Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 26 March 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ मार्च २०२५ दुपारी १.०० वा.
****
विधानसभा उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे
अण्णा बनसोडे यांची निवड झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात मांडलेल्या
प्रस्तावाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, तर उपमुख्यमंत्री अजित पवार
यांनी मांडलेल्या प्रस्तावाला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर
आवाजी मतदानाने अण्णा बनसोडे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. अध्यक्ष राहुल नार्वेकर
यांनी ही घोषणा केली. त्यानंतर सभागृहाच्या वतीने बनसोडे यांचं अभिनंदन करण्यात आलं.
****
उत्तराखंड मध्ये झालेल्या ३८ व्या राष्ट्रीय
क्रीडा स्पर्धा,
नवी दिल्लीत झालेल्या खो - खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला
आणि पुरुष संघाने मिळवलेलं अजिंक्यपद, आशियाई कबड्डी स्पर्धेत भारतीय
महिला संघाने मिळवलेलं विजेतेपद आणि रणजी क्रिकेट स्पर्धेत विदर्भाने मिळवलेल्या विजयाबद्दल
विधानसभेत आज अभिनंदन करण्यात आलं.
****
स्वित्झर्लंडमधल्या दावोस मध्ये यावर्षी
झालेल्या जागतिक आर्थिक मंच परिषदेत झालेल्या ५१ सामंजस्य करारांपैकी १७ करारांना मंजुरी
मिळाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याअंतर्गत तीन लाख
९२ हजार ५६ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला कालच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मान्यता
दिल्याचं, त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात सांगितलं. यामुळे राज्यात एक लाख ११ हजार ७२५
प्रत्यक्ष आणि अडीच ते तीन लाख प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
याअंतर्गत छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन मोठे
प्रकल्प उभारण्यात येणार आहे. दहा हजार ५२१ कोटी रुपये गुंतवणुकीचा अनवी पावर इंडस्ट्रीजचा
लिथियम सेल आणि बॅटरी निर्मितीचा प्रकल्प, १४ हजार ३७७ कोटी रुपये गुंयवणुकीचा
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प आणि चार हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा जन्सोल इंजिनिअरिंगचा
इलेक्ट्रिक चारचाकी बनवण्याच्या प्रकल्पाचा यात समावेश आहे. यात मिळून सुमारे १२ हजार
रोजगार निर्मिती होणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत
कामगार कल्याण आणि प्रशासकीय प्रक्रियांच्या सुलभीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत
विविध डिजिटल पोर्टल्सचं उद्घाटन केलं. यामध्ये महाराष्ट्र बांधकाम आणि इतर बांधकाम
कामगार कल्याण मंडळाचं सेस पोर्टल, कामगार विभागाची बॉयलर मॅन्युफॅक्चरिंग
मॅनेजमेंट सिस्टीम आणि बॉयलर परीक्षांसाठी डिजिलॉकर सुविधेचा यात समावेश आहे.
****
छत्तीसगढच्या सुकमा जिल्ह्यात आज नऊ नक्षलवाद्यांनी
आत्मसमर्पण केलं. यामध्ये सहा महिलांचा समावेश आहे. या सर्वांवर २६ लाख रुपयांचं बक्षिस
होतं.
****
भारतानं पहिलं स्वदेशी एमआरआय यंत्र विकसित
केलं आहे. ऑक्टोबरपर्यंत ते नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था - एम्स
इथं चाचणीसाठी उपलब्ध होईल,
अशी माहिती एम्सचे संचालक डॉ. एम. श्रीनिवास यांनी दिली. उपचारांचा
खर्च कमी करणं आणि आयात केलेल्या वैद्यकीय उपकरणांवरील अवलंबित्व कमी करणं हे याचं
उद्दिष्ट आहे. स्वदेशी एमआरआय यंत्र भारताला वैद्यकीय तंत्रज्ञानात अधिक स्वावलंबी
बनवण्यास मदत करेल. या उपक्रमामुळे देशात जगातील सर्वोत्तम उपकरणं उपलब्ध व्हायला मदत
होईल असं श्रीनिवास यांनी सांगितलं.
****
केंद्र सरकारच्या सुवर्ण मुद्रीकरण योजनेची
मध्यम आणि दीर्घकालीन ठेव योजना आजपासून बंद होत आहे. सुवर्णमुद्रीकरण योजनेची कामगिरी
आणि बदलत्या बाजार स्थितीचं मुल्यांकन केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचं अर्थ मंत्रालयानं
म्हटलं आहे. योजनेच्या निर्धारीत संग्रह आणि शुद्धता परिक्षण केंद्र, जीएमएस
मोबीलायझेशन,
संग्रह आणि परीक्षण एजंट, किंवा संबंधीत बँक शाखांमध्ये
आता नवीन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असं मंत्रालयानं स्पष्ट केलं
आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष
देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी आज बीड इथल्या विशेष मकोका न्यायालयात पार पडली. या
सुनावणीसाठी राज्य सरकारने नियुक्त केलेले वकील उज्ज्वल निकम उपस्थित होते.
****
बीड जिल्हा रुग्णालयात कोविड काळात झालेल्या
भ्रष्टाचारप्रकरणी तत्कालिन जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांचे निलंबन करण्यात
आलं आहे. विधानसभेत काल आमदार नमिता मुंदडा यांनी मांडलेल्या लक्षवेधीनंतर आरोग्य मंत्री
प्रकाश आबिटकर यांनी यासंदर्भात घोषणा केली होती. थोरात यांच्या समर्थनार्थ आज जिल्हाधिकारी
कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी ३०
तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत.
या मालिकेचा हा १२०वा भाग असेल.
****
नागपूर - भंडारा मार्गावरील बिडगाव नाक्यावर
दोन गोदामांना काल रात्री भीषण आग लागली. या आगीत गोदामातील प्लास्टिक पिशव्या आणि
इतर साहित्य जळून खाक झालं. अग्निशमन दलाच्या पाच पथकांनी आग आटोक्यात आणल्याचं आमच्या
वारताहराने कळवलं आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत
आज गुवाहाटी इथं राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघादरम्यान सामना होणार
आहे. संध्याकाळी साडे सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
****
नवी दिल्लीत सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा
स्पर्धेत राज्यातल्या खेळाडूंनी आतापर्यंत १४ सुवर्ण पदकांसह एकंदर ३६ पदकं पटकावली
आहेत. यात मैदानी स्पर्धांमधल्या दहा सुवर्ण पदकांचा समावेश आहे.
****
No comments:
Post a Comment