Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 28 March 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ मार्च २०१८ सकाळी ६.५० मि.
*****
Ø
भीमा कोरेगाव घटनेची सखोल चौकशी करण्याचं सरकारचं
आश्वासन; संभाजी भिडे यांच्या सहभागाचा पुरावा नाही- मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत स्पष्टीकरण
Ø
जेष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि पहिल्या विश्व मराठी
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या पार्थिवावर शासकीय
इतमामात अंत्यसंस्कार
Ø दहावी - बारावी परीक्षेच्या
प्रश्नपत्रिका फुटण्यास आळा घालण्यासाठी कठोर कायदा करण्याचा सरकारचा विचार
आणि
Ø लातूर इथल्या नियोजित मेट्रो रेल्वे
डबे बांधणी कारखान्याचं येत्या शनिवारी भूमिपूजन
*******
गेल्या १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव इथं घडलेली
घटना ही महाराष्ट्राच्या इतिहासात कलंक असून या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल, असं
आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. ते काल विधान सभेत राज्यातल्या कायदा
आणि सुव्यवस्थेसंदर्भात झालेल्या चर्चेला उत्तर देतांना बोलत होते. या घटनेतल्या दोषींची
गय केली जाणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. भारतीय
रिपब्लिकन पक्ष- बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आरोप केलेले संभाजी भिडे
यांचा या घटनेतल्या हिंसाचारामध्ये सहभाग असल्याचा कोणताही पुरावा आढळून आला नसल्याचं
त्यांनी सांगितलं. भिडे किंवा त्यांच्या अनुयायांनी गेल्या सहा महिन्यात या परिसराला
भेट दिलेली नाही, या काळात त्यांचं दूरध्वनीवरदेखील कोणाशीही संभाषण झालं नसल्याचं
मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. भिडे आणि हिंदु एकता परिषदेचे नेते मिलिंद एकबोटे
यांना भिमा कोरेगाव इथल्या दंगलीला चिथावणी देतांना पाहिल्याचा दावा एका महिलेनं केला होता, मात्र,
तपासात भिडे यांच्याविरूद्ध कोणताही पुरावा सापडला नसल्याचं फडणवीस म्हणाले.
****
जेष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि पहिल्या विश्व मराठी
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या पार्थिवावर काल सायंकाळी
औरंगाबाद इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पानतावणे यांचं काल पहाटे प्रदीर्घ
आजारानं निधन झालं, ते ८१ वर्षांचे होते. दलित साहित्याचा सखोल अभ्यास करणारे पानतावणे
यांचे, ‘धम्मचर्या’, ‘मूल्यवेध’, ‘मूकनायक’, ‘विद्रोहाचे पाणी पेटले आहे’, ‘वादळाचे
वंशज’, ‘दलित वैचारिक वाङ्मय’, ‘किल्ले पन्हाळा ते किल्ले विशाळगड’, ‘साहित्य, प्रकृती
आणि प्रवृत्ती’, ‘साहित्य शोध आणि संवाद’ हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. डॉक्टर बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून कार्य केलेले पानतावणे, अस्मितादर्श या त्रैमासिकाचे
संस्थापक संपादक होते. पानतावणे यांनी २००९ साली अमेरिकेतल्या सॅनहोजे इथं झालेल्या
पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही भूषवलं होतं. भारत सरकारचा २०१८
या वर्षाचा पद्मश्री पुरस्कार त्यांना नुकताच जाहीर झाला आहे.
पानतावणे यांच्या निधनाबद्दल समाजाच्या सर्वच स्तरातून
शोक व्यक्त होत आहे. व्यासंगी
प्राध्यापक, कृतीशील विचारवंत आणि परखड समीक्षक म्हणून एक स्वतंत्र ओळख
निर्माण केलेले डॉ गंगाधर पानतावणे यांच्या निधनानं आंबेडकरी चळवळ आणि
साहित्याला वैचारिकतेचं अधिष्ठान देणारा एक ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला, अशा
शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पानतावणे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. पानतावणे
यांच्या निधनानं आंबेडकरी चळवळीचा मार्गदर्शक हरपला, अशा
शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी, तर
पानतावणे यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या
साहित्य क्षेत्रातला हिरा निखळला, अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी
आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी
काल पानतावणे यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रध्दांजली वाहिली. साहित्य, शिक्षण तसंच राजकीय क्षेत्रातल्या मान्यवरांसह
मोठ्या संख्येनं सर्वसामान्य नागरिकांनी पानतावणे यांना अखेरचा निरोप दिला.
****
विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याविरूद्धचा
अविश्वास ठराव काल विरोधी पक्षानं मागे घेतला. बागडे यांच्याविरूद्ध विरोधी पक्षानं
ठरावाची नोटीस दिल्यानंतर सरकारनं विश्वासदर्शक ठराव मांडून तो आवाजी मतदानानं मंजूर
केला होता, मात्र त्यानंतर विरोधी पक्षानं दोन दिवस सभागृहात हा विषय लावून धरला होता.
****
आयकर दात्यांना आयकर विवरणपत्रं दाखल करता यावीत
आणि त्यासंबंधीची सर्व कामं पूर्ण करता यावीत यासाठी, आयकर विभागाची देशभरातली कार्यालयं
येत्या २९, ३० आणि ३१ मार्चला सुरु राहणार आहेत. या विभागाचे चौकशी कक्षही तीनही दिवस
सुरु राहणार असल्याचं अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
****
दहावी - बारावी परीक्षेत होणाऱ्या नकला तसंच प्रश्नपत्रिका
फुटी प्रकरणांना प्रतिबंध करण्यासाठी सरकार कठोर कायदा आणण्याच्या प्रयत्नात असल्याचं,
शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काल विधान परिषदेत सांगितलं. अशा प्रकरणांमुळे अभ्यासू विद्यार्थ्यांचं नुकसान होत
असल्याबद्दल शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन
चर्चेला ते उत्तर देत होते. प्रश्नपत्रिका
फुटणं किंवा
नकला प्रकरणांमुळे परीक्षा
केंद्र आयत्या वेळी बदलणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, प्रश्नपत्रिका
फुटीनंतर राज्यातल्या सगळ्या केंद्रांऐवजी फक्त प्रश्नपत्रिका
ज्या केंद्रावर फुटली तिथलीच प्रश्नपत्रिका बदलण्याचा
विचार होईल असं तावडे यांनी यावेळी सांगितलं. या प्रकरणांमध्ये कठोर
कारवाई करण्यासाठी आणि नकला मुक्त परीक्षांसाठी शिक्षक आमदारांनी सहकार्य करावं, असं
आवाहन तावडे यांनी यावेळी केलं.
****
बीड जिल्ह्यातले शिवणी सिंचन आणि जरुड सिंचन हे दोन्ही
प्रकल्प एकमेकांना जोडण्याबाबत येत्या सहा महिन्यात निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती
जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी काल विधान परिषदेत प्रश्नोतराच्या तासांत दिली. यासंदर्भात
अमरसिंह पंडीत यांनी प्रश्न विचारला होता.
या दोन्ही प्रकल्पातले पाणी प्रत्येकी चार गावांमधल्या शेतजमिनींना कालव्याद्वारे देण्यात
येतं. मात्र या प्रकल्पातली पाण्याची आवक आणि वापराशिवाय वाहून जाणारे पाणी लक्षात
घेता या दोन्ही प्रकल्पांना एकमेकांना जोडून घेण्याबाबतची व्यवहार्यता तपासून घेऊन
सहा महिन्यात निर्णय घेण्यात येईल असं शिवतारे यांनी सांगितलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
लातूर इथल्या नियोजित मेट्रो रेल्वे डबे बांधणी कारखान्याचं
भूमिपूजन येत्या शनिवारी ३१ तारखेला होणार आहे. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी
काल लातूर इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या कारखान्यामुळे १५ हजार तरुणांना
रोजगार मिळणार असून, यासोबतच ४८ विविध सहउद्योगही सुरु होणार असल्याचं निलंगेकर यांनी
सांगितलं.
****
जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातल्या ५० गावांची
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत निवड झाली आहे. काल घनसावंगी पंचायत समिती
कार्यालयात आयोजित पाणीटंचाई आढावा बैठकीत आमदार राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.
पाणीटंचाई असलेल्या गावात आवश्यक उपाययोजना तत्काळ करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
****
उस्मानाबाद
जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्यावतीनं उत्कृष्ट काम करणाऱ्या
अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका यांचा काल सत्कार करण्यात आला. जागतिक महिला
दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्ष अर्चना
पाटील यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या २८ महिला सदस्यांचाही सत्कार करण्यात आला.
****
जालना शहरातल्या पथदिव्यांचा वीज पुरवठा आजपासून
सुरु करण्यात येणार आहे. नगर परिषदेकडे गेल्या काही दिवसांपासून वीज बिल थकित होते
त्यामुळे पथदिवे बंद करण्यात आले होते. काल पथदिव्यांच्या वीज बिलापोटी ४ कोटी १२ लाख
९९ हजार रुपये एवढ्या निधीचा भरणा करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं स्वाभिमानी
शेतकरी संघटनेच्यावतीनं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भातलं निवेदन मुख्यमंत्र्यांना
देण्यासाठी तहसिलदारांकडे सुपूर्द करण्यात आलं. शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला हमी भाव
मिळावा, विमा संरक्षण कायदा लागू करावा, आदी मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या
आहेत. या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा संघटनेच्यावतीनं
देण्यात आला आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या समसापूर इथल्या जिल्हा परिषद
शाळेच्या मुख्याध्यापकाला शालेय पोषण आहारातल्या खिचडी शिजवण्याच्या कामाचं बिल काढण्यासाठी
कामगाराकडून दीड हजार रूपयांची लाच घेतांना अटक करण्यात आली. भगवान नांदुरे असं या
मुख्याध्यापकाचं नाव आहे.
****
जालना शहरातल्या कदीम पोलीस ठाण्यातला पोलीस शिपाई
राजेंद्र वेलदोड याला पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं
काल रंगेहाथ अटक केली. चारित्र्य पडताळणी अहवाल देण्यासाठी त्यानं तक्रारदाराकडं लाचेची
मागणी केली होती.
****
मराठवाड्यात काल परभणी
इथं सर्वाधिक ४० पूर्णांक
चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, उस्मानाबाद इथं
३९, तर औरंगाबाद इथं ३८ पूर्णांक ३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं.
*****
***
No comments:
Post a Comment