आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२३ मार्च २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव या थोर क्रांतिकारकांचा आज
हौतात्म्यदिन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिनाच्या औचित्यानं त्यांना आदरांजली
वाहिली आहे. देशबांधवांना स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठेसह जगता यावं, यासाठी स्वत:च्या
आयुष्यांचं बलिदान देणाऱ्या या थोर क्रांतिकारकांचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे,
असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती
रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. सुसंस्कृत
समाज घडवण्याच्या उद्दिष्टासाठी लोहिया यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं, असं राष्ट्रपतींनी
आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
लोकपाल निर्णयाची
अंमलबजावणी आणि इतर मागण्यांसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आजपासून दिल्लीत
बेमुदत उपोषण सुरू करणार आहेत. हजारे यांनी आज सकाळी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा
गांधी यांच्या स्मारकाला अभिवादन केलं. त्यानंतर ते आपल्या सहकाऱ्यांसह शहीद पार्कमार्गे
रामलीला मैदानावर आंदोलनासाठी दाखल होत आहेत. लोकपालची अंमलबजावणी, शेतमालाला हमीभाव,
स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी अशा विविध मागण्यांसाठी, आज शहीद दिनापासून हे आंदोलन
पुकारत असल्याचं, हजारे यांनी सांगितलं.
****
अप्रत्यक्ष धूम्रपानाविरोधात जागृती करण्यासाठी केंद्रीय
आरोग्य मंत्रालयानं एक विशेष जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. लहान मुलं, महिला तसंच
धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींना तंबाखूच्या धुरामुळे होणाऱ्या हृदयरोग तसंच श्वासच्या
विकारांची माहिती देणं, हा या मागचा उद्देश आहे.
****
राज्यसभेच्या सात राज्यांमधल्या सव्वीस जागांसाठी आज सकाळी
नऊ वाजता मतदान सुरू झालं आहे. या मध्ये केरळच्या एका जागेच्या पोटनिवडणुकीचाही समावेश
आहे. आज दुपारी चारपर्यंत हे मतदान होणार असून त्यानंतर मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रातल्या
सहा जागांची निवड बिनविरोध झाली आहे
//*********//
No comments:
Post a Comment