Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 26 March 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ मार्च २०१८ सकाळी ६.५० मि.
*****
Ø भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त १४ एप्रिल ते ५ मे दरम्यान देशभरात ग्रामस्वराज
अभियान राबवणार
Ø मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचा केंद्रीय सामाजिक
न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा
पुनरूच्चार
Ø सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी उपोषण मागं घ्यावं
यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न; जलसंपदा मंत्री गिरीश महाजन चर्चेसाठी दिल्लीत
आणि
Ø वैद्यनाथ सहकारी
साखर कारखाना प्रकरणी आपल्याला अडचणीत आणण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा मंत्री
पंकजा मुंडे यांचा आरोप
****
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त
१४ एप्रिल ते ५ मे दरम्यान देशभरात ग्रामस्वराज अभियान राबवलं जाणार असून, नागरिकांनी
या अभियानात सहभागी व्हावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरच्या
‘मन की बात’ या कार्यक्रम श्रृंखलेअंतर्गत काल प्रसारित झालेल्या ४२व्या भागात ते बोलत
होते. बाबासाहेबांनी भारताच्या सशक्त औद्योगिक भारताचं स्वप्न पाहिलं होतं, त्यांची
दूरदृष्टी प्रेरणादायी असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा पंतप्रधानांनी
कालच्या कार्यक्रमातून आवर्जून उल्लेख केला. शेतमालाला उत्पादनापेक्षा दीडपट अधिक हमी
भाव मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील असून, यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये त्यासाठीचा निर्णय
घेण्यात आला असल्याचं, त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचं योग्य मूल्य
मिळावं, यासाठी देशातल्या कृषी बाजारांमध्ये सुधारणा घडवणं तसंच तंत्रज्ञानाचा वापर
वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
आरोग्य, योगाभ्यास, स्वच्छ भारत, आदी विषयांवरही
पंतप्रधानांनी भाष्य केलं. येत्या २१ जून अर्थात जागतिक योग दिनापर्यंत योगाभ्यासाबाबत
जागृती करण्यासाठी विशेष अभियान रावबण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं.
****
दलित-मराठा
वाद राज्याच्या हिताचा नसून, मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा असल्याचा पुनरूच्चार
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. ते काल उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं
वार्ताहरांशी बोलत होते. दलितांवरचा अत्याचार
रोखण्यासाठीच्या ॲट्रॉसिटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर केंद्र सरकार पुनर्विचार याचिका
दाखल करणार आहे. महाराष्ट्र सरकारलाही याचिका दाखल करायची
विनंती करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणी सखोल चौकशी गरजेची असून, दोषी
आढळल्यास शिव प्रतिष्ठानच्या संभाजी
भिडेंविरोधातही गुन्हा नोंदवावा, अशी मागणीही
आठवले यांनी केली. काँग्रेस पक्ष याचं राजकारण करत असून भारतीय जनता पक्ष दलितविरोधी नाही, घटना बदलायचाही सरकारचा विचार नाही, असंही
ते यावेळी म्हणाले.
****
जनलोकपाल आणि अन्य मागण्यांसह नवी दिल्ली इथं सामाजिक
कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी सुरू केलेल्या
उपोषणाचा काल तिसरा दिवस होता. अण्णांनी उपोषण मागं घ्यावं यासाठी राज्य शासनाकडून
प्रयत्न सुरू असून काल जलसंपदा मंत्री गिरीश महाजन अण्णांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीत
पोहोचले आहेत. मागण्या मान्य असल्याचं पत्र घेऊनच चर्चा करण्यासाठी यावं असं सांगत
हजारे यांनी महाजन यांची भेट घेण्याचं नाकारलं असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं
आहे.
****
राज्याच्या अनेक भागात तापमानात वाढ झाली असून अनेक
ठिकाणी काल चाळीस अंश सेल्सिअसच्या वर तापमानाची नोंद झाली. मुंबईत ४१ अंश सेल्सिअस
तर रायगड जिल्ह्यातल्या भिरा इथं ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. चंद्रपूर इथंही
४० पूर्णांक चार अंश सेल्सिअस तर बीड इथं चाळीस अंश सेल्सिअस तापमान नोंदलं गेलं. मराठवाड्यात
परभणी ३९ पूर्णांक नऊ, उस्मानाबाद ३८ पूर्णांक एक, नांदेड ३७, तर औरंगाबाद इथं ३६ पूर्णांक
चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान, येत्या दोन दिवसात तापमानात आणखी वाढ
होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
****
कोणत्याही विकासाला आपला विरोध नाही, परंतु व्यवहार्यतेचा
विचार झाला पाहिजे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं
आहे. ते काल पालघर इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद
साधत होते. मुंबई - बडोदा महामार्ग, औद्योगिक मार्गिका, तसंच मुंबई-अहमदाबाद बुलेट
ट्रेन या तीन प्रकल्पांमुळे डहाणू तसंच पालघर भागातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या
प्रमाणावर जाणार असल्यानं, जनतेत असंतोष आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आणि ऊस उत्पादकांना
अडचणीत येऊ देणार नाही अशी ग्वाही महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली
आहे. परळीजवळ, पांगरी इथं असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा परवाना अन्न आणि औषध प्रशासनाकडून १० दिवसांसाठी निलंबित
करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर त्या काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होत्या. आपल्याला अडचणीत
आणण्याचा प्रयत्न काही विरोधक करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. दरम्यान मराठवाड्यातले बंद साखर कारखाने सुरू करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
औरंगाबाद इथं,‘सरस महोत्सव
सिद्धा-२०१८’ या महिला बचत गटानं उत्पादित केलेल्या वस्तुंच्या विक्री आणि प्रदर्शनाचं
उदघाटन काल पंकजा मुंडे यांच्या हस्ते झालं. महिला बचत गटांच्या उत्पादनांना मोठ्या
बाजारपेठेत मागणी मिळवून देण्यासाठी तांत्रिक प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम व्यापक
प्रमाणात राबवण्यात येत असल्याचं त्यांनी यावेळी बोलतांना सांगितलं. विधानसभा अध्यक्ष
हरिभाऊ बागडे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगांवकर, यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी
उपस्थित होते.
****
देश हित लक्षात घेऊन सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास
भारत हा महासत्ता म्हणून उदयाला येऊ शकेल, असं मत केंद्र सरकारचे माजी सचिव डॉ. कमल
टावरी यांनी व्यक्त केलं आहे. लातूर इथं काल विश्वशांती केंद्र माईर्स एमआयटी यांच्या
वतीनं टावरी यांच्यासह पुण्याचे माजी अतिरिक्त विभागीय आयुक्त शाम देशपांडे यांना समर्पित
जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
****
ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांना मराठवाडा साहित्य
परिषदेच्या भगवंत देशमुख विशेष वाङमय पुरस्कारानं
काल गौरवण्यात आलं. माजी न्यायमुर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते ‘लोभस’ या ललित गद्यासाठी त्यांना
औरंगाबाद इथं हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरणानंतर रसाळ यांची प्रकट
मुलाखतही घेण्यात आली. समिक्षा कधीच परिपूर्ण
नसते, मात्र वाङमय चिरंतन असल्याचं सांगून समिक्षेच्या नावाखाली उपहास करु नये असं
मत रसाळ यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
जालना औद्योगिक वसाहतीमधल्या दोन कंपन्यांमध्ये तीन
दिवसांपूर्वी सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या टोळीतल्या सात संशयितांना जालना पोलिसांनी मुंबईच्या
घाटकोपर भागातून अटक केली आहे. चोरीस गेलेल्या १३ लाख ८७ हजार रुपयांच्या मुद्देमालासह
एक ट्रक या संशयितांकडून जप्त केल्याची माहिती, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक
राजेंद्रसिंह गौर यांनी काल दिली.
****
महिलांच्या
टी-ट्वेंटी तिरंगी क्रिकेट मालिकेत भारताला काल झालेल्या दुसऱ्या सामन्यातही
इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. भारतानं इंग्लंडसमोर विजयासाठी १९९ धावांचं
लक्ष्य ठेवलं होतं, इंग्लंडच्या संघानं ते १८ षटकात पूर्ण केलं. यापूर्वी
ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या सामन्यातही भारत पराभूत झाला होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज मुंबईत सामना होणार
आहे.
****
रामनवमी
काल देशभरात भक्तीभावानं साजरी
झाली. दुपारी बारा वाजता ठिकठिकाणच्या राम मंदिरामंध्ये
रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. नाशिकच्या
प्रसिद्ध काळाराम मंदिरासह, गोरा राम मंदीर, कोदंडधारी राम मंदिरात नागरिकांनी दर्शनासाठी
गर्दी केली आहे. वणी इथल्या सप्तशृंगी देवीच्या चैत्र उत्सवाला कालपासून प्रारंभ झाला.
औरंगाबाद शहरातही जसवंतपुरा, समर्थनगरसह विविध ठिकाणच्या
राममंदिरांमध्ये रामजन्मसोहळा भक्तीभावानं साजरा झाला. जालना शहरातल्या आनंदवाडी इथल्या
श्रीराम मंदिरात रामजन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
*****
***
No comments:
Post a Comment