Wednesday, 21 March 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 21.03.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 March 2018

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ मार्च २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

सोशल मीडियाच्या मदतीनं देशाच्या निवडणूक प्रक्रियेला हानी पोचवण्याचा कोणताही प्रयत्न अजिबात सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिला आहे. केंब्रीज ॲनालिटिका या विवादित एजन्सीची, २०१९ च्या निवडणुकांसाठी सेवा घेण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतल्याचं वृत्त आहे, त्या पार्श्वभूमीवर प्रसाद आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. अमेरिकेच्या निवडणुकांदरम्यान गैरप्रकाराचा आरोप असलेल्या या एजन्सीवर लाच दिल्याचे आणि माहिती चोरल्याचे आरोप आहेत, असं सांगत, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाईलमध्ये केंब्रिज ॲनालिटिकाची भूमिका काय आहे हे स्पष्ट करावं, असं प्रसाद यांनी म्हटलं आहे.

****

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठीचा दिव्यांगांचा आरक्षण कोटा वाढवण्यासाठी याबाबतच्या नियमांमध्ये सुधारणा करण्याला केंद्र सरकारनं आज मंजुरी दिली. आता या अभ्यासक्रमांमध्ये दिव्यांगांसाठी पाच टक्के जागा राखीव असतील. याआधी हे प्रमाण तीन टक्के इतकं होतं.

****

शिवसेनेसह विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे विधानसभेचं कामकाज आज बाधित झालं. अंगणवाडी सेविकांना लावलेला आवश्यक सेवा कायदा - मेस्मा रद्द करावा, अशी मागणी करत शिवसेना सदस्यांनी हौद्यात उतरून फलक झळकावले. सरकार हा कायदा मागे घेत नाही, तोवर सभागृहाचं काम होऊ शकणार नाही, असं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, तर सरकार हुकुमशाही पद्धतीनं काम करत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. या गदारोळामुळे सभागृहाचं काम तब्बल आठ वेळा आणि शेवटी दिवसभरासाठी तहकूब झालं.

विधान परिषदेत आज मुंबईच्या समस्यांवर चर्चा झाली, शिवसेनेनं त्यासाठी राज्य सरकारला तर भाजपनं महानगरपालिकेला जबाबदार ठरवलं.

****

महाराष्ट्राच्या वन विकासात लोकसहभागाचा वाटा अमूल्य असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. जागतिक वन दिनानिमित्त, संत तुकाराम वनग्राम पुरस्कारांचं वितरण तसंच वनसेवेत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र वनक्षेत्रात देशपातळीवर चार क्षेत्रात पहिल्या स्थानावर आल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, वन दिनानिमित्त आज ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. धुळे वन विभागातर्फे आज वृक्ष दिंडीसह जनजागर फेरी काढण्यात आली. धुळे जिल्ह्यात येत्या जुलै महिन्यात सुमारे त्रेचाळीस लाख लाख रोपांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक जी.के.अनारसे यांनी यावेळी दिली.

****

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या वतीनं आज औरंगाबाद इथं ‘मासिक पाळी व्यवस्थापन’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. डॉ.वनिता पानट यांच्यासह मान्यवर तज्ज्ञांनी या कार्यशाळेत उपस्थितांना मार्गदर्शन केलं. अस्मिता योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शालेय विद्यार्थिनींसाठी पाच रुपये दराने सॅनिटरी पॅड्स उपलब्ध करून दिले जात आहेत, यासाठी अस्मिता ॲपवर नोंदणी करणं आवश्यक असून, प्रत्येक मुलीला वर्षभरातून पॅड्ची तेरा पाकिटं दिली जाणार असल्याचं, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांनी यावेळी सांगितलं.

****

लातूर इथं येत्या चोवीस ते अट्ठावीस तारखांदरम्यान कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातल्या टाऊन हॉल मैदानात होणाऱ्या या महोत्सवात शासनाच्या विविध कृषी योजनांची तसंच अर्थविषयक मदतीच्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे.

*****

नांदेडच्या प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानच्या विविध वाङमय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. सर्वोत्कृष्ट पुस्तकासाठीचा पुरस्कार रत्नागिरीच्या अभिजित हेगशेट्ये यांना, साहित्य क्षेत्रातल्या योगदानाबद्दलचा पुरस्कार ज्येष्ठ कवी भ.मा.परसवाळे यांना, ग्रंथगौरव पुरस्कार प्रदीप पाटील यांना तर उत्कृष्ट समीक्षा ग्रंथासाठीचा पुरस्कार प्राध्यापक बाळू दुगडूमवार यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कारांचं हे सतरावं वर्ष असून, येत्या एक एप्रिलला पुरस्कारांचं वितरण होणार आहे.

****

अहमदनगर शहरात काल रात्री कुरिअर कार्यालयात झालेल्या स्फोट प्रकरणी नाशिकच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या पथकानं, आज घटनास्थळाची तपासणी केली. हे पार्सल पाठवणाऱ्याचं नाव आणि पत्ता बनावट असल्याचं निदर्शनाला आलं असून, पार्सल आणून देणाऱ्या व्यक्तीचं रेखाचित्र पोलिसांनी जारी केलं आहे.

****

No comments: