Saturday, 31 March 2018

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 31.03.2018 6.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 March 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१  मार्च २०१ सकाळी .५० मि.

*****

·        अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर केंद्र सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार

·        सीबीएसईच्या बारावी अर्थशास्त्र विषयाची पुनर्परीक्षा २५ एप्रिल रोजी तर दहावी गणित विषयाची पुनर्परीक्षा फक्त दिल्ली आणि हरियाणा राज्यातच होणार

·        कृषीविषयक प्रश्नांकडे शेतीतज्ज्ञ आणि संशोधकांनी लक्ष केंद्रीत करावं - माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार

·        हनुमान जन्मोत्सव सर्वत्र भक्तीभावानं साजरा

आणि

·        लातूर इथल्या नियोजित मेट्रो रेल्वे डबेबांधणी कारखान्याचं आज सायंकाळी भूमिपूजन

****

अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा ॲट्रोसिटी संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं नुकत्याच दिलेल्या निर्णयासंदर्भात केंद्र सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री थावरचंद गहलोत यांनी काल ट्विटरसंदेशात ही माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयानं, या कायद्यांतर्गत तत्काळ कारवाई करण्याऐवजी पूर्ण चौकशीअंती कारवाईचे निर्देश दिले होते, तसंच अशा प्रकरणात जामीन देण्याबाबतचे निर्बंध हटवले होते. अनुसूचित जाती जमातीच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असून, या निर्णयाविरोधात केंद्र सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचं, गहलोत यांनी म्हटलं आहे.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईची बारावी अर्थशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे या विषयाची पुनर्परीक्षा २५ एप्रिल रोजी होणार असल्याचं, मंडळाकडून सांगण्यात आलं आहे. दहावीच्या गणित विषयाची प्रश्नपत्रिका फुटली होती, त्यामुळे या विषयाची पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्यास, ती जुलै महिन्यात होण्याची शक्यता आहे. मात्र ही परीक्षा फक्त दिल्ली आणि हरियाणा राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठीच असेल, इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षा द्यावी लागणार नसल्याचं, मनुष्यबळ विकास मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

****

कृषीविषयक प्रश्नांकडे शेतीतज्ज्ञ आणि संशोधकांनी लक्ष केंद्रीत केलं पाहिजे, असं माजी केंद्रीय कृषी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. काल जळगाव इथं, जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडच्या वतीनं देण्यात येणारा पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार नाशिक जिल्ह्यातले प्रगतीशील तरुण शेतकरी अविनाश पाटोळे यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सन्मानचिन्ह, आणि दोन लाख रुपये, असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. शेती क्षेत्रातले बदल आणि संशोधनाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहो चवली, तरच शेतीत बदल घडून येतील, असं पवार यांनी नमूद केलं. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते, नवं तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांचं उत्पन्न वाढवण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचं पाटील यावेळी म्हणाले, तर फुंडकर यांनी, कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभं असल्याची ग्वाही दिली. लोणीकर यांनी, जालना जिल्ह्यात फक्त शेतकऱ्यांची औद्योगिक वसाहत उभारण्यात येत असल्याचं सांगतानाच, शेतकरी वर्गानं विक्री कलाही आत्मसात केली पाहिजे, असं मत व्यक्त केलं.

****

केंद्राच्या सुचनेनुसार २५ वर्षांपेक्षा जुने वीजनिर्मिती प्रकल्प टप्प्या-टप्प्यानं बंद करण्यात येणार असून पर्यावरणाची हानी न करणारे नवे प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. जळगाव जिल्ह्यात भुसावळ तालुक्यातल्या दीपनगर इथं उभारण्यात येणाऱ्या ६६० मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्पाचं भूमिपूजन काल महसूल मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. भुसावळ इथला हा प्रकल्प ४२ महिन्यात पूर्ण होईल, असं पाटील यांनी सांगितलं. ११४ हेक्टर जमिनीवर साकारणाऱ्या या ६६० मेगावॅट क्षमतेच्या वीजनिर्मिती प्रकल्पामुळे भुसावळ वीजनिर्मिती केंद्राची क्षमता एक हजार ८७० मेगावॅट एवढी होणार आहे. जामनेर तालुक्यात केकतनिंभोरा आणि यावल तालुक्यात विरोदा इथं २२० किलोवॅट क्षमतेच्या तसंच भडगाव तालुक्यात कोठली, आणि मुक्ताईनगर तालुक्यात कर्की पुर्नाड इथं १३२ किलोवॅट क्षमतेच्या उपकेंद्रांचं तसंच इतर आठ उपकेंद्राचं भूमिपूजनही काल करण्यात आलं.

****

करदात्यांना कराचा भरणा करणं सोयीचं व्हावं यासाठी आज ३१ मार्चला भारतीय रिर्व्ह बँकेची कार्यालयं आणि कर भरण्याची सुविधा असलेल्या बँकांच्या शाखा रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. याशिवाय इलेक्ट्रॉनिक व्यवहार रात्री बारा वाजेपर्यंत सुरु राहतील. सरकारी भरणा आणि पोचपावतीसाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली असून, आरटीजीएस आणि एनइएफटी या सुविधा देखील वाढीवेळेत सुरू राहणार असल्याचं बँकेकडून सांगण्यात आलं आहे.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

हनुमान जन्मोत्सव आज सर्वत्र भक्तीभावानं साजरा होत आहे, ठिकठिकाणच्या हनुमान मंदिरांमध्ये सूर्योदयाच्या वेळी हनुमानाचा जन्मसोहळा पारंपरिक पद्धतीनं साजरा झाला. औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद इथं भद्रा मारोतीच्या दर्शनासाठी काल रात्रीपासूनच अनेक भाविक पायी चालत पहाटेच्या सुमारास मंदिरात दाखल झाले. औरंगाबाद इथल्या प्रसिद्ध सुपारी हनुमान मंदिरातही भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. या निमित्तानं सर्वत्र धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

लातूर इथल्या नियोजित मेट्रो रेल्वे डबेबांधणी कारखान्याचं भूमिपूजन आज सायंकाळी होणार आहे. तीन टप्प्यात उभारल्या जाणाऱ्या या कारखान्याचा पहिला टप्पा हरंगुळ रेल्वेस्थानकाजवळ औद्योगिक वसाहतीत उभारला जात आहे, याच ठिकाणी आज सायंकाळी रेल्वेमंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचं भूमिपूजन होईल. जिल्हा क्रीडा संकुलावर यानिमित्तानं जाहीर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कारखान्याला अनुदानापोटी सध्या ६०० कोटी रुपये मंजूर झालेले असून, या कारखान्याच्या सोबत ४८ सहउद्योग ही सुरु होणार आहेत.

****

मराठवाडयाच्या रेल्वे प्रश्नाबाबत कालबध्द कार्यक्रम आखून तो पूर्ण करावा, अशी मागणी मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष विधीज्ञ प्रदीप देशमुख यांनी केली आहे, या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात देशमुख यांनी, रेल्वेविकासासंदर्भात मराठवाड्याची उपेक्षा होत असल्याचं म्हटलं आहे. रेल्वे रुंदीकरण आणि नव्या रेल्वे मार्गांच्या विस्ताराबाबत मराठवाड्यात कालबध्द कार्यक्रम राबवण्याची गरज देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

****

बौद्ध धर्मियांनी गौतम बुद्धांच्या विचारांप्रमाणे आचरण करावं, असं आवाहन, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी केलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातल्या कारोळी इथं आयोजित तिसऱ्या बौद्ध परिषदेच्या उद्धाटन प्रसंगी ते काल बोलत होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५५ साली बौद्ध महासभा सुरु केली तेव्हापासून आजपर्यंत या धम्माच्या प्रचार आणि प्रसार करण्याचं काम सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या कर्नाटक सीमा भागातले बौद्ध धर्मीय ह्या परिषदेला मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

****

लातूर जिल्ह्यात निलंगा उपजिल्हा रुग्णालयाला १०० खाटांची मंजूरी मिळाली असून १८ कोटी २६ लाख ४२ हजार रुपये निधी प्राप्त झाला आहे. ५० खाटांचं हे रुग्णालय आरोग्य सुविधा पुरवण्यास अपुरं पडत असल्यानं, ते १०० खाटांचं करण्याची मागणी जनतेकडून केली जात होती, या रुग्णालयात नऊ विशेषज्ञ अधिकारी, पाच आरोग्य अधिकारी, तसंच १२५ आरोग्य कर्मचाऱ्यांची नव्यानं नियुक्ती होणार असल्याची माहिती पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली. उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी आवश्यक यंत्रसामुग्रीही उपलब्ध होणार असल्याचं, निलंगेकर यांनी सांगितलं.

****

नांदेड इथं आयोजित कृषी महोत्सवाचा काल समारोप झाला. या महोत्सवात नांदेडसह परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातल्या २० हजार शेतकरी आणि ग्राहक सहभागी झाले. गेल्या २६ तारखेपासून सुरु असलेल्या या महोत्सवात जवळपास ६७ लाख रुपयांच्या शेतमालाची विक्री झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

****

आगामी काळात राज्यातल्या पाच हजार विकास कार्यकारी संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात येणार असल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे. ते काल सोलापूर इथं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शतकोत्सवी महोत्सवात बोलत होते. आर्थिक नियोजनाअभावी राज्यातल्या ज्या १२ हजार विकास कार्यकारी संस्था बंद पडल्या, त्या पुनरुज्जीवित केल्या जातील, असं त्यांनी यावेळी सांगितलं.



****

परभणी आणि पूर्णा शहरासाठी पिण्याच्या पाण्याची आवश्यकता असल्यानं, निम्न दुधना प्रकल्पातून उद्या एक एप्रिल रोजी दुधना नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे दुधना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी नदीपात्रात जाऊ नये, तसंच आपली जनावरं नदीपात्रात जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी, नदीपात्रात सोडण्यात आलेल्या पाण्याचा उपसा विद्युत मोटारीद्वारे कोणीही, कोणत्याही प्रयोजनासाठी करु नये, असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.

****

राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. परभणी जिल्ह्यात काल ४१ अंश तर नाशिकमध्ये ३९ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

//**********//

No comments: