Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 01 March 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ मार्च २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
राज्य सरकारच्या पाचशे सेवा व्हाटस्अपवर उपलब्ध करून देणार-मुख्यमंत्र्यांची
घोषणा
·
लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही-उपमुख्यमंत्री अजित
पवार यांची ग्वाही
·
विभागीय आयुक्त कार्यालयाअंतर्गत 'एक दिवस गावकऱ्यांसोबत'
उपक्रमाला प्रारंभ
आणि
·
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आजपासून बालकांची
सर्वांगीण तपासणी
****
राज्य सरकारच्या
विविध पाचशे सेवा व्हाटस्अपच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून दिल्या
जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. काल मुंबईत, मुंबई टेक
विक २०२५ मध्ये गव्हर्निंग द फ्युचर : एआय अँड पब्लिक पॉलिसी या विषयावर ते बोलत होते.
ग्रामीण भागातले नागरिक मोठ्या प्रमाणावर व्हॉट्सअपचा वापर करतात, त्यामुळे सरकारी सेवा उपलब्ध करुन देत सेवांचं एका अर्थाने लोकशाहीकरण करण्यात
येत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले,
‘‘व्हॉटस्ॲप
गव्हर्नन्स हा कॉन्सेप्ट आणलेला आहे. म्हणजे राज्यातल्या सगळ्या सेवा आता व्हॉटस्अपच्या
माध्यमातून आपल्याला मिळू शकतील. मागच्या काळामध्ये मुंबई मेट्रोचं तिकीट जेव्हा व्हॉटस्ॲपवर
आणलं, आमच्या असं लक्षात आलं की पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त लोकं व्हॉटस्ॲप वर तिकीट
खरेदी करतायत. आणि म्हणूनच व्हॉटस्ॲप गव्हर्नन्स हा कॉन्सेप्ट आणलेला आहे. पाचशे सर्विसेस
यापुढे व्हॉटस्ॲपच्या माध्यमातनं अव्हेल करता येतील.’’
एनपीसीआय
या जगातल्या सर्वात मोठ्या युपीआय पेमेंट गेटवे कंपनीचं जागतिक मुख्यालय मुंबईत सुरु
करण्यासाठी आवश्यक जमीन कंपनीला हस्तांतरीत केली जाणार असून, यासंबंधीची
कागदपत्रं कंपनीला सोपवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
****
गोरगरीब, कष्टकरी महिलांसाठी
सुरु करण्यात आलेली लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही अशी ग्वाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. परभणी इथे काल
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश आणि जाहीर सभेत काल ते बोलत होते. येत्या १० तारखेला
सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थ संकल्पात परभणीच्या विकासासाठी प्रश्न मांडणार असल्याचं
पवार यांनी सांगितलं. या जाहीर सभेत अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात
कंधार तालुक्यात श्रीक्षेत्र उमरज इथल्या प्राचीन श्री संत नामदेव महाराज संस्थान मंदिराच्या
कलशारोहण सोहळ्यानिमित्त पवार यांनी काल या मंदिराला भेट दिली, संतांच्या शिकवणीतून सर्वधर्मसमभावाचा मंत्र बुलंद व्हावा, याठिकाणचा आध्यात्मिक सोहळा सामाजिक एकोप्याची नांदी ठरावी, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. संस्थानच्या प्रलंबित मागण्यां पूर्ण करण्याचं
आश्वासन पवार यांनी यावेळी दिलं.
****
राज्यात
एक हजार ६६० पेट्रोल पंपांच्या रखडलेल्या परवानग्या देण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी
कार्यालयात 'एक खिडकी' सुरू करण्याचा निर्णय महसूल मंत्री
चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. हे पंप सुरू झाल्यानंतर सुमारे ३० हजारांवर तरुणांना
रोजगार मिळेल, राज्यात साडेतीन ते चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक
होईल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.
****
छत्रपती
संभाजीनगर इथल्या विभागीय आयुक्त कार्यालयाअंतर्गत 'एक दिवस गावकऱ्यांसोबत'
या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा काल, फुलंब्री तालुक्यातल्या
किनगाव या आदर्श गावातून शुभारंभ करण्यात आला. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या
उपस्थितीत विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी विकास मीना यावेळी उपस्थित होते. शासनाच्या विविध योजना,
उपक्रम आणि सेवा ग्रामस्थांच्या दारी पोहोचवणं तसंच शासकीय योजनेबाबत
माहिती देणं या उद्देशानं हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. मराठवाड्यातल्या ७६ गावांमध्ये
हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
****
मराठवाड्यातल्या
विविध प्रकल्पामधून उन्हाळी हंगामासाठीची पाण्याची आवर्तनं देण्यासंदर्भात कालवा सल्लागार
समितीची बैठक जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत काल झाली. आवर्तनं
सोडताना शेतकऱ्यांची अडचण होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश विखे पाटील यांनी
दिले.
****
उपराष्ट्रपती
जगदीप धनखड आज एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या भेटीदरम्यान, ते के. पी.
बी. हिंदुजा महाविद्यालयाच्या वार्षिक दिन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार
आहेत.
****
राष्ट्रीय
बाल स्वास्थ्य कार्यक्रम आजपासून सुरु होत आहे. याअंतर्गत शून्य ते १८ वयोगटातल्या
मुलांची सर्वागीण शारीरिक आरोग्य तपासणी, विनामूल्य शस्त्रक्रिया, करण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत, छत्रपती
संभाजीनगरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर:
‘‘एक
मार्चपासून आपल्या जवळपास सर्व शाळांमध्ये तसेच सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये आरोग्य
विभागामार्फत शुन्य ते अठरा वर्षे वयोगटातील सर्व बालकांची मोफत आरोग्य तपासणी केली
जाणार आहे. यामध्ये बालकांची वाढ असेल, किंवा बालकांना होणारे सर्वसामान्य आजार असतील,
किंवा काही दुर्धर आजार असतील, जसे हार्ट डिसीज् असतील, अशा सर्व बालकांची तपासणी
केली जाणार आहे. त्याच्यामध्ये त्यांना लागणारे उपचार आहेत, तात्काळ तिथे दिले जाणार
आहेत. काही बालकांना संदर्भ सेवा देण्याची आवश्यकता असेल तशी संदर्भसेवा दिली जाणार
आहे.’’
****
अल्पसंख्याक
समाजासाठी असणाऱ्या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र व्यक्तीला देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना
जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केली आहे. काल परभणी
इथं यासंदर्भातल्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा
कार्यालयाचं यावेळी गांधी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.
****
प्रधानमंत्री
आवास योजना ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत नांदेड जिल्ह्यात काल एकाच दिवशी ८० हजार घरकुलांचं
भूमिपूजन करण्यात आलं. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या
संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमामुळे नांदेड जिल्ह्याने विक्रम प्रस्थापित केला
आहे.
****
धाराशिव
शहरालगत असलेलं हातलाई मंदिर परिसर, तलाव आणि धाराशिव लेणी यांचा एकात्मिक
विकास आराखडा तयार करण्यासंदर्भात तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी काल
धाराशिव इथं बैठक घेतली. पर्यटन जनजागृती संस्था तसच धाराशिव शहरातील पर्यटन प्रेमी
या बैठकीला उपस्थित होते.
****
जालना इथं
महिला बचत गटांसाठीच्या जानकी महोत्सवाचं आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते काल उद्घाटन
झालं. महिला बचत गटांसाठी स्वतंत्र बँक असावी, अशी अपेक्षा खोतकर यांनी यावेळी
व्यक्त केली.
****
वारकरी
संगीताला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळावी, अशी अपेक्षा पंडित
यादवराज फड यांनी व्यक्त केली आहे. बीड जिल्ह्यात श्रीक्षेत्र चाकरवाडी इथं काल १७
वं अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलन घेण्यात आलं, त्यावेळी ते
बोलत होते. या संमेलनात राज्यातल्या संगीत क्षेत्रातले अनेक कलाकार सहभागी झाले होते.
****
महापुरुषांबद्दल
बेताल वक्तव्य करणाऱ्यांविरोधात करवाई करण्यासाठी राज्य सरकार लवकरच कायद्यात बदल करणार
असल्याची माहिती, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह
राजे भोसले यांनी दिली. ते काल लातूर जिल्ह्यातील अहमदपूर इथं पत्रकारांशी बोलत होते.
काही जण केवळ प्रसिद्धीसाठी महापुरुषांवर वक्तव्य करत असल्याचं, त्यांनी नमूद केलं.
****
काँग्रेसचे
तुळजापूर इथले ज्येष्ठ नेते अशोक मगर यांचं काल वृद्धापकाळाने निधन झालं, ते ८० वर्षांचे
होते. त्यांच्या पार्थिव देहावर काल तुळजापूर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
आदिवासी
समाजाच्या विविध मागण्यांसाठी हिंगोली इथं आदिवासी युवक कल्याण संघाने काल जिल्हाधिकारी
कार्यालयावर मोर्चा काढला. रखडलेली पदभरती तात्काळ सुरू करावी, या आणि इतर
मागण्या मोर्चेकऱ्यांनी केल्या आहेत.
****
बीड
जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातल्या मोरेवाडी इथं मृद आणि जलसंधारण विभागांतर्गत
बांधण्यात आलल्या साठवण तलावाचं आमदार सुरेश धस यांच्या हस्ते काल भूमिपूजन झालं.
या तलावामुळे परिसरातल्या अनेक शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार असल्याचं, धस यांनी म्हटलं आहे.
****
वृद्धापकाळाशी
संबंधित व्याधींच्या उपचारासाठी धाराशिव इथल्या शासकीय आयुर्वेद रुग्णालयात विशेष
जेरियाट्रिक ओपीडी सुरू आहे, २३६ हून अधिक वृद्ध रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला
आहे.
****
छत्रपती
संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं शहर विद्रूप करणाऱ्यांवर आजपासून दंडात्मक
कारवाई करण्यात येणार आहे. विद्रुपीकरणाच्या ५२ प्रकारांत ५०० ते २५ हजार
रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाणार आहे.
****
अहिल्यानगर जिल्ह्यातल्या
क्षेत्र मढी इथे काल सायंकाळी होलिका दहन करण्यात आलं. १५ दिवस अगोदरच होळीचा सण साजरा
करणारं मढी हे देशातील एकमेव गाव असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड आकाशवाणी केंद्रात
कार्यरत वरिष्ठ उद्घोषक गणेश धोबे काल सेवानिवृत्त झाले. आकाशवाणी नांदेड इथं त्यांना
छोटेखानी समारांभात काल निरोप देव्यात आला.
****
आईसीसी चैंपियन्स करंडक क्रिकेट
स्पर्धेत काल लाहोर इथला ऑस्ट्रेलिया आणि अफगानिस्तान दरम्यानचा सामना पावसामुळे रद्द
करण्यात आला आणि या दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. यासोबतच
ऑस्ट्रेलिया ने ब गटातून उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे.
****
No comments:
Post a Comment