Sunday, 25 March 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 25.03.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 March 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ मार्च २०१ दुपारी १.०० वा.

****

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त 14 एप्रिल ते 5 मे दरम्यान संपूर्ण देशभरात ग्रामस्वराज अभियान राबवलं जाणार असून, नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रम श्रृंखलेच्या आज प्रसारित झालेल्या ४२ व्या भागात ते बोलत होते. बाबासाहेबांनी भारताच्या सशक्त औद्योगिक भारताचं स्वप्न पाहिलं होतं, त्यांची दूरदृष्टी प्रेरणादायी असल्याचं पंतप्रधान म्हणाले.



 शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा पंतप्रधानांनी आजच्या कार्यक्रमातून उल्लेख केला. शेतमालाला उप्तादनापेक्षा दीडपट अधिक हमीभाव मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील असून, यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये त्यासाठीचा निर्णय घेण्यात आला असल्याचं, त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचं योग्य मूल्य मिळावं, यासाठी देशातील कृषी बाजारांमध्ये सुधारणा घडवणं तसंच तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं पंतप्रधान म्हणाले.



 आरोग्य, योगाभ्यास, स्वच्छ भारत, आदी विषयांवरही पंतप्रधानांनी भाष्य केलं. येत्या २१ जून अर्थात जागतिक योग दिनापर्यंत योगाभ्यासाबाबत जागृती करण्यासाठी विशेष अभियान रावबण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. आज साजऱ्या होत असलेल्या रामनवमीसह आगामी काही दिवसांत येणारी हनुमान जयंती, महावीर जयंती, ईस्टर संडे आदी सणांच्या पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या.

****

 रामनवमी आज देशभरात अत्यंत भक्तीभावात आणि हर्षोल्हासात साजरी होत आहे. दुपारी बारा वाजता ठिकठिकाणच्या राम मंदिरामंध्ये रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी देशवासियांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  भगवान राम यांच्या जीवनातून नीतीमूल्यांचं पालन करणं आणि सत्याच्या मार्गावर चालणं, कर्तव्यनिष्ठा, संयम, नैतिकता आणि निस्वार्थ भावनेतून काम करण्याचा संदेश प्रत्येकाला मिळतो, असं सांगत राष्ट्रपतींनी, आपल्या चांगल्या वागणूकीतून आणि कार्यातून जगाला सुंदर, स्वच्छ आणि समृध्द बनवण्याचं आवाहन केलं आहे.

 यानिमित्त आज ठिकठिकाणच्या राम मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

 नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिरासह, गोरा राम मंदीर, कोदंडधारी राम मंदिरात नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. वणी इथल्या सप्तशृंगी देवीच्या चैत्र उत्सवाला आजपासून प्रारंभ झाला.

 औरंगाबाद शहरातही विविध ठिकाणच्या राममंदिरांमध्ये रामजन्मसोहळा भक्तीभावानं साजरा झाला. मराठवाड्यात सर्वत्र रामजन्मानिमित्त शोभायात्रेसह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे.

 वाशिम जिल्ह्यातल्या पोहरादेवी इथं बंजारा समाजाच्या यात्रेला प्रारंभ झाला असून, राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वतीनं गोर साहित्य परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे.

****



 सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी उजनी धरणातून सहा घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात आल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली आहे. उजनी धरणातलं उपलब्ध पाण्याचं काटेकोरपणे नियोजन करण्यात आलं असून, शेती बरोबरच शहराच्या पाणी पुरवठ्यासाठीही नियोजन होणं अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं. काल रात्रीपासून हे पाणी भीमा नदीच्या पात्रात सोडण्यात आलं आहे.

****



 तेलंगणा राज्यात तेलुगू शिकणं आणि शिकवणं सक्तीचं करण्याबाबतचं विधेयक काल राज्य विधानसभेत पारित करण्यात आलं. याबाबतच्या तेलंगणा कायदा २०१८ला भाजपा, तेलुगू देसम, ए आय एम आय एम आणि माकपासह सर्वच पक्षांचं समर्थन आहे. सीबीएसई, आयसीएसई, आयबी आणि केम्ब्रीज बोर्डाच्या सर्व शाळांमध्ये तेलुगू भाषा शिकवणं सक्तीचं करण्यात येणार आहे.

****



 छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात काल सात नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली. या नक्षलवाद्यांनी १३ मार्चला केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या वाहनांच्या ताफ्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात नऊ जवान हुतात्मा झाले होते. किश्तारामच्या जंगलात शोध अभियानादरम्यान या नक्षलवाद्यांना अटक केल्याचं सुकमाचे पोलिस अधीक्षक अभिषेक मीणा यांनी सांगितलं.

****



 जम्मू काश्मीरमधल्या बडगाम जिल्ह्यात सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. बीरवा परिसरात दहशतवादी कारवाया सुरु असल्याची माहिती मिळताच लष्करानं काल रात्री याठिकाणी शोधमोहीम राबवली. चकमकीच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****



 पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट इथं होणाऱ्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. चार एप्रिलला होणाऱ्या या कार्यक्रमात पी.व्ही. सिंधू ध्वजवाहक म्हणून भारताचं नेतृत्व करणार आहे.

*****

***


No comments: