Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 31 March 2018
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ मार्च २०१८ सायंकाळी
५.२५ मि.
****
उत्पादकता सुधारणं, शेती क्षेत्र मजबूत करणं आणि ई नाम सारख्या ऑनलाईन बाजारपेठा
उपलब्ध करणं यासारख्या प्रयत्नातून २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होण्यास
मदत होईल, असं उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. ते आज हैदराबाद इथं
एका कार्यक्रमात बोलत होते. शेतकऱ्यांनी स्वत:ची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कुक्कुटपालन,
दुग्धव्यवसाय यांसारखे जोडधंदे सुरु करावेत, असं ते म्हणाले. कृषी उत्पादनांचं योग्य
मूल्य सुनिश्चित करण्याला प्राथमिकता दिली पाहिजे, त्यामुळेच शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट
करण्याचं उद्दिष्ट पूर्ण होईल, असं त्यांनी नमूद केलं.
****
केंद्रीय अन्वेषण विभाग - सी बी आयनं आय सी आय सी आय बँकेच्या
व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडीओकॉनचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांच्यामधील कथित व्यावसायिक संबंधांबाबत प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. आय सी आय सी
आयनं २०१२ मध्ये धूत यांना तीन हजार दोनशे पन्नास कोटी रुपयांचं कर्ज दिल्यानंतर, सहा महिन्यांनी धूत यांनी दीपक कोचर यांच्या कंपन्यांना कोट्यवधी
रुपये दिल्याचा आरोप आहे. धूत यांना आय सी आय सी आय बँकेकडून मिळालेलं हे कर्ज स्टेट
बँक ऑफ इंडियासह २० बँकांकडून मिळालेल्या चाळीस हजार कोटी रुपये कर्जाचा
भाग आहे. मात्र, या प्राथमिक चौकशीमध्ये चंदा कोचर यांचा समावेश नसून त्यांच्या चौकशीबाबत
नंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचं सी बी आयनं म्हटलं आहे.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३३८ व्या पुण्यतिथीनिमीत्त आमदार आशिष शेलार
यांनी मुंबईत विधान भवन प्रांगणातल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार
अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉक्टर अनंत
कळसे, विधानसभा अध्यक्षांचे सचिव राजकुमार सागर आणि इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित
होते.
****
रायगडावराही शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आज विविध कार्यक्रम पार पडले.
श्री शिवपुण्यस्मृती पुरस्कारांचं वितरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन
भागवत यांच्या हस्ते करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आजही जिवंत असल्याचं,
तसंच रायगड हा सर्वांसाठी मार्गदर्शक असल्याचं भागवत यांनी यावेळी नमूद केलं.
****
संशोधन केंद्रांतून नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतावर पोहोचवण्यासाठी पुढील
काळात प्रशिक्षित कृषी विस्तार कार्यकर्त्यांची फळी निर्माण करावी लागेल, असं मत यशवंतराव
चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू इ. वायुनंदन यांनी व्यक्त केलं आहे.
नाशिक इथं आज ‘कृषी विस्तार सेवा प्रदाता’ या तीस दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या
उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
****
जालना नगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या
अध्यक्षतेखाली घेण्यात आली. राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत शहरी बेघरांना
तात्पुरता बेघर निवारा सुरू करणं, शहरातल्या खुल्या भूखंडावर ज्येष्ठ नागरिकांसाठी
नाना-नानी पार्क विकसित करणं आदी २१ ठरावांना सभागृहानं मान्यता दिली. शहरातल्या आठवडी
बाजारात ग्रामीण भागातून भाजीपाला विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांकडून जागाभाडे वसूल
केलं जाऊ नये, अशी मागणी शिवसेनेच्या सदस्यांनी सभागृहात केली.
****
तिहेरी तलाक विरोधी विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी
नाशिक इथं आज शरियत बचाव कृती समितीच्या वतीनं मुस्लिम महिलांचा मूक मोर्चा काढण्यात
आला. महिलांच्या एका प्रतिनिधी मंडळाच्या वतीनं यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात
आलं. यात धार्मिक प्रथांमधील सरकारी हस्तक्षेपास विरोध करण्यात आला आहे. या मोर्चात
नाशिक जिल्ह्यातील विविध भागातल्या मुस्लिम महिला सहभागी झाल्या होत्या.
****
औरंगाबादच्या कचरा प्रश्नावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी यशवंतराव चव्हाण
प्रतिष्ठान आणि महात्मा गांधी मिशन यांच्या संयुक्त विद्यमानं येत्या दोन एप्रिल रोजी
‘कचराकोंडी जागर संवाद’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. कचरा प्रश्नाचे ज्येष्ठ
अभ्यासक आणि मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ.शरद काळे हे
यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.
****
राज्यात मराठवाडा आणि विदर्भात तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. आज सर्वात जास्त
४२ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमान परभणी इथं नोंदवलं गेलं. नांदेड ४२, बीड ४१, तर
औरंगाबाद इथं ३९ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढचे दोन दिवस राज्यात
आणखी उष्णता वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
भारताचा बॅडमिंटनपटू समीर वर्मा वरलीन्स ओपन वर्ल्ड हंड्रेड स्पर्धेच्या उपांत्य
फेरीत पोहोचला आहे. उत्पांत्यपूर्व फेरीत समीरनं फ्रान्सच्या लुकास कर्व्हीचा १७-२१,
२१-१९, २१-१५ असा पराभव केला. भारताचा दुसरा खेळाडू परुपल्ली कश्यप याला पुरुष एकेरीत,
तर भारतीय जोडी फ्रान्सीस अलवीन आणि के. नंदगोपाल यांना या स्पर्धेत पराभव पत्करावा
लागला.
****
No comments:
Post a Comment