Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 01 March 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ मार्च २०२५ सायंकाळी ६.१०
****
· भारतातील उत्पादन आणि निर्यातीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन
· राज्य विधीमंडळाचं परवा सोमवारपासून मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन
· राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाला प्रारंभ-सुमारे २० लाख मुला मुलींची मोफत
आरोग्य तपासणी
· ज्येष्ठ लेखिका डॉ मीना प्रभू यांचं पुण्यात निधन
आणि
· बीड जिल्ह्यात धारूर इथं दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर पळवणाऱ्या दोघांना अटक
****
भारतातील उत्पादन आणि निर्यातीत मोठ्या प्रमाणावर
वाढ झाल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत
भारत मंडपम इथं NXT
परिषदेत बोलत होते. योग आणि आयुष उत्पादनं जागतिक पातळीवर पोहोचल्याबद्दल
त्यांनी समाधान व्यक्त केलं. भारतात जगभरात अनेक देशांमध्ये वस्तू आणि सेवा पुरवत असल्याचं
पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले –
आज भारत के मोबाईल, इलेक्ट्रानिक
प्रॉडक्टस्, भारत में बनी दवाईयां, अपनी ग्लोबल पहचान बना रही है। और इस सबके साथ
ही एक और बात हुई है। भारत कई सारे ग्लोबल इनिशिएटीव्हज् को लीड कर रहा है।
****
देशभरात आजपासून जन औषधी जन चेतना सप्ताहाला
सुरुवात झाली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याणमंत्री जे पी नड्डा यांनी आज नवी दिल्लीत
प्रधानमंत्री जनऔषधी योजनेच्या रथाला आणि इतर वाहनांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं.
येत्या ७ मार्च रोजी जन औषधी दिवस साजरा केला जाणार असून त्यानिमित्त या आठवड्यात विविध
कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरवणं हे केंद्र सरकारचं
कर्तव्य आहे,
तसंच सरकारच्या विविध योजनांचा लाभ सर्वांना मिळावा यासाठी नागरिकांनीही
त्याबद्दल जागृती करावी,
असं नड्डा यावेळी म्हणाले.
****
राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन
परवा सोमवारपासून मुंबईत सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री
अजित पवार यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. केंद्रीय अर्थसंकल्पात ज्यापद्धतीनं
सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, त्याच
मार्गावर चालण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न असेल, असं पवार यांनी सांगितलं.
ते म्हणाले –
उद्याच्या तीन तारखेला पुरवणी
मागण्या पहिले मांडल्या जाणार आहेत. नवीन वर्षाचा अर्थसंकल्प आम्ही सादर करणार आहोत.
दहा तारखेला कामगार सल्लागार समितीनं अर्थसंकल्प सादर करण्याच्या बद्दल मान्यता त्याबाबतीमध्ये
दिलेली आहे. आणि एकंदरीतच केंद्रानी जसं सर्व घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न त्यांच्या
बजटच्या माध्यमातनं केलेला आहे, तसाच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्यांचं
संपूर्ण मंत्रीमंडळ आम्हीपण तशाच रस्त्याने जाण्याचा विचार करतोय.
दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या
पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून विधीमंडळ पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या
आहेत. विधानसभेच्या मुख्य प्रतोदपदी अमित देशमुख यांची तर विधानपरिषदेच्या गटनेतेपदी
सतेज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय विधानसभेच्या उपनेतेपदी अमीन पटेल, सचिवपदी
विश्वजीत कदम,
प्रतोदपदी शिरीषकुमार नाईक आणि संजय मेश्राम यांच्या नियुक्त्या
करण्यात आल्या आहेत. विधानपरिषदेत अभिजित वंजारी हे मुख्य प्रतोद असतील तर प्रतोद म्हणून
राजेश राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
****
महिलांचा आर्थिक साक्षरतेकडून आर्थिक सक्षमीकरणाकडे
प्रवास सुरू असून या प्रवासात झेप फाउंडेशनचं सहकार्य मोलाचं आहे, असं
प्रतिपादन महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलं आहे. मुंबई इथं झेप फाउंडेशनच्या
विकसित भारत महिला उद्योजिका २०२५ च्या संमेलनात तटकरे यांच्या हस्ते मुख्यमंत्री माझी
लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी, महिला बचत गटाच्या माध्यमातून उद्योग करणाऱ्या
महिलांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. मुख्यमंत्री
माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीच्या सहाय्याने अनेक महिला, उद्योजिका
होत आहेत, असं तटकरे यांनी सांगितलं. महिलांचं कुटुंबातील योगदान वाढावं यासाठी हा प्रयत्न
असून, गरजू महिलांना सहकार्य करण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही
तटकरे यांनी दिली.
****
छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात आज सुरक्षा
दलांशी झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी मारले गेले. किस्ताराम भागात नक्षलवाद्यांची
गुप्त बैठक असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा राखीव सुरक्षा दल आणि केंद्रीय राखीव
पोलिस दलाच्या पथकाने शोध मोहीम हाती घेतली होती, मात्र, नक्षलवाद्यांनी
हल्ला केल्यानंतर पोलिलांनी प्रती हल्ला केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाला आजपासून
प्रारंभ झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत
पुण्यात या कार्यक्रमाचा मुख्य उद्घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात ॲनिमिया मुक्त
भारत अभियानांतर्गत भित्तीपत्रक आणि चित्रकथापुस्तिकांचं प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते
करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या बोधचिन्हाचं अनावरणही यावेळी करण्यात आलं.
राज्यभरात जिल्हास्तरावरच्या ३५, तर
तालुकास्तरावरच्या ३५५ शाळांमधे हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये शून्य ते १८
वयोगटातल्या सुमारे २० लाख मुलामुलींची सर्वांगीण शारीरिक आरोग्य तपासणी, विनामूल्य
शस्त्रक्रिया,
करण्यात येणार आहे. जन्मजात आजार आणि इतर आजारांवर मोफत उपचार
तसंच संदर्भ सेवा आणि विनामूल्य शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. प्रत्येक बालकाचं
आरोग्य आणि उज्ज्वल भविष्याची जबाबदारी शासन पूर्ण निष्ठेनं पार पाडत आहे, असं
पवार यांनी सांगितलं –
राज्य सरकार राज्यातल्या
प्रत्येक बालकाच्या आरोग्याची आणि उज्वल भविष्याची जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडेल
या बद्दलची ग्वाही मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला देऊ
इच्छितो. आपण सर्वांनी मिळून या मोहिमेला संपूर्ण राज्यभर यशस्वी करू या. आणि महाराष्ट्रातील
प्रत्येक बालकाला सशक्त आणि निरोगी जीवनाची हमी देण्याचं काम करू या.
पालक आणि शाळा व्यवस्थापनासह सर्व संबंधित
यंत्रणेने पुढच्या दोन महिन्यात हे अभियान राबवून त्याचा अहवाल सादर करण्याची सूचना
आबिटकर यांनी यावेळी केली. ते म्हणाले –
सगळ्या योजनांचा अत्यंत चांगल्या
पद्धतीनं अपेक्षित असणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना उपयोग होतोय, भविष्यकाळामध्ये त्यांच्या
एकूण आरोग्यासाठी खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन
आपण सगळेजण करतोय. त्याच धर्तीवरती या आर बी एस के प्रोग्रामचं आपण उद्घाटन केलंय.
या योजनांच्या सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी, पालकांनी आणि आमच्या आरोग्य विभागाच्या
सर्व टीमनं अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन करून पुढच्या दोन महिन्यांमध्ये या सगळ्यांचे
रिझल्टस् सुद्धा सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवायचेत.
****
ज्येष्ठ लेखिका डॉ. मीना सुधाकर प्रभू यांचं
पुण्यात आज निधन झालं,
त्या ८५ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसापासून आजारी असलेल्या
प्रभू यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पुण्यात जन्मलेल्या प्रभू यांचं
वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण पुण्यात झालं होतं. १९६६ साली विवाहानंतर त्या इंग्लंडमध्ये
स्थायिक झाल्या,
तिथेच सुमारे वीस वर्षे त्यांनी भूलतज्ञ म्हणून काम केलं. प्रभू
यांनी जगातल्या अनेक देशांमध्ये प्रवास केला असून त्यांनी लिहिलेली प्रवास वर्णनं वाचकांच्या
विशेष पसंतीस उतरली. गोवा इथं झालेल्या महिला साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मीना प्रभू
यांनी भूषवलं होतं. त्यांना दि.बा.मोकाशी पारितोषिक, गो.नी.दांडेकर स्मृती
पुरस्कार, न. चिं. केळकर पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार
अशा अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. पुण्यात २०१७ मध्ये “प्रभुज्ञान मंदिर” हा अत्याधुनिक किंडल लायब्ररीचा प्रकल्पही
मीना प्रभु यांनी सुरू केला होता.
****
बीड जिल्ह्यातल्या किल्ले धारूर इथं आज दहावीच्या
इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका फोडल्याची घटना निदर्शनास आली. प्रश्नपत्रिकांचं वाटप
झाल्यानंतर साडे अकरा वाजता दोन मुलांनी प्रश्नपत्रिका घेऊन खिडकीतून पलायन केलं. ही
बातमी समजताच,
पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांच्या पथकाने अवघ्या अर्ध्या
तासात या दोघांनाही ताब्यात घेऊन प्रश्नपत्रिका जमा करून घेतली. या दोन्ही आरोपीविरोधात
योग्य ती कारवाई केली जाईल असं धारूरचे तालुका गट शिक्षणाधिकारी मनोज कोल्हे यांनी
सांगितलं आहे.
****
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नांदेड
जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात असलेल्या बाभळी बंधाऱ्यातून शून्य पूर्णांक सहा टीएमसी
पाणी तेलंगणासाठी गोदावरी पात्रात सोडण्यात आलं. यावर्षी बाभळी बंधारा निर्मितीच्या
बारा वर्षानंतर पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरला आहे. एक जुलै रोजी पावसाळा सुरू होताच
बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्यात आले; तर पावसाळा संपतात २९ ऑक्टोबर रोजी दरवाजे
बंद करण्यात आले होते. आज सदस्य समितीच्या उपस्थितीत धरणातून शून्य पूर्णांक सहा टीएमसी
पाणी तेलंगणासाठी सोडण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
शासनाच्या विविध योजना, उपक्रम
लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक दिवस गावकऱ्यांसोबत या नाविन्यापूर्ण उपक्रमांतर्गत
आज परभणी जिल्ह्यात लोकप्रतिनिधी आणि अधिकारी गाव दौऱ्यावर दिसून आले. गंगाखेडचे आमदार
डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी आज गंगाखेड तालुक्यातल्या कोद्री इथं ग्राम दरबार उपक्रमामध्ये
गावकऱ्यांना मार्गदर्शन केलं. जिल्ह्यात ९ तालुक्यात ग्राम दरबार भऱवण्यात आल्याचं
आमच्या वार्ताहराने कळवले आहे.
****
आयसीसी अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धेत
ब गटात आज दक्षिण अफ्रिका आणि इंग्लंड संघात सामना सुरु आहे.
****
No comments:
Post a Comment