आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२१ मार्च
२०१८ सकाळी
११.०० वाजता
****
पारशी धर्मियांच्या
नववर्षाला आजपासून प्रारंभ होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारशी समुदायाला
नवरोजच्या शुभेच्छा दिल्या आहेत. येणारं वर्ष आनंद आणि सौहार्द वाढवणारं ठरो, असं पंतप्रधानांनी
आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे.
****
आज जागतिक
वन दिन आहे. संयुक्त राष्ट्रसंघानं, मानवाच्या दृष्टीनं वनांच्या असलेल्या महत्त्वाबाबत
जगभरात जागृती व्हावी, यासाठी २०१२ पासून हा दिवस साजरा करण्याची सुरुवात केली आहे.
****
इराकमधल्या
मोसूल इथे एकोणचाळीस भारतीय मृत्युमुखी पडण्याच्या घटनेबद्दल पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी
तीव्र शोक व्यक्त केला आहे. मृत व्यक्तींच्या कुटुंबियांच्या पाठीशी सगळे भारतीय आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
संयुक्त राष्ट्रसंघानंही या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं असून, ही घटना म्हणजे इसिस
या अतिरेकी संघटनेच्या क्रूरतेचं अजून एक उदाहरण असल्याचं म्हटलं आहे.
****
विद्यापीठ
अनुदान आयोगानं, देशभरातल्या, उच्च शैक्षणिक गुणवत्ता राखणाऱ्या साठ शिक्षण संस्थांना
स्वायत्तता प्रदान केली आहे. मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल नवी दिल्लीमध्ये
ही घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्रातली नऊ विद्यापीठं आणि चार महाविद्यालयांचा समावेश
आहे. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुण्याची सिंबायोसिस आणि डी वाय पाटील
ही अभिमत विद्यापीठं, मुंबईची टाटा सामाजिक विज्ञान संस्था आणि वर्ध्याची दत्ता मेघे
इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स या संस्थांचा समावेश आहे.
****
विधान परिषदेनं
काल महाराष्ट्र सदनिका मालकीहक्क कायद्यामधल्या सुधारणेला मंजुरी दिली. यानुसार, मोडकळीला
आलेल्या इमारतीच्या दुरुस्ती किंवा पुनर्बांधणीसाठी आता, अशा इमारतीतल्या सदनिकांच्या
मालकांपैकी एक्कावन्न टक्के मालकांची परवानगी असणं पुरेसं ठरणार आहे. पूर्वी इमारतीतल्या
शंभर टक्के सदनिकांच्या मालकांची परवानगी आवश्यक होती.
****
शेतकऱ्यांची
पहिली औद्योगिक वसाहत जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यातल्या आष्टी या गावात निर्माण
होणार आहे. या औद्योगिक वसाहतीमध्ये शेतमालावर प्रकिया केल्या जातील आणि त्यांचं मूल्यवर्धन
केलं जाईल. यातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल आणि रोजगार निर्मिती होईल. आष्टी तालुक्यातल्या
१६ खेड्यांना याचा लाभ होणार असून, राज्यातला अशाप्रकारचा हा पहिलाच उपक्रम ठरणार आहे.
*****
No comments:
Post a Comment