Tuesday, 4 March 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 04.03.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 04 March 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ०४ मार्च २०२ सकाळी .०० वाजता.

****

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आज मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा आपण स्वीकारला असून, पुढच्या कारवाईसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. विधीमंडळ परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते. बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातले आरोपी मुंडे यांच्या संपर्कातले असल्याचं सांगत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी देशमुख कुटुंबिय, मस्साजोग ग्रामस्थ तसंच विरोधकांकडून करण्यात येत होती.

दरम्यान, या हत्या प्रकरणाचे फोटो व्हायरल झाल्यामुळे आज नागरीकांनी बीड जिल्हा बंदची हाक दिली आहे. आमदार सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांनी या बंदला पाठिंबा दिला आहे. या प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी धस यांनी विधीमंडळ परिसरात वार्ताहरांशी बोलताना केली.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अर्थसंकल्पानंतरच्या तीन वेबिनारमध्ये सहभागी होणार आहेत. अर्थसंकल्पीय घोषणांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि त्यासाठीचे प्रयत्न अधोरेखित करण्यासाठी या वेबिनारचं आयोजन करण्यात आलं आहे. हे वेबिनार सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग - एम एस एम ई च्या वाढीसाठी उपयुक्त योजना, उत्पादन, निर्यात आणि अणुऊर्जा मोहिमा तसंच गुंतवणूक आणि व्यवसाय सुलभतेमध्ये सुधारणा या विषयावर आयोजित करण्यात आले आहेत. पंतप्रधान याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करणार आहेत. या वेबीनारच्या माध्यमातून सरकारी अधिकारी, उद्योग क्षेत्रातले मान्यवर आणि व्यापार तज्ञांना भारताच्या औद्योगिक, व्यापार आणि ऊर्जा धोरणांवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ मिळणार आहे.

****

शिक्षणाबरोबरच संशोधनावरही विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित अभ्यागत परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या. सरकारनं एका चांगल्या उद्देशानं राष्ट्रीय संशोधन फंड सुरु केला असून, उच्च शिक्षण संस्थांनी या उपक्रमाचा लाभ घेत संशोधनाला प्रोत्साहन द्यावं, असंही त्या म्हणाल्या.

****

बालकांना सुरक्षित, सक्षम आणि विकसित करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचं आवाहन, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलं आहे. बाल संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी आणि यंत्रणांचा सन्मान करण्यासाठी काल मुंबईत राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्यावतीने  बालस्नेही पुरस्कारांचं वितरण तटकरे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. राज्य बालहक्क संरक्षण आयोग अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

बालकांच्या हक्काबद्दल माहिती देणं आणि त्यांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी चिराग ॲप विकसित करण्यात आलं असूनआधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मुलांना सुर‍क्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचं, आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शाह यांनी सांगितलं.

यावेळी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपायुक्त हर्षा देशमुख, महिला आणि बालविकास अधिकारी कैलास तिडके, परभणीचे जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी जावेद शेख यांना गौरवण्यात आलं.

****

राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांनी काल दूरस्थ पद्धतीनं महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. या हक्क अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि नागरिकांमध्ये या कायद्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी व्यापक प्रचार आणि प्रसार मोहीम राबवण्याचे निर्देश श्रीवास्तव यांनी दिले.

****

राज्य सांस्कृतिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करतानाच यातून काही कौशल्य विकास करणारे अभ्यासक्रम सुरु करुन तरुणांना रोजगाराच्या नाविन्यपूर्ण संधी उपलब्ध करून कशा देता येतीलयाचा कृती आराखडा तयार करण्यात यावा, असं सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी सांगितलं. राज्याच्या सांस्कृतिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते.

****

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण-राजकोट किल्ला इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीच्या कामाला कालपासून विधिवत पूजन करून सुरुवात झाली. साधारण एका महिन्याच्या कालावधीत पुतळा उभारणीचं काम पूर्ण होईल असं शिल्पकार अनिल राम सुतार सांगितलं.

****

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं काल यवतमाळ इथं आंदोलन करण्यात आलं. कर्जमाफी, सोयाबीनला हमीभाव इत्यादी मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन केलं. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीनं कर्जमाफी आणि सोयाबीनला सात हजार हमीभाव देण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र सत्ता मिळाल्यावर त्याची पूर्तता केली नाही, असा आरोप आंदोलकांनी केला.

****

दहावी आणि बारावी परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना तसंच एन.सी.सी. स्काऊट गाईड मधल्या विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार सवलतीचे वाढीव गुण देण्यात येतात. यासाठीचे ऑनलाईन प्रस्ताव येत्या एप्रिलपर्यंत सादर करण्याचं आवाहन लातूर जिल्हा क्रीडा विभागातर्फे करण्यात आलं आहे.

****

 

No comments: