आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२६ मार्च २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
जनलोकपाल आणि अन्य मागण्यांसह नवी दिल्ली इथं सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी सुरू
केलेल्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. अण्णांनी उपोषण मागं घ्यावं यासाठी राज्य शासनाकडून
प्रयत्न सुरू असून, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आज अण्णांची भेट घेणार आहेत. मागण्या
मान्य असल्याचं पत्र घेऊनच चर्चा करण्यासाठी यावं असं सांगत हजारे यांनी, महाजन यांची
भेट नाकारल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
नांदेड जिल्हा कृषी महोत्सवाला आजपासून सुरुवात होत
आहे. पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होईल. आज पहिल्या
दिवशी महोत्सवात केळी आणि हळद लागवड तंत्रज्ञानावर चर्चासत्र होणार आहे.
****
वेतन करार होत नसल्यानं राज्य परिवहन महामंडळाच्या
औरंगाबाद इथल्या चिकलठाणा मध्यवर्ती कार्याशाळेतल्या कर्मचाऱ्यांनी काल शासनाला इच्छा
मरणासाठीची मागणी करणारं निवेदन दिलं. शंभराहून अधिक कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या
निवेदनाला जोडलेल्या आहेत. वेतन वाढ झाली नसल्यानं आर्थिक - मानसिकदृष्ट्या दुर्बल झालो असल्यानं ही
मागणी केल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. याअधी जिल्ह्यातल्या कन्नड आगारातूनही कर्मचाऱ्यांनी
असं निवेदन दिल्याचं वृत्त आहे.
****
मुंबई गोवा महामार्गावर वारकऱ्यांच्या दिंडीत मोटार
घुसून झालेल्या अपघातात दोन वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. काल रात्रीच्या सुमारास
हा अपघात झाला. मंडणगड तालुक्यातल्या तोंडली गावचे भाविक खेड तालुक्यातल्या उधळे इथल्या
साई मंदिरात दिंडीनं निघाले होते.
****
भारतीय जनता पक्षाचे रत्नागिरीचे माजी जिल्हाध्यक्ष
आणि ज्येष्ठ नेते जनार्दन नारायण ऊर्फ जनूभाऊ काळे यांचं काल रत्नागिरीत निधन झालं,
ते ९४ वर्षांचे होते. आणीबाणीच्या काळात त्यांनी एकोणीस महिने तुरुंगवास भोगला होता.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या विविध सामाजिक संघटनांशी त्यांचा निकटचा संबंध होता.
****
भारत कोणत्याही आव्हानाचा सामना
करण्यासाठी सज्ज आहे, असं संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटलं आहे.
त्या काल देहरादून इथं बातमीदारांशी बोलत होत्या. प्रादेशिक एकात्मता जपण्यासाठी आवश्यक
ती सर्व पावलं उचलली जातील, असंही त्यांनी सांगितलं. तिन्ही संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणासाठी
सरकारनं विविध उपक्रम हाती घेतल्याची माहिती त्यांनी दिली.
*****
***
No comments:
Post a Comment