Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 22 March 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
२२ मार्च २०१८ सकाळी
६.५०
मि.
*****
Ø गर्भाशय
भाड्यानं देण्याशी संबंधित पोशिंदा- सरोगसी नियमन विधेयकात सुधारणा करण्यास केंद्रीय
मंत्रीमंडळाची मंजुरी
Ø अंगणवाडी सेविकांना
लावलेल्या आवश्यक सेवा कायद्यावरून विधानसभेचं कामकाज स्थगित
Ø औरंगाबाद शहरातला
कचऱ्याचा प्रश्न कृतीबध्द कार्यक्रमानुसार मार्गी लावण्याचे मुख्य सचिवाचे निर्देश
आणि
Ø कळमनुरी कृषी
उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीसह तिघा जणांना लाच घेतांना अटक
*****
गर्भाशय भाड्यानं देण्याशी संबंधित पोशिंदा- सरोगसी
नियमन विधेयक २०१६ मध्ये सुधारणा करण्यास काल केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजुरी दिली.
या विधेयकात गर्भाशय भाड्यानं देण्याशी संबंधित बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी राष्ट्रीय
स्तरावर राष्ट्रीय पोशिंदा मंडळ तर राज्य आणि केंद्रशासित प्रदेश पातळीवर राज्य पोशिंदा
मंडळ स्थापन करण्याची तरतूद आहे. गर्भाशय भाड्यानं देण्याच्या बाबींचा व्यवसाय होऊ
नये म्हणून प्रभावी नियमन करण्याची आणि निःपुत्रिक दांपत्यांना आवश्यक परोपकारी पद्धतीनं
मदत करण्याची तरतूद या विधेयकात आहे.
राष्ट्रीय
आरोग्य अभियानास मार्च दोन हजार वीस पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णयही कालच्या मंत्रीमंडळ
बैठकीत घेण्यात आला. इतर मागासवर्गातल्या उप जातींचा केंद्रीय यादीत समावेश करण्यासंबधीच्या
मुद्द्याचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या आयोगाला २० जूनपर्यंत अंतिम
मुदतवाढ देण्यासही मंत्रीमंडळानं मंजुरी दिली.
****
संसदेचं कामकाज काल सलग तेराव्या दिवशीही होऊ शकलं
नाही. राज्यसभेत तेलगु देशम पक्षाच्या सदस्यांनी आंध्र प्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा
देण्याच्या मागणीसाठी, तामिळनाडुतल्या द्रविड मुन्नेत्र कळघम आणि अण्णाद्रमुकच्या सदस्यांनी
कावेरी जलव्यवस्थापन मंडळाच्या स्थापनेसाठी, सभापतींच्या आसनासमोर हौद्यात उतरून घोषणाबाजी
सुरू केली. काँग्रेसच्या सदस्यांनीही या सर्वांना पाठिंबा दर्शवत घोषणाबाजी सुरू केली.
दरम्यान विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी इराकमध्ये
मोसुल इथं ३९ भारतीय मारले गेल्या प्रकरणी सदनात चर्चेची मागणी केली. मात्र गदारोळ
वाढत गेल्यामुळे सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं.
लोकसभेतही तेलगु देसम, द्रमुक, अण्णाद्रमुक, तसंच
काँग्रेस पक्षाच्या खासदारांनीही याच मुद्यांवरुन गदारोळ केल्यानं, अध्यक्षांनी सरकारविरोधात
आलेल्या अविश्वास प्रस्तावावर कार्यवाही होऊ शकत नसल्याचं सांगत, कामकाज दिवसभरासाठी
तहकूब केलं.
****
लिंगायत समाजास अल्पसंख्याकाचा दर्जा देण्याच्या
कर्नाटक सरकारच्या निर्णयावर संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी टीका केली आहे.
हा निर्णय म्हणजे समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. काल संसद परिसरात पत्रकारांशी बोलाताना
कुमार यांनी, संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनेच २०१३ साली असा प्रस्ताव फेटाळला होता,
याकडे लक्ष वेधलं.
****
अंगणवाडी सेविकांना लावलेला आवश्यक
सेवा कायदा - मेस्मावरून शिवसेनेसह विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे विधानसभेचं कामकाज
काल बाधित झालं. अंगणवाडी सेविकांना लागू केलेला मेस्मा रद्द करावा, अशी मागणी करत
शिवसेना सदस्यांनी हौद्यात उतरून फलक झळकावले. सरकार हा कायदा मागे घेत नाही, तोवर
सभागृहाचं काम होऊ शकणार नाही, असं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले,
तर सरकार हुकुमशाही पद्धतीनं काम करत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. या गदारोळामुळे
सभागृहाचं काम तब्बल आठ वेळा आणि शेवटी दिवसभरासाठी तहकूब झालं. महिला आणि बालविकास
मंत्री पंकजा मुंडे यांनी या प्रकरणी संघटनांशी चर्चा करण्यात येईल, असं सांगितलं.
विधान परिषदेत काल मुंबईच्या समस्यांवर चर्चा झाली,
शिवसेनेनं त्यासाठी राज्य सरकारला तर भाजपनं महानगरपालिकेला जबाबदार ठरवलं.
****
महाराष्ट्राच्या वन विकासात लोक सहभागाचा वाटा अमूल्य
असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्त,
संत तुकाराम वनग्राम पुरस्कारांचं वितरण तसंच वन सेवेत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी
आणि कर्मचाऱ्यांचा काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला, त्यावेळी ते बोलत
होते. महाराष्ट्र वनक्षेत्रात देशपातळीवर चार क्षेत्रात पहिल्या स्थानावर आल्याचं मुख्यमंत्र्यांनी
यावेळी सांगितलं.
दरम्यान, वन दिनानिमित्त काल ठिकठिकाणी वृक्षदिंडी,
जनजागरण फेरीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी कधीच युती केली जाणार
नाही, असं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम
यांनी स्पष्ट केलं. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. काँग्रेस, राष्ट्रवादी
काँग्रेस आणि मनसे यांची युती होणार ही फक्त अफवा आहे, असं ते म्हणाले. काँग्रेस नेहमी
समविचारी पक्षाशी युती करते, मनसेची विचार सरणी वेगळी आहे, असं त्यांनी सांगितलं.
****
राज्याच्या डोंगराळ भागाच्या विकासासाठी राबवण्यात
येत असलेल्या कार्यक्रमांतर्गत, राज्यात सहा नवीन डोंगरी तालुके तसंच उपगटांची निर्मिती
करण्यात आली असून, त्यांच्या विकासासाठी साडेचार कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार
असल्याची माहिती अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर
यांनी दिली आहे. या नवीन तालुक्यांमध्ये नांदेड जिल्ह्यातल्या माहूर तालुक्याचा आणि
औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्री या उपगटाचा समावेश आहे. माहूर तालुक्याला एक कोटी
रुपये तर फुलंब्री उपगटाला पन्नास लाख रुपये निधी देण्याची तरतूद अर्थसंकल्पात प्रस्तावित
आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
औरंगाबाद शहरातला कचऱ्याचा प्रश्न कृतीबध्द कार्यक्रमानुसार
मार्गी लावण्याचे निर्देश, मुख्य सचिव सुमित मलिक यांनी काल दिले. या कचऱ्याच्या प्रश्नासंदर्भात
काल मुंबईत बैठक झाली. नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसेकर यांनी औरंगाबाद
इथला कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी, पंचसूत्री तयार केली असून, या पंचसूत्रीनुसार
हा कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देशही मलिक यांनी दिले. या बैठकीस प्रधान
सचिव म्हैसेकर, औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित
होते. सध्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी खत खड्डे तयार करण्याचं काम काही ठिकाणी
सुरु असल्याचं, महानगर पालिकेचे प्रभारी आयुक्त,
नवल किशोर राम यांनी यावेळी सांगितलं.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार
समितीमध्ये तूर खरेदीसाठी ४० हजार रुपयांची लाच घेतांना भारतीय जनता पक्षाच्या तालुकाध्यक्ष
आणि बाजार समितीचे सभापती संजय कावडे यांच्यासह तिघा जणांना लाच घेतांना काल पोलिसांनी
रंगेहाथ अटक केली. अटक करण्यात आलेल्यां अन्य दोघांमध्ये भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी
विपणन संस्थेचा ग्रेडर गोपीनाथ गरड आणि बाजार समिती सचिव बाबुलाल जाधव यांचा समावेश
आहे. या तिघांनी शेतकऱ्याकडे तूर खरेदीसाठी प्रतिक्विंटल ५०० रुपयांची मागणी केली
होती.
****
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीनं सुरु केलेली सोयाबीन
माल तारण कर्ज योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरली असून आतापर्यंत या योजनेअंतर्गत १५१
शेतकऱ्यांना २ कोटी २ लाख ८१ हजार ७७३ रुपये
कर्जवाटप करण्यात आलं आहे, असं सभापती ललितभाई शहा यांनी सांगितलं. शेतकऱ्यांनी भाव
मिळत नसताना कमी दरात सोयाबीन विकून नुकसान करुन घेऊ नये, त्या ऐवजी या योजनेचा फायदा
घेण्याचं आवाहन सभापती शहा, उपसभापती मनोज पाटील आणि सचिव मधुकर गुंजकर यांनी केलं
आहे.
****
यंदाचा अरविंद वैद्य स्मृती पुरस्कार
ज्येष्ठ पत्रकार नागनाथ फटाले यांना जाहीर झाला आहे. २९ हजार रुपये रोख, शाल आणि श्रीफळ
असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. गेल्या वर्षीपासून सुरु करण्यात आलेला युवा पत्रकार
पुरस्कार संकेत कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. पाच हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ असं
या पुरस्काराचं स्वरुप आहे.
****
परभणी इथं कालपासून जिल्हा कृषी महोत्सवाला प्रारंभ
झाला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.बी वेंकटेश्वरलू यांच्या
हस्ते महोत्सवाचं उद्घाटन झालं. विद्यापीठ परिसरात येत्या २५ तारखेपर्यंत हे प्रदर्शन
सुरु राहणार आहे.
लातूर इथं येत्या चोवीस ते अट्ठावीस मार्च दरम्यान
कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातल्या टाऊन हॉल मैदानात होणाऱ्या या महोत्सवात
शासनाच्या विविध कृषी योजनांची तसंच अर्थविषयक मदतीच्या योजनांची माहिती देण्यात येणार
आहे.
****
नांदेडच्या प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानच्या विविध
वाङमय पुरस्कारांची काल घोषणा करण्यात आली. सर्वोत्कृष्ट पुस्तकासाठीचा पुरस्कार रत्नागिरीच्या
अभिजित हेगशेट्ये यांना, साहित्य क्षेत्रातल्या योगदानाबद्दलचा पुरस्कार ज्येष्ठ कवी
भ.मा.परसवाळे यांना, ग्रंथगौरव पुरस्कार प्रदीप पाटील यांना तर उत्कृष्ट समीक्षा ग्रंथासाठीचा
पुरस्कार प्राध्यापक बाळू दुगडूमवार यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कारांचं हे सतरावं
वर्ष असून, येत्या एक एप्रिलला पुरस्कारांचं वितरण होणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment