Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 23 March 2018
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ मार्च २०१८ सायंकाळी
५.२५ मि.
****
विधानसभा
अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावरचा विश्वासदर्शक ठराव आज विधानसभेनं मंजूर केला. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या या ठरावाला सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे
यांनी अनुमोदन दिलं. हा ठराव आवाजी मतदानानं मंजूर झाला. दरम्यान, विरोधी पक्षांनी
अध्यक्षांच्या विरोधात गेल्या पाच तारखेला अविश्वास प्रस्ताव दिला होता, तो सदनात सादर
करण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. याबाबत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील
यांनी प्रश्न विचारत, अविश्वास प्रस्ताव वाचण्यास सुरुवात केली असता, मुख्यमंत्र्यांनी
त्यांना थांबवत, नियमानुसार अविश्वास प्रस्तावाची सूचना वाचता येणार नसल्याचं सांगितलं.
****
आमदारांच्या
चारचाकी वाहनांवर लावण्यासाठी दिल्या जाणाऱ्या स्टीकर्सचा गैरवापर थांबवावा, अशी मागणी
आमदार नीतेश राणे यांनी केली आहे. आज विधान सभेत राणे यांनी अशी स्टीकर्स आमदारांच्या
वाहनांशिवाय इतर वाहनांवर लावली जात असल्याकडे लक्ष वेधलं. भाजपच्या आमदार मनिषा चौधरी
यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. अध्यक्षांनी या प्रकरणी सरकारला चौकशीचे आदेश दिले
आहेत.
****
बेकायदेशीररित्या
पिस्तुल विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या उत्तर प्रदेशातल्या एका इसमाला ठाणे इथं पोलिसांनी
अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून सहा पिस्तुलं आणि पंधरा जिवंत काडतुसं जप्त करण्यात
आली आहेत. सामेन रसिक शेख असं या इसमाचं नाव असून, त्याला यापूर्वीही अशाच गुन्ह्यात
शिक्षा झाली असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
आयएनएक्स
मीडिया भ्रष्टाचार प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयानं कार्ति चिदंबरम याला जामीन मंजूर
केला आहे. आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून कार्तिला गेल्या २८ तारखेला अटक
करण्यात आली होती. दहा लाख रुपये जामीनावर सुटका झालेल्या कार्तिला, केंद्रीय गुन्हे
अन्वेषण विभाग - सीबीआयच्या परवानगीशिवाय भारताबाहेर जाता येणार नाही. कार्तिचं पारपत्र
आधीपासूनच सीबीआयच्या ताब्यात आहे. कार्ति हा माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम
यांचा मुलगा आहे.
****
पहिल्या
भारतीय चिन्हभाषा शब्दकोषाचं उद्घाटन आज केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्री
थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते नवी दिल्ली इथे झालं. कर्णबधिर व्यक्ती आणि सामान्य समाज
यांच्यातल्या संवादातले अडथळे दूर व्हावेत, या उद्देशानं या कोषाची निर्मिती केली असल्याचं
गेहलोत यांनी यावेळी सांगितलं. कर्णबधिर व्यक्तींना बोलण्याचा तसंच मत प्रदर्शित करण्याचा
संवैधानिक अधिकार मिळावा आणि ते समाजाच्या मुख्य प्रवाहात यावेत, यासाठी सरकारचा हा
प्रयत्न असल्याचं गेहलोत यांनी नमूद केलं.
****
देशासह
राज्यभरात आज शहीद दिनाच्या औचित्यानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. मंत्रालयात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीद भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या प्रतिमांना
पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. जालना इथे आज या निमित्तानं जिल्हाधिकारी कार्यालयात
निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांच्या हस्ते, तर, जळगाव इथं अपर जिल्हाधिकारी गोरक्ष
गाडीलकर यांच्या हस्ते शहीदांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात
आली.
****
सातारा
जिल्ह्यातल्या महाबळेश्वर इथल्या वेण्णा सरोवर ते लिंगमाळा या परिसरात आज सकाळी दवबिंदू
गोठून शेती आणि मळ्यांचा परिसर हिमाच्छादित झाल्यानं पांढराशुभ्र दिसत होता. तसंच या
भागातलं तापमान चार ते पाच अंशांपर्यंत घसरलं होतं, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
हा हिमाच्छादित परिसर पाहण्यासाठी स्थानिकांसह पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान,
राज्यात आज सर्वाधिक ३९ अंश सेल्सियस तापमान रायगड जिल्ह्यात भिरा तसंच मराठवाड्यात
नांदेड इथं नोंदलं गेलं. परभणी इथं ३८ अंश तर औरंगाबाद इथं ३४ पूर्णांक चार अंश सेल्सियस
तापमानाची नोंद झाली.
****
उद्याच्या
जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्तानं आज बीड शहरात जनजागृती फेरीचं आयोजन करण्यात आलं
होतं. बीड जिल्हा क्षयरोग नियंत्रण समितीतर्फे आयोजित या फेरीत शालेय तसंच नर्सिंगचे
विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. २०२५ या वर्षापर्यंत भारताला क्षयरोगमुक्त
करण्याचं उद्दिष्ट पंतप्रधानांनी निश्चित केलं असून, ते गाठण्यासाठी वैद्यकीय आणि औषधी
व्यावसायिकांनी आपल्याकडच्या क्षयरुग्णांची माहिती शासकीय यंत्रणेला कळवावी, असं आवाहन
मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी बोलताना केलं.
****
जालना
जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातल्या शिवणगाव इथे तीन शेतकऱ्यांच्या आठ एकर ऊसाला
आज आग लागल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या आगीचं कारण कळू शकलेलं नाही. या
गावात ऊसाला आग लागण्याची ही दुसरी घटना असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे.
****
No comments:
Post a Comment