Tuesday, 4 March 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 04.03.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 04 March 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ मार्च २०२५ सकाळी ७.१० मि.

****

एकूण स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये महाराष्ट्राचा १४ टक्क्यांहून अधिक वाटा, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अभिभाषणात राज्यपालांचं प्रतिपादन 

अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून २०२४-२५ साठी सहा हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर 

लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येला जमा होणार 

विधानपरिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी येत्या २७ मार्चला पोटनिवडणूक 

आणि

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत आज भारत - ऑस्ट्रेलिया लढत

****

एकूण स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये महाराष्ट्राचा वाटा १४ टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी सांगितलं आहे. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला काल राज्यपालांच्या अभिभाषणानं सुरवात झाली, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र हे थेट परकीय गुंतवणुकीसाठी पसंतीचं राज्य असल्याचं सांगत, दावोसमध्ये झालेल्या गुंतवणुकीची राज्यपालांनी माहिती दिली.

जालना इथं रेशीम कोष खरेदी-विक्रीसाठी खुली बाजारपेठ उभारण्याचं काम पूर्ण झालं असून, लवकरच ही बाजारपेठ शेतकऱ्यांसाठी खुली करण्यात येईल, त्यामुळे, या भागातलं रेशीम उत्पादन वाढणार असल्याचा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला. 

महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण, फास्टटॅगच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने पथकर वसुली, १० लाख युवकांना प्रशिक्षित करण्याचं उद्दीष्ट, औद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी केलेल्या उपाययोजना, वस्त्रोद्योग क्षेत्राचं बळकटीकरण आणि विस्तार, कर्मयोगी भारत कार्यक्रम, प्रधानमंत्री आवास योजना, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, अटल भूजल योजना, नमो ड्रोन दीदी आदी योजनांचा राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात उल्लेख केला.

राज्य सरकार सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी काम करत असल्याचं राज्यपालांनी नमूद केलं. 

****

विधीमंडळाचं कामकाज सुरू होताच, विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी नवीन सदस्य असलेले पैठणचे आमदार विलास भुमरे यांचा परिचय करून दिला. रणधीर सावरकर यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर आभार प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर आज सदनात चर्चा घेणार असल्याचं, अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. त्यानंतर अर्थमंत्री अजित पवार यांनी २०२४-२५ साठी सहा हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या. या पुरवणी मागण्यांवर येत्या गुरुवारी आणि शुक्रवारी चर्चा होणार आहे. 

****

विधान परिषदेत प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाचा आभार प्रस्ताव मांडला, त्यावर आज आणि उद्या चर्चा होणार आहे.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबाबतचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला असता, दोन्ही बाजूच्या सदस्यांनी गदारोळ केला. सभापती राम शिंदे यांनी, कोकाटे हे विधानसभेचे सदस्य असल्याने, त्यांच्यासंदर्भातला विषय विधानसभेत मांडणं उचित ठरेल, असं सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटे यांच्या प्रकरणी न्यायालयाचा अंतिम निर्णय आल्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं सांगितलं. 

****

दरम्यान, राज्यपालांच्या अभिभाषणातील अनेक मुद्द्यांवर काँग्रेस पक्षाने असहमती दर्शवली आहे. सरकारच्या विविध विभागांमध्ये भ्रष्टाचार होत असून, भ्रष्ट मंत्र्यांवर मुख्यमंत्री कारवाई करणार का, असा सवाल काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विचारला आहे. या सर्व मुद्यांवर सरकारला जाब विचारणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

****

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच सात मार्च रोजी सर्व लाभार्थ्यांना दिला जाईल, अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. त्या काल विधान भवन परिसरात बोलत होत्या. 

****

विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी येत्या २७ मार्चला पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगानं काल या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. १० मार्चला अधिसूचना जारी होणार असून, उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १७ मार्च आहे, तर २० मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. मतमोजणी २७ मार्चला होईल. आमशा पडवी, प्रविण दटके, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपिचंद पडळकर हे विधान परिषदेचे पाच  सदस्य, विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या जागा रिक्त झाल्या आहेत. 

****

महिला सुरक्षेसाठी राज्य परिवहन मंडळाच्या सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची सूचना, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी, विभागाच्या अधिकाऱ्यांना केली आहे. शिवसेना महिला आघाडीच्या नेत्यांनी काल उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे या मागणीचं निवेदन दिलं, ते स्वीकारत त्यावर तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश सरनाईक यांनी दिले. 

****

वेव्ह्ज शिखर परिषदेत चित्रपट निर्मितीविषयी मास्टरक्लासचं आयोजन करण्यात आलं आहे. ऍनिमेशन फिल्म मेकर्स कॉम्पिटेशन स्पर्धेच्या विजेत्यांना यात मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आयोजित केलेली वेव्ह्ज परिषद एक ते चार मे दरम्यान मुंबईत होणार आहे.

दरम्यान, याअंतर्गत प्रसार भारती आणि सारेगामा यांनी संयुक्तरित्या संगीत क्षेत्रासाठी बॅटल ऑफ बँड्स ही स्पर्धा आयोजित केली आहे. 

****

बाल संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी आणि यंत्रणांचा काल मुंबईत राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने बालस्नेही पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि जिल्हा महिला बाल विकास अधिकारी रेश्मा चीमंद्रे यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची, जयपूर इथल्या राजस्थान आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजस्थानचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती हरिभाऊ बागडे यांनी ही नियुक्ती केली.

****

छत्रपती संभाजीनगर इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात तीन दिवसीय व्याख्यानमालेला कालपासून प्रारंभ झाला. प्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव यांनी 'कबीर : संत, सुधारक आणि कवी’ या विषयावर आपले विचार मांडले. या व्याख्यानमालेत आज कोल्हापूर इथले प्रसिद्ध विचारवंत प्राचार्य सुनील कुमार लवटे यांचं ’भाषा, साहित्य आणि संस्कृती’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. 

****

दरम्यान, विद्यापीठातल्या ललित कला विभागातर्फे 'व्होकेशनल ट्रेनिंग कोर्स इन व्हिज्युअल आर्ट'ला कालपासून प्रारंभ झाला. प्र-कुलगुरू वाल्मिक सरवदे यांच्या हस्ते या प्रशिक्षण वर्गाचं उद्घाटन झालं. प्रसिद्ध छायाचित्रकार बैजू पाटील यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. 

****

लातूर जिल्ह्यातल्या सीमावर्ती भागात तादलापूर इथं पहिलं राज्यस्तरीय गावगाडा संमेलन काल पार पडलं. परिसरातल्या नागरिकांचा या संमेलनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या संमेलनात ज्येष्ठ विचारवंत मॅक्सवेल लोपीस यांनी मार्गदर्शन केलं. माणसाची निसर्गापासून झालेली फारकत दूर करण्यासाठी आता शब्दांचे शस्त्र हाती घेऊन भवताल घडवावा लागेल असं मत त्यांनी व्यक्त केलं. 

****

आयसीसी अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धेत आज उपांत्य फेरीतला पहिला सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान दुबई इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होईल. उपांत्य फेरीचा दुसरा सामना उद्या दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड संघांदरम्यान होणार असून, अंतिम सामना येत्या रविवारी नऊ मार्चला खेळवला जाणार आहे. 

****

समाज कल्याण विभागाच्या वसतीगृहातल्या मुलांची काळजी घेणं, ही संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी असून, संवेदनशीलतेनं हे काम करावं, असं आवाहन राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांनी केलं आहे. ते काल नांदेड इथं वसतीगृहांची पाहणी केल्यानंतर बोलत होते. जिल्ह्यातल्या वसतीगृहांमध्ये सुधारणेला वाव असल्याचं, लोखंडे यांनी म्हटलं आहे. 

****

छत्रपती संभाजीनगर महापालिकेतर्फे येत्या सात मार्चपासून तीन दिवस कर समाधान महाशिबीर आयोजित करण्यात आलं आहे. उपायुक्त अपर्णा थेटे यांनी ही माहिती दिली. विधी प्राधिकरण मार्फत कोर्टाच्या नोटीस मिळालेल्या मालमत्ता धारकांसाठी हे शिबीर होणार असून, या शिबीरातच कर भरण्याची सुविधा उपलब्ध असेल.

****

मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेअंतर्गत सर्व कार्यालयांमध्ये "एकाच दिवशी, एकाच वेळी महास्वच्छता अभियान" राबवण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी ग्रामपंचायतीसह सर्व कार्यालयांना महास्वच्छता अभियान राबवण्याबाबत सूचना दिल्या. 

****


No comments: