Monday, 26 March 2018

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 26.03.2018 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 March 2018
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ मार्च २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
मुस्लीम धर्मियांमध्ये प्रचलित असलेल्या बहुपत्नीत्व आणि निकाह हलाला या प्रथांना आव्हान देणाऱ्या याचिकांच्या संदर्भात, सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि विधी आयोगाला एक नोटीस पाठवली आहे. न्यायालयाचं घटनापीठ या प्रकरणी सुनावणी करणार आहे. न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या पीठानं गेल्या वर्षी मुस्लिम धर्मियांमध्ये प्रचलित असलेली तिहेरी तलाक पद्धत घटनाबाह्य असल्याचा निकाल दिला होता, त्यावेळीही बहुपत्नीत्व आणि निकाह हलाला या मुद्यांवर चर्चा करण्यात आली होती.
****
कोणत्याही ॲप वर मागितलेली माहिती ही हेरगिरी असू शकत नाही, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी, नरेंद्र मोदी ॲपचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर, त्या बोलत होत्या.
दरम्यान, काँग्रेस पक्षानं आपले सगळे ॲप हटवले असून, संकेतस्थळाचं सदस्यत्वही रद्द करण्यात आलं आहे. या मध्ये काही बदल करण्याच्या उद्देशानं हे ॲप हटवले असल्याचं पक्षातर्फे सांगण्यात आलं आहे.
****
कोरेगाव- भीमा इथं हिंसाचार भडकावल्याचा आरोप असलेले संभाजी भिडे यांना आठ दिवसात अटक करण्याची मागणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, केली आहे. आंबेडकर यांच्या नेतृत्वात आज मुंबईत एल्गार मोर्चा काढला होता, त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ही मागणी केली, मागणी मान्य न झाल्यास, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंबेडकर यांनी वार्ताहरांशी बोलताना दिला.
****
विधानसभा अध्यक्षांविरोधातल्या अविश्वास प्रस्तावाच्या मुद्यावरून विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे विधानसभेचं कामकाज आज वारंवार तहकूब करावं लागलं.
अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव असताना मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी कोणतीही पूर्वसूचना न देता, विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेतला, हे कृत्य लोकशाहीला काळिमा फासणारं आणि असंवैधानिक होतं, अशी टीका, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. विरोधकांनी सादर केलेल्या अविश्वास ठरावाबाबत नियमानं चर्चा घ्यावी, अशी मागणी अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी लावून धरली. त्यानतंर सत्ताधारी पक्षातर्फे विधीमंडळ कार्यमंत्री गिरीश बापट यांनी, अविश्वास प्रस्तावासंदर्भात विरोधकांमध्येच एकवाक्यता नव्हती, असं सांगत, हा मुद्दा प्रलंबित ठेवायचा नसल्यानं, तो निकाली काढल्याचं सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात झालेल्या अशा घडामोडींचा हवाला देत, सरकारनं संवैधानिक पद्धतीनंच विश्वासदर्शक प्रस्ताव मंजूर केल्याचा दावा केला. त्यानंतर अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचं कामकाज पुकारलं. मात्र विरोधी पक्षांच्या सदस्यांनी हौद्यात येऊन घोषणाबाजी केल्यामुळे, कामकाज आधी दहा मिनीटं आणि नंतर दोन वेळा तहकूब करण्यात आलं.
****
राज्यात अतिरिक्त ठरणाऱ्या साखरेची निर्यात करण्याचं धोरण आणण्याचा सरकारचा विचार असल्याचं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी म्हटलं आहे. ते आज विधान परिषदेत बोलत होते. राज्याला २४ लाख टन साखरेचीच गरज असताना, यंदा राज्यात ११० लाख टन साखरेचं उत्पादन होईल, असा सुधारित अंदाज असल्याचं, त्यांनी सांगितलं. साखर कारखान्यांची कमी झालेली संख्या, अतिरिक्त ऊसाचा गंभीर प्रश्न आणि सर्वसामान्य नागरिकांना चढ्या दरानं साखर विक्री होत असल्याबाबत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमरसिंह पंडित यांनी अल्पकालिक चर्चा उपस्थित केली. या चर्चेला उत्तर देताना देशमुख यांनी, घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठीचे साखरेचे दर वेगळे ठेवावेत, यासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्यात आला असून, याला केंद्र सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं सांगितलं.
दरम्यान, ऊस उत्पादक शेतकऱ्यांमागे शासन खंबीरपणे उभे राहील, तसंच साखर कारखानदारी अडचणीत येणार नाही, यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असं ही देशमुख यांनी यावेळी सांगितलं.
****
विधानसभेत आज सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रालयात उंदीर मारण्यासंदर्भात देण्यात आलेल्या कंत्राटाबाबत खुलासा करणारं निवेदन सादर केलं. पूर्वीच्या सरकारच्या काळात प्रचलित असलेल्या पध्दतीनुसार मजूर संस्थेला काम देण्यात आलं होतं, मात्र ही संस्था अस्तित्वात आहे का, याचा शोध घेतला जात असल्याचं ते म्हणाले. या संस्थेच्या मुंबई जिल्हा बँकेतल्या खात्यावर पैसे जमा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
****
महिला क्रिकेट मालिकेतल्या तिरंगी ट्वेंटी-ट्वेंटी श्रृंखलेत आज झालेल्या चौथ्या सामन्यातही भारतीय महिला संघाला पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियानं भारतीय संघाचा ३६ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या संघानं १८६ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं, त्याचा पाठलाग करताना भारतीय संघ निर्धारीत २० षटकात १५० धावाच करु शकला.
//***********//

No comments: