Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 28 March 2018
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ मार्च २०१८ सायंकाळी
५.२५ मि.
****
संसदेत
सध्या निर्माण झालेल्या कोंडीला सत्ताधारी आणि विरोधी, दोन्ही पक्ष जबाबदार असून, दोन्ही
पक्षांनी ही कोंडी फोडण्याचा मार्ग काढावा, असं मत राज्यसभेचे मावळते उपसभापती पी.जे.कुरियन
यांनी व्यक्त केलं आहे. ते आज राज्यसभेत निरोपाच्या भाषणात बोलत होते. सत्ताधारी आणि
विरोधी पक्षांनी सभागृहातल्या चर्चेचा स्तर उंचावण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
ऐंशीच्या दशकातल्या खासदारांचा विरोध दर्शवण्याचा सर्वात तीव्र मार्ग म्हणजे सभागृहाबाहेर
जाणे हा होता, मात्र आताचे खासदार त्यासाठी हौद्यात उतरण्याचा मार्ग स्वीकारतात, अशा
शब्दांत संसदेतल्या गोंधळाबाबत चिंता व्यक्त करत, प्रत्येक खासदारानं आत्मपरीक्षण करावं
असं आवाहन कुरीयन केलं.
****
केंद्रीय
माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईनं दहावीचा गणित विषय तसंच बारावीच्या अर्थशास्त्र या
विषयाची पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही विषयांच्या परीक्षेच्या
प्रश्नपत्रिका फुटल्याचा प्रकार समोर आला होता, त्यामुळे पुनर्परीक्षेचा निर्णय घेतल्याचं,
पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राज्यपाल
सी.विद्यासागर राव यांनी औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे
कुलगुरू डॉक्टर बी.ए.चोपडे यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. चोपडे यांच्याविरोधात अनेक
व्यक्ती तसंच संघटनांकडून राज्यपालांना तक्रारी प्राप्त झाल्यानंतर, राज्यपालांनी शासनाला
वस्तुस्थिती दर्शक प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती, उच्च आणि तंत्र
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानपरिषदेत दिली. यानुसार, निवृत्त कुलगुरू डॉक्टर
एस.एफ.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीला
येत्या दोन महिन्यात अहवाल देण्यास सांगितलं आहे. आमदार सतीश चव्हाण यांनी डॉक्टर चोपडे
यांच्या कामकाजासंदर्भात सभागृहात प्रश्न उपस्थित करून चौकशीची मागणी केली होती.
****
ज्येष्ठ
सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या मागण्यांवर सरकार गांभीर्यानं विचार करत नसल्याचा
आरोप करत, राळेगण सिद्धीच्या ग्रामस्थांनी उद्यापासून सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना
गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. अण्णांच्या मागण्यांना पाठिंबा म्हणून, जेलभरो
आंदोलन करण्याचा निर्धार या ग्रामस्थांनी केला आहे. राळेगण सिद्धी इथं आज दुपारी झालेल्या
सभेत हा निर्णय घेण्यात आला.
****
कोरेगाव
प्रकरणात संभाजी भिडे यांना गोवण्यात आल्याच्या निषेधार्थ आज राज्यात अनेक ठिकाणी हिंदुत्ववादी
संघटनांनी मोर्चे काढल्याचं वृत्त आहे. सांगली, नाशिक, धुळे, नांदेड, कोल्हापूर आणि
सातारा इथं यासंदर्भात मोर्चे काढण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
****
भारतीय
पुरातत्त्व विद्येचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. मधुकर ढवळीकर यांच्या निधनानं संशोधनाच्या
आधारे भारतीय प्राचीन इतिहासाचं वास्तव मांडणारा श्रेष्ठ संशोधक आपण गमावला, अशा शब्दात
भारतीय जनता पक्षानं त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. पक्षाचे प्रवक्ते माधव भांडारी
यांनी एक पत्रक जारी करून, या भावना व्यक्त केल्या. ढवळीकर यांचं काल रात्री पुण्यात
निधन झालं, ते ८९ वर्षाचे होते. त्यांची ‘भारताची कुळकथा’, ‘लढा टाकलेल्या स्त्रियांचा’
इत्यादी पुस्तकं प्रसिद्ध आहेत, केंद्र सरकारनं २०११ साली त्यांचा पद्मश्री पुरस्कार
देऊन गौरव केला होता.
****
हिंगोली
जिल्ह्यात वाळू माफियांनी महसूल विभागाच्या पथकावर आज सकाळी हल्ला केला. औंढा नागनाथ
तालुक्यातल्या बेरुळा शिवारात ही घटना घडली. या हल्ल्यामध्ये तलाठी विठ्ठल शेळके हे
गंभीर जखमी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. याप्रकरणी औंढा पोलीस ठाण्यात गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.
****
औरंगाबाद
इथले दिवंगत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद देशपांडे यांच्या स्मृतीनिमित्त दिला
जाणारा ‘गोविंद सन्मान’ हा पुरस्कार यावर्षी पक्षीमित्र डॉक्टर दिलीप यार्दी यांना
देण्यात येणार आहे. आज संध्याकाळी सात वाजता शहरातल्या कलश मंगल कार्यालयात समारंभपूर्वक
हा पुरस्कार दिला जाणार असून, यावेळी, ‘पक्ष्यांचे सहजीवन’ या विषयावर दृक-श्राव्य
व्याख्यान होणार आहे.
****
एकविसाव्या
शतकातली आव्हानं आणि समस्या यांचं संधीत रूपांतर करण्यासाठी, ‘कशी असावी आपली लाईफस्टाईल?’
या विषयावर प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ आणि लेखिका डॉक्टर रमा मराठे यांचं आज औरंगाबाद
इथं व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे. आज संध्याकाळी पावणेसहा वाजता तापडिया नाट्यगृहात
हे व्याख्यान होणार आहे.
****
No comments:
Post a Comment