Saturday, 1 March 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.03.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 01 March 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ मार्च २०२ दुपारी १.०० वा.

****

एकवीसाव्या शतकातील भारताकडे संपूर्ण जगाचं लक्ष केंद्रीत असून, भारताकडे असलेलं आयोजन आणि नाविन्यपूर्ण कौशल्याचं संपूर्ण जग अवलोकन करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. दिल्लीतल्या भारत मंडपम इथे आयोजित एन एक्स टी संमेलनात आज ते बोलत होते. आपण मांडलेली व्होकल फॉर लोकल आणि लोकल फॉर ग्लोबल ही संकल्पना आता सत्यात उतरली असल्याचं पंतप्रधान म्हणाले. जगातला एक नवीन उद्यमी देश म्हणून भारत आता उदयास येत आहे, भारत केवळ एक कार्यशक्ती नव्हे तर एक जागतिक शक्ती असल्याचंही पंतप्रधान म्हणाले.

****

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाला आजपासून प्रारंभ झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत पुण्यात या कार्यक्रमाचा मुख्य उद्घाटन सोहळा पार पडला. याअभियानांतर्गत शून्य ते १८ वयोगटातल्या मुलांची सर्वांगीण शारीरिक आरोग्य तपासणी, विनामूल्य शस्त्रक्रिया, करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात ॲनिमिया मुक्त भारत अभियानांतर्गत भित्तीपत्रक आणि चित्रकथापुस्तिकांचं प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या बोधचिन्हाचं अनावरणही यावेळी करण्यात आलं. पालक आणि शाळा व्यवस्थापनासह सर्व संबंधित यंत्रणेने पुढच्या दोन महिन्यात हे अभियान राबवून त्याचा अहवाल सादर करण्याची सूचना आबिटकर यांनी यावेळी केली.

****

वीज महावितरण कंपनीने प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचं राज्य सरकारने दिलेलं उद्दीष्ट ८२ दिवसांत पूर्ण केलं आहे. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी ही माहिती दिली. गेल्या पाच डिसेंबरपर्यंत राज्यात ७१ हजार ४३७ तर त्यानंतर शंभर दिवसांच्या मोहिमेत ८२ दिवसांत ५७ हजार ३३ घरांवर सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसवण्यात आले. राज्यातल्या लाभार्थी कुटुंबांना एकूण ८०० कोटी रुपयांचं अनुदान खात्यात थेट जमा करण्यात आलं आहे. याअंतर्गत लाभार्थी संख्येत छत्रपती संभाजीनगर जिल्हा राज्यात चौथ्या, नागपूर पहिल्या, पुणे दुसऱ्या, तर जळगाव जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.

****

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर महामंडळाच्या कामाची व्याप्ती वाढवण्याचे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. काल मंत्रालयात यासंदर्भातल्या बैठकीत त्या बोलत होत्या. शहरी भागातील महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठीच्या योजनांसंदर्भातील प्रस्ताव सादर करावेत, महामार्गावरील जनसुविधा केंद्राच्या देखभाल तसंच व्यवस्थापनाची जबाबदारी महिला बचतगटांना देण्याबाबत तसंच या सुविधा केंद्रांमध्ये शौचालये, हिरकणी कक्ष, हस्तकला विक्री केंद्रे, अल्पोपहार यासारखे स्टॉल उभारण्याबाबतचा प्रस्तावही सादर करण्याची सूचना तटकरे यांनी यावेळी आहे.

****

धाराशिव जिल्ह्यात चालू वर्षातील संभाव्य पाणी तसंच चारा टंचाईवर मात करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून काम करावं. असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत.

यासंदर्भातल्या आढावा बैठकीत काल ते बोलत होते.

विहिरींमधला गाळ काढण्याचं काम, तसंच नादुरुस्त असलेल्या विंधन विहिरी दुरुस्तीची कामं तातडीने हाती घ्यावीत.संबंधित यंत्रणांनी एकत्रितपणे भूजल पातळीत आणि पाणीसाठ्यात वाढ करण्यासाठी कृती आराखडा तयार करून आवश्यक उपाययोजना कराव्यात आदी सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

****

ग्रामविकास आणि पंचायत राज विभाग, उमेद या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातर्फे बुलडाणा इथे आयोजित राजमाता विभागस्तरीय सरस तथा बुलढाणा जिल्हास्तरीय विक्री आणि प्रदर्शनीचा शुभारंभ केंद्रीय राज्यमंत्री जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून उत्पादीत केलेल्या वस्तू, पदार्थांची विक्री स्थानिक ठिकाणी, तालुका तसंच शहरी भागात विक्री करावी. केवळ वस्तू उत्पादनावर भर न देता वस्तूची पॅकींग, मार्केटिंग आणि ब्रॅडींगवर भर द्यावा. यासाठी घरोघरी जाऊन आपल्या मालाची माहिती ग्राहकापर्यंत पोहोचवावी, असं ते यावेळी म्हणाले.

****

कृषिपदवीधरांनी उद्योजक बनावं आणि शेती क्षेत्राला नवी दिशा द्यावी असं प्रतिपादन अकोला इथल्या डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.शरद गडाख यांनी केलं आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी इथे आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादात ते बोलत होते. या परिसंवादात देशभरातील कृषि विद्यापीठं आणि इतर प्रमुख संस्थांमधून ६०० पेक्षा जास्त शास्त्रज्ञ आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.

****

आईसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत ब गटात आज दक्षिण अफ्रीका आणि इंग्लंड संघात सामना होणार आहे. या स्पर्धेत काल लाहोर इथला नियोजित ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान दरम्यानचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आणि या दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. ऑस्ट्रेलिया ने ब गटातून उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे.

****

No comments: