Wednesday, 5 March 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 05.03.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 05 March 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०५ मार्च २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला, मुख्यमंत्र्यावर हक्कभंगाचा विरोधकांचा इशारा

·      औरंगजेब उदात्तीकरण प्रकरणी अबू आझमींविरोधात विधीमंडळात प्रचंड गदारोळ - कठोर कारवाई करण्याची विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची सूचना

·      परभणी-छत्रपती संभाजीनगर-करंजगाव या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामाला प्रारंभ

आणि

·      आयसीसी अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताची अंतिम फेरीत धडक, उपान्त्य फेरीत ऑस्ट्रेलियावर चार गडी राखून विजय

****

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून, राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी तो स्वीकारला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधीमंडळ परिसरात माध्यमांशी बोलतांना ही माहिती दिली. मुंडे यांचा राजीनामा आपण स्वीकारला असून, त्यांना मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले..

‘‘आज राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा माझ्याकडे दिलेला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे. आणि पुढील कारवाईकरता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेलं आहे.’’

 

मुंडे यांनी वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिला असल्याचं म्हटलं आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही आपली पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात नमूद केलं.

****

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनाम्याचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे. काल नागपुरात माध्यमांशी बोलताना त्यांनी, धनंजय मुंडे यांनी शपथच घ्यायला नको होती, असं मत व्यक्त केलं,

हा राजीनामा फार आधी द्यायला पाहिजे होता. या राजीमान्यापेक्षा शपथच नाही व्हायला पाहिजे होती, तर सगळ्या गोष्टींना कदाचीत सामोरं जावं लागलं नसतं. घेणार्यांनी सुद्धा आधी घ्यायला पाहिजे होता, धनंजयनी सुद्धा आधी द्यायला पाहिजे होता. त्या परिवाराच्या, त्याच्या जीवाच्या वेदनांपुढे हा काहीही मोठा निर्णय नाही. त्यांनी तो घेतला, ते योग्यच केललं आहे. मला वाटतं देर आये, दुरुस्त आये.

****

संतोष देशमुख हत्येप्रकरणी पुरावे असूनही कारवाईला उशीर केल्याचा आरोप करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. मुंडे यांना बडतर्फ का केलं नाही असा प्रश्नही त्यांनी विचारला.

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी, मुंडे यांच्या राजीनाम्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सदनात न देता, थेट माध्यमांना देणं हा सभागृहाचा अवमान असल्याचं म्हटलं आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर हक्कभंग आणू, असा इशारा त्यांनी दिला. हे सरकार आरोपीला पाठिशी घालत असल्याचा आरोप करत, सरकारला या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी पटोले यांनी केली.

‘‘मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने धनंजय मुंडेच्या राजीमान्याबद्दलची माहिती माध्यमांना सरळ दिली, अधिवेशन चाललेलं आहे, आणि या अधिवेशनामध्ये त्यांनी सभागृहामध्ये ही माहिती द्यायला पाहिजे होती. ती माहिती दिलेली नाही. ही माहिती पुढे यायला पाहिजे होती, गृह खात्याने ती का लपवली, इथं गुन्हेगाराला सपोर्ट करण्याचं काम सरकारच करत होतं. ज्या पद्धतीने वाल्मिक कराड हा गुन्हेगार असेल, त्याची टीम असेल, तसं या सरकारला सुद्धा सहआरोपी करावं लागणार, या सरकारला जनतेला आणि आम्हाला विरोधकांना हिशोब द्यावा लागणार.’’

****

समाजवादी पार्टीचे आमदार अबु आझमी यांनी औरंगजेबाचं उदात्तीकरण केल्याचे काल विधीमंडळात तीव्र पडसाद उमटले. दोन्ही सभागृहांचं कामकाज अनेकवेळच्या तहकुबीनंतर, दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.

विधानसभेत कामकाज सुरू होताच, मंत्री उदय सामंत, गुलाबराव पाटील यांच्यासह महायुतीच्या अनेक आमदारांनी अबू आझमींविरोधात कारवाईची मागणी करत, घोषणाबाजी सुरू केल्यानं, अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कामकाज १० मिनिटांसाठी, नंतर अर्ध्या तासासाठी तहकूब केलं. त्यानंतर कामकाज सुरू होताच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून निलंबनाची मागणी केली.

‘‘वारंवार अबू आझमी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान करतो. हा अबू आझमी देशद्रोही आहे, या देशद्र्योह्याला या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार नाहीये. औरंगजेबाचे याठिकाणी गोडवे गाणं म्हणजे खर्या अर्थाने आपल्या राष्ट्रपुरुषाचा अपमान आहे. आपल्या देशभक्तिचा अपमान आहे.’’

 

विधान परिषदेत गटनेते प्रवीण दरेकर यांनी अबू आझमींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटकेची मागणी केली, सत्ताधारी बाकांवरच्या सदस्यांनी या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. गदारोळ वाढत गेल्यानं, सभापती राम शिंदे यांनी कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही अबू आझमी यांच्यासह शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणी इतरांवरही कारवाई करावी, अशी मागणी केली. सभागृहनेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अबू आझमी हे जाणीवपूर्वक वारंवार अवमानकारक वक्तव्य करत असल्याने, त्यांचा जाहीर निषेध करत कारवाईची मागणी केली. सभापती राम शिंदे यांनीही महापुरुषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या सर्वाविरोधात सरकारने कठोर कारवाई करावी, अशी सूचना केली..

‘‘छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राष्ट्रपुरुषाच्या संदर्भामध्ये अशा प्रकारचं वक्तव्य सर्रासपणे केले जातात. शासनाचा आणि विरोधी पक्षाचा दोन्ही सभागृहात सदस्यांच्या भावना तीव्र आहेत. या गोष्टी लक्षात घेऊन संबंधितावर तीव्र स्वरुपाची कारवाई करावी. फक्त पोलिसांमध्ये गुन्हे दाखल करणं हे चालणार नाही, म्हणून यासंदर्भामध्ये सक्त कारवाई शासनाने करावी.’’

 

यानंतरही गदारोळ सुरू राहिल्याने, कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं.

दरम्यान, अबू आझमी यांच्याविरोधात मुंबईत मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर औरंगजेब प्रकरणी आपलं वक्तव्य मागे घेत असल्याचं निवेदन अबु आझमी यांनी समाजमाध्यमांवरून जारी केलं.

****

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची हृदयद्रावक छायाचित्रं कालपासून प्रसारमाध्यमांवरून व्हायरल होत आहेत, या भीषण हत्याकांडाच्या निषेधार्थ काल बीड जिल्ह्यात बंद पाळण्यात आला. नागरिकांनी बीड शहरातून निषेध फेरी काढली. केज इथं टायर जाळून निषेध नोंदवण्यात आला.

जालना इथं गांधीचमन चौकात सकल मराठा समाजाच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आलं. लातूर शहरातही छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने काळ्या फिती बांधून आंदोलन करण्यात आलं.

****

परभणी इथं संविधान प्रतिकृतीच्या अवमानाची घटना आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विजय एल. आंचलिया यांची नियुक्ती केली आहे. आंचलिया यांनी काल परभणी इथं संबंधित परिसराची तसंच शहरातल्या काही दुकानांची पाहणी करुन, संपूर्ण घटनेची माहिती घेतली.

****

परभणी-छत्रपती संभाजीनगर-करंजगाव या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामाला प्रारंभ झाल्याची माहिती, दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय व्यवस्थापक नीती सरकार यांनी दिली. त्या काल छत्रपती संभाजीनगर इथल्या मुकुंदवाडी रेल्वे स्थानकाची पाहणी केल्यानंतर बोलत होत्या. मुकुंदवाडी इथं भुयारी मार्ग करण्याचा प्रस्ताव पाठवला असल्याचंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, जालना इथंही सरकार यांनी बैठक घेऊन चर्चा केली. जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानच्या स्थानकांवर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असं आश्वासन त्यांनी दिलं.

****

आयसीसी अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताने अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर चार गडी राखून विजय मिळवला. दुबई इथं झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचा संघ २६४ धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून मोहम्मद शमीने तीन, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी दोन बळी घेतले. प्रत्यूत्तरादाखल आलेल्या भारतीय संघाने ४९व्या षटकात सहा गडी गमावत हे लक्ष्य साध्य केलं. सर्वाधिक ८४ धावा करणारा विराट कोहली प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला. या स्पर्धेत उपांत्य फेरीचा दुसरा सामना आज दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड दरम्यान होणार आहे.

****

धाराशिव तालुक्यात ढोकी इथल्या संशयित बर्ड फ्लू रुग्णाचे नमुने पुण्यातल्या राष्ट्रीय विषाणू परीक्षण प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. हा अहवाल नकारात्मक आला असून, सदरील रुग्णाला बर्ड फ्लूची लागण झालेली नसल्याचं स्पष्ट झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

हिंगोली जिल्ह्याच्या औंढा तालुक्यातल्या सिद्धेश्वर धरणाचे चार दरवाजे काल एका फुटाने उघडण्यात आले. सध्या दोन हजार ५०० घनफुट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

****

शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी तसंच नुकसान भरपाई अनुदान द्यावं, यासह अन्य मागण्यांसाठी जालना काँग्रेस कमिटीच्या वतीनं काल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांना मागण्यांचं निवेदन सादर केलं.

****

लातूर शहरातल्या नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने काल घंटानाद आंदोलन करण्यात आलं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.08.2025 रोजीचे सकाळी 06.40 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 15 August 2025 Time 6.40 AM to 6.50 AM Language Marathi आकाशवाणी ...