Monday, 26 March 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 26.03.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 March 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ मार्च २०१ दुपारी १.०० वा.

****

 कोरेगाव- भीमा इथं हिंसाचार भडकावल्याचा आरोप असलेले संभाजी भिडे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी आज मुंबईत भारिप बहुजन महासंघानं एल्गार मोर्चाचं आयोजन केलं आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वात काढण्यात येणाऱ्या या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी दिलेली नाही, मात्र आझाद मैदानावर आंदोलनास परवानगी देण्यात आली आहे. तरीही मोर्चावर ठाम असल्याचं आंबेडकर यांनी म्हटलं आहे. दोन महिन्यांपासून मोर्चाची सूचना दिलेली असल्याचं सांगत आंबेडकर यांनी, भिडे यांना अटक करण्यास टाळाटाळ करून, सरकार भिडेंना पाठीशी घालत आहे, असा आरोपही केला आहे. या मोर्चामुळे दक्षिण मुंबईत वाहतूक कोंडी झाली असून, मोर्चेकऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

****



 केंद्रीय भविष्य निधी कार्यालयाचं कामकाज येत्या १५ ऑगस्टपासून कागदरहित होणार आहे. त्यामुळे कर्मचारी भविष्य निधी योजनेच्या सर्व सभासदांनी त्यांचं केवायसी, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक आणि कायम खातेक्रमांक -पॅन आदी माहिती वैश्विक खाते क्रमांक - यूएएन शी जोडून घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****



 युनेस्कोच्या कार्यकारी मंडळावर भारताचे प्रतिनिधी म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था - एन सी ई आर टीचे माजी संचालक प्राध्यापक जे.एस. राजपूत यांना केंद्र सरकारनं नामनिर्देशित केलं आहे. राजपूत हे देशातले नामवंत शिक्षणतज्ञ असून, त्यांनी युनेस्कोसह विविध शैक्षणिक संस्थांबरोबर काम केलं आहे. गेल्या वर्षी युनेस्कोच्या आम परिषदेत सहभागी झालेल्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कार्यकारी मंडळाचं भारताला प्रतिनिधीत्व मिळावं यासाठी प्रयत्न केले होते. या कार्यकारी मंडळांचे एकूण ५८ सदस्य असून त्यांचा कार्यकाळ चार वर्षांचा असतो.

****



 देशाचा सर्व समावेशक विकास करण्यास, केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचं, केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलं आहे. नवी मुंबईत एका महाविद्यालयातल्या कार्यक्रमात ते बोलत होते. राजकीय छळाचं धोरण अवलंबणाऱ्या व्यक्तींच्या संस्कृती विरोधात हे विकासाचं वातावरण असल्याचं त्यांनी सांगितलं. यापूर्वी मुस्लिम मुलींचं शाळागळतीचं प्रमाण ७० टक्के होतं, ते आता ४० टक्क्यांवर आलं आहे. ते शून्यावर आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याची माहिती त्यांनी दिली.

****



 गडचिरोली जिल्ह्यात काल पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत एक महिला नक्षलवादी मारली गेली. मौझा मेंढारी वन क्षेत्रात नक्षलविरोधी पथकानं शोध मोहिमेला सुरूवात केल्यानंतर नक्षलवाद्यांच्या गटानं पोलिसांवर गोळीबार सुरू केला. या चकमकीत मारल्या गेलेल्या या नक्षली महिलेची ओळख अजून पटलेली नाही. 

****



 राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाअंतर्गत येणाऱ्या भाषा संचालनालयानं शासन शब्दकोश ॲप तयार केलं आहे. शासकीय कार्यालयांमध्ये कामकाजात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर केला जावा, तसंच दैनंदिन व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांचा मराठीत अर्थ आणि मराठी शब्दांचा इंग्रजीत अर्थ सहज उपलब्ध होण्यासाठी हे ॲप विकसित करण्यात आलं आहे. शासन शब्दकोश भाग एक असं या ॲपचं नाव असून, यात निवडक शब्दकोशातील ७२ हजार १७१ पर्यायी शब्दांचा समावेश आहे. राज्य आणि केंद्र शासनाचे अधिनियम सुद्धा यात उपलब्ध आहेत.

****



 नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यात शिवडी इथं नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादित करण्याकरता मोजणीसाठी गेलेल्या एल अँड टी कंपनीच्या पाच कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांनी पकडून ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडचं मोजणीचं साहित्य हिसकावून घेतलं. शिवडी ग्रामस्थांचा जमीन देण्यास विरोध असून भूसंपादनासाठी आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांनी आतापर्यंत पाच वेळा परत पाठवलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 असंघटीत क्षेत्रातल्या महिलांसाठी महामंडळाची स्थापना करण्यात येणार असून त्याचा आकृतिबंध तयार करण्याचं काम सुरू आहे, असं विधीज्ञ निशा शिरुरकर यांनी म्हटलं आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा इन्स्टिट्यूट आणि राज्य महिला आयोग यांच्या वतीनं औरंगाबाद इथं आयोजित मराठवाड्यातील असंघटीत क्षेत्रातील महिला या विषयावरील चर्चासत्राच्या उद्घाटनपर भाषणात त्या आज बोलत होत्या. असंघटीत क्षेत्रातल्या महिलांकरीता कायदे होणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त करतानाच त्यांनी, या महिलांनी, आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन स्थानिक समितीकडे तक्रार करण्याचं आवाहन केलं.

****



 जालना इथल्या टपाल कार्यालयात आजपासून पारपत्र सेवा केंद्र सुरु झालं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, पुणे पारपत्र कार्यालयाचे विभागीय अधिकारी अनंत ताकोले, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल आणि जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या उपस्थितीत या कार्यलयाचं उद्घाटन करण्यात आलं.

*****

***

No comments: