Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 11 March 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ११ मार्च २०२५ सायंकाळी ६.१०
****
· प्रार्थनास्थळांच्या भोंग्यांबाबत नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे
निर्देश
· विधीमंडळात अर्थसंकल्पावरील चर्चेला प्रारंभ-ढासळलेली आर्थिक स्थिती अर्थसंकल्पात
प्रतिबिंबित झाल्याची विरोधकांची टीका
· मराठवाड्यात मोसंबी प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची अर्जुन खोतकर यांची मागणी
आणि
· धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगाव रेल्वेमार्ग सर्वेक्षणाला मंजुरी
****
प्रार्थनास्थळांवर भोंग्यांच्या वापराबाबतच्या
नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले
आहेत. ते आज विधानसभेत आमदार देवयानी फरांदे यांच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देत होते.
भोंग्यांची आवाजाची मर्यादा तपासणीची जबाबदारी संबंधित पोलिस निरीक्षकाकडे सोपवत असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं. अशा प्रकरणात कठोर कारवाई करता यावी, यासाठी संबंधित नियमात सुधारणा
करून देण्याची विनंती केंद्र सरकारला करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते
म्हणाले –
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस
****
गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या ना-हरकत प्रमाणपत्राशिवाय
यापुढे मद्यविक्रीच्या दुकानांना परवानगी देण्यात येणार नाही, अशी
घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. आमदार सुधीर मुनगंटीवार, राहुल
कुल, वरूण सरदेसाई यांनी दारूबंदीसाठीच्या मतदानाच्या नियमावलीत बदल करण्याची मागणी
केली. यात ५० टक्के ऐवजी ७५ टक्के मतदारांनी दारूबंदीच्या बाजूने मतदान केल्यास दारू
दुकानाची मान्यता रद्द करण्यासाठीच्या यासंदर्भातील नियमात बदल करण्याचं आश्वासनही
पवार यांनी यावेळी दिले.
****
राज्याची ढासळलेली आर्थिक स्थिती अर्थसंकल्पात
प्रतिबिंबित झाल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली
आहे. आज सदनात अर्थसंकल्पावरील चर्चेला सुरवात करताना ते बोलत होते. या अर्थसंकल्पात
जुन्या घोषणांचेच बुडबुडे असून दिशाभूल करण्यात आल्याचं दानवे यांनी नमूद केलं. ते
म्हणाले –
बाईट – अंबादास दानवे
विधानसभेतही आज अर्थसंकल्पावर चर्चेला सुरुवात
झाली. निवडणुकीच्या काळात सत्ताधारी पक्षाने केवळ आकर्षक घोषणा करत आश्वासनांचा पाऊस
पाडला, मात्र अर्थसंकल्पात याची अंमलबजावणी केली नाही, अशी टीका शिवसेना उद्धव
बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी केली. हा अर्थसंकल्प राज्याला कर्जाच्या
खाईत ढकलणारा असल्याची टीका कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. उद्योग क्षेत्रात
राज्याची पिछेहाट झाली असून एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी कुठलाही रोडमॅप
यात दिसत नाही असं ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे
नेते जितेंद्र आव्हाड यांनी या चर्चेत सहभाग घेत, या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी
काहीही नसून हा श्रीमंतांचा अर्थसंकल्प असल्याची टीका केली.
माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी या
चर्चेत बोलतांना,
विकासचक्राला गती देण्याचं काम या अर्थसंकल्पातून झाल्याचं सांगितलं.
तर जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी, विरोधकांचे आरोप खोडून काढत, कृषी, रोजगार, सामाजिक
विकास या सर्व क्षेत्रांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प असल्याचं सांगितलं. मराठवाड्यात
मोसंबी प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची मागणी अर्जुन खोतकर यांनी केली. मोसंबी रस अधिकाधिक
दिवस टिकावा,
यासाठी कृषी विद्यापीठांनी संशोधन करावं, असं
आवाहन करत,
यामुळे मोसंबीला चांगला भाव मिळेल, असा
विश्वास खोतकर यांनी व्यक्त केला. ते म्हणाले –
बाईट – अर्जुन खोतकर
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड-सोयगाव
मतदारसंघातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जल जीवन मिशनच्या प्रलंबित पाणीपुरवठा
योजना दोन महिन्यांत पूर्ण कराव्यात, असे निर्देश पाणीपुरवठा आणि
स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. आज मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत ते
बोलत होते. प्रलंबित ४८ प्रकल्पांतील ठेकेदारांवर कडक कारवाई करावी आणि काम न करणाऱ्या
ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची सूचना पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
****
छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला
पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी विधानपरिषद सभापती राम शिंदे, विधानसभा
अध्यक्ष राहुल नार्वेकर,
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री
अतुल सावे यांनीही संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं.
****
केंद्र सरकारनं उडदाच्या आयातीला ३१ मार्च
२०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यासंदर्भातली अधिसूचना आज परकीय व्यापार महासंचालनालयानं
जारी केली. उडदाच्या शुल्कमुक्त आयातीची मुदत यावर्षी ३१ मार्चला संपणार होती. देशात
म्यानमार, सिंगापूर,
थायलंड आणि ब्राझीलमधून उडदाची आयात होते.
****
सरकारी शाळांच्या शिक्षण पद्धतीत सुधार करण्याची
गरज खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केली आहे. ते आज राज्यसभेत शिक्षण मंत्रालयाच्या
कार्यपद्धतीवरच्या चर्चेत बोलत होते. जिल्हा परिषदा तसंच महापालिकांच्या शाळांमध्ये
शिक्षण मोफत उपलब्ध असून,
इंग्रजी माध्यमाच्या सीबीएसई शाळांमध्ये प्रवेशासाठी गर्दी होत
असल्याकडे पटेल यांनी लक्ष वेधलं. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या तरुणांना आपल्याच
देशात त्याच दर्जाचं शिक्षण मिळण्याच्या गरजेवर पटेल यांनी भर दिला. माजी पंतप्रधान
एच डी देवेगौडा,
काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगढी, आम
आदमी पक्षाचे संजय सिंह आदी मान्यवरांनी या चर्चेत सहभाग घेत, आपली
मतं मांडली.
****
केंद्रीय रेल्वे मंत्रालयानं धाराशिव-बीड-छत्रपती
संभाजीनगर या २४० किलोमीटरच्या नवीन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी मंजुरी दिली
आहे. यासाठी सहा कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती खासदार बजरंग सोनवणे
यांनी समाजमाध्यमांवरून दिली आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगांव या ९३
किमीच्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठीही २ कोटी ३२ लाख रूपये मंजूर झाले असून याबाबतचे पत्र रेल्वे विभागानं जारी केलं असल्याचंही सोनवणे यांनी
सांगितलं. रेल्वे मंडळाचे अध्यक्ष सतीश कुमार यांच्यासोबत या रेल्वे मार्गाची आज ॲानलाईन
पाहणी केल्याचं सोनवणे यांनी सांगितलं, हा रेल्वेमार्ग लवकरात लवकर
पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असं आश्वासनही सोनवणे यांनी
दिलं. दरम्यान,
अहिल्यानगर- बीड - परळी या रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाचे काम
पूर्ण झाले असून या मार्गाचं काम जलदगतीनं सुरू असल्याचं सोनवणे यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत एक लाखापेक्षा
जास्त रस्ते अपघातांत जवळपास ४६ हजार जणांचा मृत्यू झाला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
यांनी आज विधानसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. मद्यपान तसंच अन्य अंमली
पदार्थांचं सेवन तपासणारी यंत्रं मागवणार असल्याचं सरनाईक यांनी नमूद केलं.
****
धाराशिव जिल्ह्यात शेती व्यवसायासोबतच पर्यटन
क्षेत्रात प्राधान्यानं काम करणार असून जलयुक्त शिवार, फळबाग
लागवड, दळणवळण या क्षेत्राचा विकास करणार असल्याचं प्रतिपादन जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी
कीर्ती कुमार पुजार यांनी आज पत्रकार परिषदेत केलं. जिल्ह्यातल्या दीडशे पर्यटनक्षेत्रांच्या
ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असून यात महिला बचत गटांना
सहभागी करणार असल्याचं पुजार यांनी सांगितलं.
****
होळी आणि धुलिवंदन साजरा करताना नागरिकांनी
विद्युत सुरक्षेबाबत खबरदारी घ्यावी असं आवाहन छत्रपती संभाजीनगरच्या महावितरण विभागातर्फे
करण्यात आलं आहे. होळी पेटवताना मोकळ्या जागेचा वापर करा तसंच रंग खेळताना वीज वाहिन्या, वितरण
रोहित्रांवर पाणी फेकू नका यासारख्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन महावितरणतर्फे करण्यात
आलं आहे.
****
लातूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या
जागेसाठी आवश्यक असलेल्या तीन कोटी ३२ लाख रुपयांच्या निधीला पुरवणी मागण्यांमध्ये
मंजुरी देण्यात आली आहे. २०१३ मध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय उभारण्यास मान्यता देण्यात
आली. या रुग्णालयासाठी कृषी महाविद्यालयाची दहा एकर जागा निश्चित करण्यात आली आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या पालम तालुक्यात दिग्रस
उच्च पातळी बंधाऱ्यातून आज सकाळपासून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या
नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दिग्रस बंधाऱ्या नंतर अंतेश्वर उच्च पातळी
बंधारा आणि त्यानंतर नांदेड येथील विष्णुपुरी बंधाऱ्यात पाण्याचा प्रवाह सुरू राहणार
आहे.
****
नांदेड रेल्वे स्थानकावरील विस्तारीकरणाच्या
कामानिमित्त नांदेड ते छत्रपती संभाजीनगर एक्स्प्रेस १४ मार्च रोजी आणि परभणी ते नांदेड
एक्स्प्रेस १२,
१३ आणि १५ मार्च रोजी रद्द करण्यात आली आहे असं रेल्वे विभागातर्फे
कळवण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment