Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 03 March 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ मार्च २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
राज्य विधिमंडळाचं आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन, राज्यातल्या
कायदा-सुव्यवस्थेवर विरोधकांची टीका
·
महामार्गावर अपघातांचं प्रमाण कमी झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून
समाधान व्यक्त
·
सर्व पात्र मतदारांना एकमेव एपिक क्रमांक मिळावा यासाठी
केंद्रीय निवडणूक आयोग कार्यरत
आणि
·
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्यफेरीत उद्या भारत-ऑस्ट्रेलिया
लढत
****
राज्य विधिमंडळाचं
अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या अभिभाषणानं
अधिवेशनाला सुरुवात होईल. राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प १० मार्च रोजी
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येईल.
या अधिवेशनात
सर्व विधेयकांवर चर्चा करण्याची सरकारची तयारी असून, विरोधी पक्षांना
बोलण्याची संधी दिली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
म्हटलं आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते,
‘‘जेव्हा नवीन
सरकार बनतं त्यावेळी पहिल्या अधिवेशनाला एक सकारात्मक चर्चा आपण करुया, अशा
प्रकारची संधी होती. त्यांची संवाद स्थापित करावा, असं
आपल्या पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. आम्ही त्यांना चहापानाला निमंत्रित केलं होतं, सगळ्यांनाच
निमंत्रित केलं होतं. पण त्याच संवादावर त्यांनी बहिष्कार घातला. आणि मला याचा
अर्थच समजला नाही की, संवादावर बहिष्कार टाकायचा आणि
संवाद साधा म्हणायचं.’’
विरोधी
पक्षाच्या बैठकीला त्यांचे मुख्य नेतेच हजर नव्हते, त्यातून त्यांच्यातला
विसंवाद दिसून येतो, असं मुख्यमंत्री म्हणाले. माध्यमांमध्ये
प्रसिद्ध झालेल्या अनेक बातम्यांच्या आधारे विरोधकांनी सरकारवर आरोप केले आहेत,
मात्र यासंदर्भात सरकारने दिलेला खुलासा विरोधकांनी वाचावा, असा सल्ला देत, माध्यमांनीही योग्य शहानिशा करूनच बातम्या
प्रसिद्ध करण्याचं आवाहन त्यांनी केलं.
दरम्यान, या अधिवेशनात
आठ मार्चला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती तसंच महिला दिन,
आणि भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी एक चर्चा आयोजित केल्याची माहिती
मुख्यमंत्र्यांनी दिली...
‘‘आठ मार्चला
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने एक
चर्चा आपण ठेवली आहे. ज्याच्यामध्ये महिला दिन असल्यामुळे सक्षमीकरणाचा जो सगळा
मुद्दा आहे, त्या अनुषंगाने ही चर्चा आहे.
आणि भारतीय संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे आपण एक दोन दिवसांची सकारात्मक चर्चा व्हावी, म्हणजे
लाल संविधान दाखवतात ताशा प्रकारची नाही, तर संविधान वाचून किंवा
त्यातल्या तरतुदी समजून आमचा विरोधी पक्ष देखील त्याच्यावर चांगली, सकारात्मक
चर्चा करेल, अशी माझी अपेक्षा आहे.’’
उपमुख्यमंत्री
अजित पवार तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते. महायुती सरकारने मागच्या
कार्यकाळात वेगाने काम केलं, विकासाचा हा वेग या कार्यकाळात वाढेल
आणि त्याचं प्रतिबिंब या अर्थसंकल्पात दिसेल, असं शिंदे यांनी
नमूद केलं.
अजित पवार
यांनी यावेळी बोलतांना, अधिवेशनात विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची आपली
तयारी असून, बहुमताच्या जोरावर कामकाज रेटणार नाही, अशी भूमिका मांडली.
****
फक्त चहापानाला
जाऊन संवाद होत नसतो, असं विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं
आहे. काल सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकल्यानंतर ते महाविकास आघाडीच्या पत्रकार
परिषदेत बोलत होते.
‘‘फक्त
चहापानाला जाणं, म्हणजे संवाद होणं अशातला काही भाग नाही. खरंतर संसदीय लोकशाहीचं पालन
जशी सत्ताधारी पक्षाची आहे, तशीच विरोधी पक्षाची पण आहे. आणि या राज्याचं हीत व्हावं
ही अपेक्षा जशी सत्ताधारी पक्षाची असेल तशी आमची सुद्धा तेवढीच आहे. विरोधी पक्षाला
सातत्यानं सापत्नतेची भूमिका सत्ताधारी पक्ष घेत असतो. मग विकासाचे प्रश्न असतील, अन्य
प्रश्न असतील, विरोधी पक्षाच्या सूचना असतील आणि याला कुठेही गृहीत धरलं जात नाही म्हणून
आज आम्ही या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे.’’
कृषिमंत्री
माणिकराव कोकाटे यांना शिक्षा झाल्यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, तसंच पुण्यातल्या
लैगिंक अत्याचार प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं वक्तव्य असंवेदशील असून,
त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही, असंही
दानवे यांनी म्हटलं आहे.
****
दरम्यान, राज्यात महिला
अत्याचाराच्या घटना पाहता, कायदा सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री
देवेंद्र फडणवीस पूर्णपणे अपयशी ठरले असून, त्यांनी तत्काळ गृहमंत्रिपदाचा
राजीनामा द्यावा अशी मागणी, प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष
हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
****
सर्व पात्र
मतदारांना एकमेव एपिक क्रमांक मिळावा, यासाठी निवडणूक आयोग काम करत असल्याचं,
केंद्रीय निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. दोन वेगळ्या राज्यांमधल्या
दोन मतदारांना एकच एपिक क्रमांक दिला गेल्याचं वृत्त काही माध्यमांमधून पसरलं असल्याच्या
पार्श्वभूमीवर, आयोगानं ही माहिती दिली. मात्र, दोन मतदारांना एकच एपिक क्रमांक असला तरी या मतदारांचं नाव वेगळ्या राज्यात,
वेगळ्या विधानसभा मतदारसंघात, आणि वेगवेगळ्या मतदान
केंद्रावर नोंदवलेलं आहे. यापूर्वी मतदार नोंदणीची प्रक्रिया विकेंद्रीत असल्याने असे
क्रमांक दिले गेल्याचं, आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.
मात्र हे एपिक नंबर आयोगानेच एकाच वेळी दोन मतदारांना दिलेले असल्यास, बनावट मतदार तयार होण्याचा प्रश्न उद्भवत नाही असा खुलासाही आयोगाने केला आहे.
****
महामार्गावर
अपघातांचं प्रमाण कमी झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त
केलं आहे. ते काल मुंबईत वरळी इथं परिवहन आयुक्त कार्यालयाच्या नियोजित 'परिवहन भवन'
या इमारतीचं भूमिपूजन केल्यानंतर बोलत होते. महामार्गांवर स्वयंचलित
वाहतुक नियंत्रण यंत्रणा कार्यरत असून, अपघात कमी होण्यात या
यंत्रणेचा मोठा वाटा असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं, ते म्हणाले..
‘‘ॲक्सिडेंट
कमी करण्याकरता ज्या काही उपाययोजना केलेल्या आहेत, त्याही अत्यंत चांगल्या आहेत. विशेषतः
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर एकोणातीस टक्के आणि समृद्धीवर जवळपास पस्तीस टक्के ॲक्सिडेंट
कमी झालेले आहेत, ती खरोखर अतिशय समाधानाची बाब आहे. कारण आता लोकांच्या लक्षात आलेलं
आहे, की आपण काहीही नियम मोडला, तर इमिजीयेट कॅमेरा कॅप्चर करतोय. आणि कॅप्चर करून
जो काही आपला दंड आहे, तो आपल्या घरीच पाठवतोय. दंड होत असल्यामुळे एक दोन वेळा दंड
भरल्यामुळे लोकांच्या लक्षात येतं की आता या रस्त्यावर ऑटोमेटेड सिस्टीम असल्यामुळे
आपण कुठलंही उल्लंघन करू नये.’’
या कार्यक्रमाला
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी वाहन चालकांसाठी स्थापन
करण्यात आलेल्या, धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा
आणि मीटर टॅक्सी कल्याणकारी मंडळातर्फे, ६५ वर्षांवरील ऑटो रिक्षा
आणि मीटर टॅक्सी परवाना धारकांना 'निवृत्ती सन्मान' योजनेंतर्गत प्रातिनिधिक स्वरुपात सन्मान निधीचं वितरण करण्यात आलं.
****
बीड जिल्ह्यात
किल्ले धारूर तालुक्यात एका शेतकऱ्याने तीन गुंठे जमिनीवर अफूची शेती पिकवल्याचं निदर्शनास
आलं आहे. पिंपरवाडा, चोंडी तसंच जहागीर मोहा या तीन गावाच्या केंद्रस्थानी असलेल्या
पिंपरवाडा शिवारातल्या या शेतावर पोलिस पथकाने कारवाई करून गुन्हा दाखल केल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
आयसीसी
अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धेत काल अंतिम साखळी सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ४४
धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकांत नऊ बाद २४९
धावा केल्या. श्रेयस अय्यरने सर्वाधिक ७९ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेला न्यूझीलंडचा
संघ ४६व्या षटकात २०५ धावांवर सर्वबाद झाला. वरुण चक्रवर्तीने पाच, कुलदीप पादवने
दोन, तर हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि
रविंद्र जडेजानं प्रत्येकी एक गडी बाद केला. वरुण चक्रवर्तीने प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराचा
मानकरी ठरला.
दरम्यान, स्पर्धेच्या
अ गटातले हे दोन्ही संघ उपांत्य फेरीतही दाखल झाले आहेत. उपांत्य फेरीतला पहिला सामना
उद्या भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान, तर तर दुसरा सामना परवा
बुधवारी दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड संघांदरम्यान होणार आहे. तर येत्या रविवारी नऊ
मार्चला अंतिम सामना खेळवला जाणार आहे.
****
विदर्भ
क्रिकेट संघानं रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचं जेतेपद तिसऱ्यांदा पटकावलं आहे. काल नागपूर
इथं विदर्भ आणि केरळ संघात झालेला अंतिम सामना अनिर्णित राहिला. मात्र विदर्भानं पहिल्या
डावात केरळवर मिळवलेल्या ३७ धावांच्या आघाडीच्या बळावर जेतेपद पटकावलं.
****
केंद्र
सरकारच्या युवक कल्याण मंत्रालयाद्वारे खेलो इंडीया योजनेच्या फीट इंडीया उपक्रमांतर्गत
लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने आयोजित केलेल्या 'संडे ऑन सायकल'
उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा क्रीडा संकुलात सहायक
कामगार आयुक्त मंगेश झोले यांनी सायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवला.
****
धाराशिव
जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यातल्या चार लघुपाटबंधारे
प्रकल्पातलं पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी
कीर्ती किरण पुजार यांनी हा आदेश जारी केला. येमाई, मंगरुळ,
आरळी, केमवाडी या चार प्रकल्पांमध्ये जलसाठा जोता
पातळीच्या खाली गेल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले.
****
महाराष्ट्र
भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे काल महास्वछता अभियान राबवण्यात आलं.
छत्रपती संभाजीनगरमध्ये शेकडो नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होत ४० किलोमीटर रस्त्यांवरील
सुमारे २६४ टन कचरा संकलित केला. शहराच्या विविध परिसरासह वाळूज, बजाजनगर,
वैजापूर, पैठण आदीसह ग्रामीण भागातही हे महास्वच्छता
अभियान राबवण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment