Saturday, 1 March 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.03.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 01 March 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ०१ मार्च २०२ सकाळी .०० वाजता.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथे आयोजित एन एक्स टी संमेलनात सहभागी होत आहेत. या संमेलनात न्युज एक्स वर्ल्ड या वाहिनीचा शुभारंभही करण्यात येणार आहे. आय टी व्ही नेटवर्क आणि या संमेलनात सगळ्या श्रेणीतील लोकांना एका व्यासपीठावर आणत असल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी एन एक्स टी फाउंडेशन ला आपल्या सामाजिक माध्यमावरील संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच या संमेलनात उपयुक्त विचार विनिमय होईल अशी आशाही व्यक्त केली आहे.

****

ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या विश्वस्त मंडळाने २०२४-२५ साठी कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ ठेवींवर सव्वा ८ टक्क्यांचा व्याजदर कायम ठेवण्याची शिफारस केली आहे. ही शिफारस केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवली जाईल. मंजुरीनंतर व्याजाची रक्कम ईपीएफओ खात्यात जमा केली जाईल.

****

येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यभरातले इयत्ता अकरावीचे प्रवेश ऑनलाइन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यासंदर्भातला शासन आदेश काल प्रसिद्ध झाला. आतापर्यंत केवळ मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, अमरावती, नागपूर आणि नाशिक महापालिका क्षेत्रातले अकरावी चे प्रवेश ऑनलाइन होत होते. इथून पुढे इयत्ता अकरावी चे सर्व प्रवेश ऑनलाइन होणार आहेत, प्रवेशाच्या पहिल्या चार फेऱ्या झाल्यानंतर वर्ग सुरू होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

जलशुद्धीकरण कामाचं देयक काढण्यासाठी ४० हजारांची लाच मागणाऱ्या भंडारा जिल्हा परिषदेतील यांत्रिकी उपविभागातील प्रभारी उपअभियंता सुहास करंजेकर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. प्रभारी उपअभियंता करंजेकर विरुद्ध भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भंडारा इथल्या कंत्राटदाराने भंडारा जिल्ह्यातील चिखली आणि लेंडेझरी या दोन गावातील जलशुद्धीकरणाची कामं पूर्ण केली. केलेल्या कामाचं ९ लाख ८० हजार रुपयांचं देयक मंजूर करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराकडे सुहास करंजेकर यानं लाच मागितली होती.

****

कोकणचा विकास आता थांबणार नाही असा विश्वास सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे. कोकण सन्मान या कार्यक्रमात देवगड इथे ते बोलत होते. कोकणातील निसर्ग सौंदर्य, विविधता आणि खाद्य संस्कृती यांचं चित्रीकरण सामाजिक माध्यमातून जगामध्ये पोहोचवण्याचं कार्य करणाऱ्या कोकणातील रील क्रिएटर्सचा सन्मान कोकण सन्मान कार्यक्रमातून राणे यांच्या हस्ते करण्यात आला.  ज्येष्ठ सिने नाट्य कलाकार विद्याधर कार्लेकर, ठाकर लोककला जतन करणारे पद्मश्री परशुराम गंगावणे आणि अखंड समाजसेवेचा व्रत घेतलेले दयानंद कुबल यांचा विशेष सन्मानही या कार्यक्रमात करण्यात आला.

****

महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रश्नी समन्वयक मंत्री म्हणून राज्य सरकारनं चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई यांची नियुक्ती केली आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणी प्रकरणी वकीलांशी समन्वय साधणं, सीमा भागातल्या मराठी भाषिकांचे प्रश्न सोडवणं, याकरिता ही नियुक्ती केली आहे.

****

आठवं ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ इथे महाशिवरात्र महोत्सवाचं प्रमुख आकर्षण असलेल्या श्री नागनाथ प्रभूंचा रथोत्सव सोहळा आज साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून भाविक मोठ्या संख्येनं औंढा इथं दाखल होत आहेत. मंदिर संस्थानकडून सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

****

नांदेड इथं ग्रंथोत्सवाचा आज समारोप होणार आहे. काल सकाळी ग्रंथदिंडीने या उत्सवाला सुरुवात करण्यात आली. पुस्तकांची अनेक दालनं याठिकाणी उभारण्यात आले असून, विविध कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं आहे.

****

नागरिकांच्या आरोग्य सुधारण्यासाठी केंद्र सरकारच्या फिट इंडिया मूव्हमेंट अंतर्गत धाराशिव इथं उद्या रविवारी सायकल फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे. श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम इथून या फेरीला सुरुवात होणार आहे.

****

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षांच्या पुनर्मूल्यांकन अर्जाची मुदत पाच मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. विद्यापीठातर्फे गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल १९ फेब्रुवारी रोजी जाहीर झाले. त्यानंतर पुनर्मूल्यांकन अर्ज करण्याची मुदत दोन मार्च पर्यंत देण्यात आली होती, ती वाढवण्यात आली आहे.

****

अन्नपदार्थातील भेसळ ओळखण्यासाठी तसंच अन्नाचे नमुने, विश्लेषण अहवाल तातडीने मिळण्याच्या दृष्टीनं राज्यात २८ फिरत्या प्रयोगशाळा देण्यात येणार आहेत. औषध प्रशासन आणि विशेष सहाय्यमंत्री नरहरी झिरवाळ यांनी काल नागपूरमध्ये या विभागांच्या कामाचा आढावा घेतला, त्यावेळी ही माहिती दिली. प्रयोगशाळेत प्रलंबित असलेल्या अन्नचाचण्या विहित मर्यादेत कराव्यात, असे निर्देश, आणि दुग्धजन्य पदार्थ, मिठाईची निर्मिती आणि विक्रीची कसून तपासणी करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

****

No comments: