आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
३० मार्च २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
जगभरात सर्वत्र आज गुड फ्रायडे साजरा केला जात आहे. येशू ख्रिस्तांना सुळावर चढवण्यात
आल्याच्या घटनेचं स्मरण करण्यासाठी गुड फ्रायडे साजरा केला जातो. या निमित्तानं विविध
ठिकाणी चर्चमध्ये प्रार्थना सभांचं आयोजन केलं आहे. मानवतेच्या रक्षणासाठी येशू ख्रिस्तांनी
सोसलेल्या अपार कष्टांचं प्रतीक म्हणून गुड फ्रायडे साजरा केला जातो. येशू ख्रिस्तांनी मानवतेची सेवा आणि समाजातून अन्याय दूर करण्यासाठी आपलं आयुष्य
दिलं, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येशू ख्रिस्तांचं स्मरण केलं आहे.
****
देशभरात विविध केंद्रांवर स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या अंतिम फेरीत सहभागी झालेल्या
विद्यार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संवाद साधणार आहेत. स्मार्ट इंडिया हॅकेथॉनची अंतिम फेरी आज आणि उद्या होणार असून
यासाठी देशभरात २८ केंद्रं
निवडली आहेत. युवावर्गाच्या विशेषतः अभियांत्रिकी
विद्यार्थ्यांच्या कल्पनांना प्रोत्साहन देणं, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वाव देणं हा हॅकेथॉनचा उद्देश आहे.
****
औरंगाबाद शहरातल्या चिकलठाणा विमानतळाजवळच्या दुग्धनगरीच्या प्रस्तावित आरक्षित
जागेत कचरा विघटन करणारा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. कचरा प्रश्न सोडवण्यासाठी शासनानं
गठीत केलेल्या विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं काल हा निर्णय घेतला.
जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली.
****
जालना जिल्ह्यात भोकरदन- सिल्लोड रस्त्यावर मालखेडा गावाजवळ काल झालेल्या दोन दुचाकींच्या
अपघातात तीन जण ठार तर दोन जण जखमी झाले. सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास हा अपघात
घडला. अपघातात ठार झालेले तिन्ही तरूण हे एकाच कुटुंबातले असून लग्नपत्रिका वाटप करून
ते गावी जात असतांना हा अपघात झाला.
****
साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त श्रीकांत देशमुख यांचा आज औरंगाबाद इथं मराठवाडा साहित्य परिषदेनं विशेष सत्कार आयोजित
केला आहे. हा सत्कार समारंभ मराठवाडा साहित्य परिषदेच्या ना.गो. नांदापूरकर सभागृहात
संध्याकाळी सहा वाजता कथाकार भास्कर चंदनशिव यांच्या हस्ते होणार असल्याचं परिषदेचे
कार्यवाह दादा गोरे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवलं आहे.
//**********//
No comments:
Post a Comment