे. दिनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय शहरी आजिविका अभियानाअंतर्गत नगरपरिषदेच्या हद्दीत स्वच्छता राखण्यासाठी, वस्ती स्तर संघ नेमण्यात आलेले आहेत. यामध्ये ज्यांनी सर्वच मापदंड पूर्ण केली अशा वस्ती स्तर संघांना काल नवी दिल्ली इथं  पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.

****



 तीन तलाक विधेयकाच्या विरोधात काल दुपारी औरंगाबाद शहरातल्या  मुस्लिम महिलांनी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. आमखास मैदानावरून निघालेल्या मोर्चात मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्या होत्या. विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांना मोर्चाच्या शिष्टमंडळानं आपल्या मागण्यांचं एक निवेदन दिलं.

****

 जालना  इथं जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचं उद्धाटन काल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांच्या हस्ते झालं. विद्यार्थ्यांमधल्या क्रीडा गुणांना वाव मिळावा यासाठी शालेय क्रीडा स्पर्धा घेणं महत्त्वाचं असल्याचं खोतकर यांनी उद्धाटनानंतर बोलतांना सांगितलं.

****

 शहीद दिनानिमित्त  काल देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीद भगतसिंग, राजगुरु आणि  सुखदेव यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयातही शहीदांना अभिवादन करण्यात आलं. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि शहीद भगतसिंग अध्यासन केंद्र, शिक्षा संस्कृती उत्थान न्यास यांच्या संयुक्त विद्यमानं ‘जरा याद करो कुर्बानी’ या शहीदांच्या पत्रांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम झाला. जालना इथं या निमित्तानं जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांच्या हस्ते, तर, जळगाव इथं अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते शहीदांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

****

 उस्मानाबाद जिल्ह्यात या वर्षी झालेल्या जलयुक्त तसंच जलसंवर्धनांच्या कामांमुळे जिल्ह्यातल्या पाणी पातळीत जवळपास अडीच मीटरनं वाढ झाली आहे.  याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर –

 जिल्हयात झालेल्या जलयुक्त शिवार तसंच जलसंवर्धनाच्या अनेक कामांमुळं  आठ तालुक्यातील भुजलसर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेनं जानेवारी २०१८ मध्ये जिल्हयातल्या ११४ निरीक्षण विहीरीतील घेतलेल्या पाणीपातळीत सरासरी दोन पूर्णांक ४८ शतांश मिटरनं वाढ झाल्याचा निक्कर्ष नोंदवला आहे. सर्वाधिक तीनपूर्णांक ४९ शतांश मिटर पाणीपातळी भूम तालुक्यात वाढलीय तर सर्वात कमी दोन मिटर पाणीपातळी तुळजापूर तालुक्यात वाढलीय.

                            ---देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, उस्मानाबाद.



 जिल्हा प्रशासनानं संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर तीन कोटी ६७ लाख ४९ हजार रुपयांच्या टंचाई कृती आराखड्याला मंजूरी दिली आहे. मात्र अद्याप एकही टँकर अथवा अन्य टंचाई उपाययोजना सुरु करण्याची गरज भासली नसल्याचं जिल्हा प्रशासनानं सांगितलं.

****



 आज  जागतिक क्षयरोग दिन. या दिनानिमित्त काल बीड शहरात जनजागृती फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. बीड जिल्हा क्षयरोग नियंत्रण समितीतर्फे आयोजित या फेरीत शालेय तसंच नर्सिंगचे विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

****



 बुलडाणा जिल्ह्यातले मलकापूरचे तहसीलदार विजय पाटील यांच्या पथकानं सुमारे एक कोटी रुपये किमतीची वाळू उपसा करणारी यंत्रं आणि वाळूचा अवैध साठा जप्त केला आहे. मलकापूर तालुक्यातल्या काळेगाव शिवारात ही कारवाई करण्यात आली, याप्रकरणी पंचेचाळीस जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

*****

***

No comments: