Wednesday, 28 March 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 28.03.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 March 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ मार्च २०१ दुपारी १.०० वा.

****

 राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या सदस्यांना आज निरोप देण्यात आला. सभापती व्यंकय्या नायडू यांनी या सदस्यांच्या योगदानाबद्दल त्यांचे विशेष आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सदस्यांना समाजासाठीच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. विरोधी पक्षनेते गुलाम नवी आझाद यांनी या सदस्यांना शुभेच्छा देताना, गरीबांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी विरोधी पक्षांकडून कायमच आवाज उठवला जात असल्याचं सांगितलं.

 उपसभापती पी जे कुरियन, सचिन तेंडुलकर, अनु आगा, नरेश अग्रवाल यांचा निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये समावेश आहे. जया बच्चन, अरुण जेटली, यांच्यासह काही सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला असला तरी, ते पुन्हा निवडून आल्यानं, सदनानं त्यांचं अभिनंदन केलं.

 लोकसभेत आजही विविध पक्षांनी आपल्या मागण्यांसाठी गदारोळ सुरूच ठेवला. काँग्रेस पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारविरोधात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर कार्यवाही करण्याची मागणी केली, मात्र अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सदनात सुरु असलेल्या गदारोळामुळे अविश्वास प्रस्तावावर कार्यवाही करण्यास असमर्थ असल्याचं सांगितलं. गदारोळ वाढत गेल्यानं, अध्यक्षांनी सदनाचं कामकाज सोमवार दोन एप्रिलपर्यंत स्थगित केलं.

****



 भारतीय स्टेट बँकेची पासष्ट कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं हैद्राबाद इथल्या एका खाजगी कंपनीच्या अध्यक्ष आणि संचालकासहित आठ अन्य व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. गौरी केमिकल्स लिमिटेड, या कंपनीनं २००९ पासून भारतीय स्टेट बँकेच्या बँकिंग सुविधा घेतल्या, मात्र कर्जफेड न केल्यानं, एप्रिल २०१४ मध्ये या कंपनीच्या खात्याला बुडित खातं म्हणून घोषित करण्यात आलं होतं.

****

 भारताच्या जीसॅट सहा अ, या दूरसंचार उपग्रहाच्या प्रक्षेपणाची उलट गणती आज दुपारी एक वाजून छप्पन्न मिनिटांपासून सुरू होत आहे. उद्या दुपारी चार वाजून छप्पन्न मिनिटांनी आंध्रप्रदेश मधल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून हा उपग्रह प्रक्षेपित केला जाणार आहे.

****



 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येची पुनचौकशी करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. अभिनव भारत संघटनेचे मुंबई इथले कार्यकर्ते पंकज फडणीस यांनी ही याचिका दाखल केली होती. अनेक वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेची, आता कागदपत्रांच्या अभ्यासातून पुन्हा चौकशी शक्य नसल्याचं सांगत, न्यायालयानं ही मागणी फेटाळून लावली.

 दरम्यान, उत्तर प्रदेशातल्या मथुरा जिल्ह्यातल्या वृंदावन मंदिरात भाविकांनी वाहिलेली फुलं, विधवा आणि निराधार स्त्रियांच्या आश्रमांना अत्तरं, उदबत्त्या किंवा नैसर्गिक रंग तयार करण्याकरता द्यावीत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. केंद्र सरकारनं वाराणसी, तिरुपती, पुरी यासारख्या, देशभरातल्या सगळ्या प्रमुख मंदिरांमध्ये ही योजना लागू करावी, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.

****



 कोरेगाव भीमा प्रकरणात संभाजी भिडे यांना अकारण गोवण्यात आल्याचा आरोप करत आज नाशिक मध्ये विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. सकाळी गोल्फ क्लब मैदानापासून सुरू झालेला हा मोर्चा नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला आणि जिल्हाधिकाऱ्यांना संभाजी भिडे गुरूजी निर्दोष असल्याचं निवेदन देण्यात आलं.

****

 ग्राहकांकडची थकित वीज देयकं वसूल करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हय़ात वीज वितरण कंपनीनं, महिलांचा समावेश असलेली तीन ‘दामिनी‘ पथकं स्थापन केली आहेत. महिला पथक घरी आल्यानंतर घरातल्या महिला चांगला प्रतिसाद देऊन वीज देयकाची रक्कम अदा करून सहकार्य करतात, त्यामुळे जिल्हय़ात अशी पथकं तयार करण्यात आली असल्याचं, तसंच, या पथकांनी गेल्या चार दिवसांत ५ लाख ८९ हजार रुपये इतकी रक्कम वीज देयकापोटी वसूल केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

 दिव्यांग व्यक्तींनी मतदार यादीत नाव नोंदणी करावी आणि मतदानासाठी जागरूक रहावं, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, यांनी केलं आहे. काल नांदेड इथे आयोजित एका चर्चासत्रात ते बोलत होते. दिव्यांग व्यक्तींची मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येईल, आणि त्यांना मतदान केंद्रावर आवश्यक त्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, तसंच, दिव्यांग शासकीय कर्मचाऱ्यांना निवडणुकीचं काम न देण्याबाबत संबंधित विभागांना निर्देश देण्यात येतील, असं डोंगरे यांनी यावेळी सांगितलं.

*****

***

No comments: