Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 02 March 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०२ मार्च २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
देशाचं वस्तू आणि सेवा कर-जी.एस.टी. संकलन गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत यावर्षी फेब्रुवारीमध्ये नऊ पूर्णांक एक शतांश टक्क्यांनी वाढून एक लाख, ८४ हजार कोटी रुपये झालं आहे. जीएसटी संकलन एक लाख, ७० हजार कोटी रुपयांहून अधिक जमा होण्याचा हा सलग बारावा महिना आहे. केंद्रीय जीएसटीमधून ३५ हजार, २०४ कोटी रुपये, राज्य जीएसटीमधून ४३ हजार, ७०४ कोटी रुपये, एकात्मिक जीएसटीमधून ९० हजार, ८७० कोटी रुपये तर नुकसानभरपाई उपकरातून १३ हजार, ८६८ कोटी रुपये महसूल प्राप्त झाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून विविध कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होत आहेत. पंतप्रधान आज वंतारा या प्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्रासह सासन गीर राष्ट्रीय उद्यानाला भेट देतील.
राष्ट्रीय वन्यजीव मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठकही होणार आहे. पंतप्रधान मोदी स्वत: अध्यक्ष असलेल्या सोमनाथ मंदिर संस्थानच्या महादेवाच्या मंदीरात पूजाही करणार आहेत.
****
राज्य परिवहन महामंडळ-एस.टी.त भारतीय पोलिस सेवेतल्या अधिकाऱ्यांची नेमणूक करणार असल्याची माहिती परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली आहे. पुण्यात स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने महिलांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर काल झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. महिला सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जाणार असून या प्रकरणामध्ये दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचे मिसाळ यांनी यावेळी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं शहर विद्रूप करणाऱ्या नागरिकांविरुद्ध महानगरपालिकेनं दंडात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. नागरी मित्र पथक आणि मनपा कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कारवाईत ८७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
****
धाराशिव इथं आज सकाळी फिट इंडिया मूव्हमेंट अंतर्गत सायकल फेरी काढण्यात आली. नागरिकांचं आरोग्य सुधारण्यासाठी याचं आयोजन करण्यात आलं. श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम इथून फेरीला प्रारंभ झाला.
****
धाराशिव जिल्ह्यात चालू वर्षातील संभाव्य पाणी आणि चारा टंचाईवर मात करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून काम करावे असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत. नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीत पुजार बोलत होते. पाण्याशी संबंधित असलेल्या यंत्रणांनी त्यांच्याशी संबंधित असलेल्या पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनादेखील त्यांनी यावेळी देण्यात आल्या.
****
आयसीसी अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना न्यूझीलंडशी होत आहे. दुपारी अडीच वाजता दुबई इथं सामन्याला सुरुवात होईल. स्पर्धेच्या अ गटातील हे दोन्ही संघ उपांत्य फेरीतही दाखल झाले आहेत.
दरम्यान, स्पर्धेच्या ब गटात काल झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं इंग्लंडवर सात गडी राखत विजय मिळवला. या गटात पाच गुणांसह दक्षिण अफ्रिका अव्वल स्थानी तर ऑस्ट्रेलिया चार गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
भारतानं आजचा सामना जिंकल्यास, उपांत्यफेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढतीची शक्यता आहे.
****
मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजानच्या महिन्याला प्रारंभ झाला आहे. काल सायंकाळी चंद्रदर्शनानंतर मशिदींमधून तरावीह ही रात्रीची विशेष नमाज अदा करण्यात आली. आज पहाटे सहर नंतर पहिला रोजा अर्थात उपवास सुरु झाला. आता संध्याकाळनंतर ईफ्तारद्वारे उपवास सोडला जाईल.रमजान महिन्याच्या अखेरीस ईद-उल-फित्र साजरी केली जाते.
****
भारतीय रेल्वेच्या विविध विभागांकडून आगामी सण होळीनिमित्त आणि सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर ,प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचं नियोजन करण्यात आलं आहे.दक्षिण मध्य रेल्वेकडून जालना ते पाटणा दरम्यान विशेष गाडीच्या सहा फेऱ्या करण्यात येणार आहेत. काचीगुडा ते अजमेर मदार या विशेष गाडीच्याही चार फेऱ्या होणार आहेत.
तसंच, मध्य रेल्वेसुध्दा प्रमुख मार्गांवर ४८ अतिरिक्त रेल्वे गाड्यांच्या फेरी चालवणार आहे.यातील काही गाड्या ठाणे मार्गे नशिक रोड-जळगाव -भुसावळ मार्गावरील आहेत तर काही दौंड मार्गे अहिल्यानगर मार्गावर धावणार आहेत. प्रवाशांनी याची नोंद घेण्याचं आवाहन करण्यात आला आहे.
****
गोसेवा आयोगाच्या पाठीशी शासन खंबीर पणे उभं असून महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे गोसंवर्धन आणि गोसंरक्षणाचे कार्य उत्तम असुन त्यासाठी शासनातर्फे सहकार्य करण्यात येईल. असं प्रतिपादन राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे. त्या काल पुण्यात गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभागामार्फत आयोजित अधिवक्ता कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या.
****
समाजासाठी आवश्यक प्रत्येक काम करणे हे समाजाचेच दायित्व आहे असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ. कृष्णगोपालजी यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती'तर्फे आयोजित 'पूजनीय श्रीगुरुजी पुरस्कार' प्रदान समारंभात डॉ. कृष्णगोपालजी बोलत होते. राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातील 'गोयल ग्रामीण विकास संस्थान' आणि भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक पी. आर. श्रीजेश यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
****
आज संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
No comments:
Post a Comment