Friday, 1 May 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.05.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 01 May 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यातील जनतेशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संवाद साधला. “जगात कठीण परिस्थिती आणि आव्हानं असताना महाराष्ट्र खंबीर उभा असून २०२४-२०२५ मध्ये महाराष्ट्राने एक लाख ६४ हजार ८७५ कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक आकर्षित केली. हे प्रमाण देशात आलेल्या एकूण परकीय गुंतवणुकीच्या ३९ टक्के आहेत. यातून ४० लाख रोजगार निर्माण होईल, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील थे जोडमार्ग- मिसिंग लिंक प्रकल्पाचं लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होत आहे. यासंदर्भात, मुख्यमंत्री म्हणाले...

बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

महाराष्ट्र दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथंही पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी शिरसाट म्हणाले…

बाईट- पालकमंत्री संजय शिरसाट

****

छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातही कुलगुरु डॉक्टर विजय फुलारी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.

****

आज जगभरात 'आंतरराष्ट्रीय कामगार दिन' उत्साहात साजरा केला जात आहे. समाजाच्या आणि राष्ट्राच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या कष्टकरी वर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस समर्पित करण्यात येतो. देशाच्या आर्थिक प्रगतीचा कणा असलेल्या कामगारांच्या हक्कांचे रक्षण आणि त्यांच्या परिश्रमाचा गौरव करण्याच्या उद्देशानं आज विविध कामगार संघटनांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज लेहमध्ये जिवेत्सल इथं बुद्धपौर्णिमेनिमित्त आयोजित पवित्र अवशेष प्रदर्शनाचं उद्घघाटन करण्यात आलं. लेहमध्ये केंद्रीय बौद्ध अभ्यास संस्थेत दुग्धोत्पादन संस्थेचं भूमिपूजनही यावेळी झालं.

****

ऑनलाइन गेमिंग प्रोत्साहन आणि नियमन नियम’, आजपासून लागू झालं. भारताच्या वेगानं विस्तारणाऱ्या ऑनलाइन गेमिंग क्षेत्राचं नियमन करण्याच्या दिशेनं उचललेलं हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. नशीब किंवा कौशल्य यांच्या आधारे पैशांनी खेळल्या जाणाऱ्या ऑनलाइन खेळांवर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. अशा स्त्रोतांशी संबंधित जाहिरात आणि आर्थिक व्यवहारांवरही बंदी घालण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं स्थापना केलेली ऑनलाइन गेमिंग समिती, नियामक म्हणून काम करेल, असं सरकारनं म्हटलं आहे.

****

एकात्मिक देयक आदान-प्रदान मंच म्हणजे ‘युपीआय’, त्याचवेळी लगेचच रकमांचं हस्तांतर करणारा जगातला सर्वांत मोठं व्यासपीठ ठरलं आहे. अकरा एप्रिल २०१६ रोजी ३७३ व्यवहाराने सुरू झालेल्या ‘युपीआय’ व्यवहारात तब्बल बारा हजार पट वाढ होवून भारतात मासिक व्यवहार मार्च २०२६ मध्ये दोन हजार २६४ कोटी रुपये इतक्या उच्चांकी स्तरावर पोचले आहेत.

****

राष्ट्रीय जनगणनेला आजपासून सुरुवात झाली आहे, उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वगणना करत ठाणे जिल्ह्यातील जनगणनेचा शुभारंभ केला. या जनगणनेसाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी  केलं. यावेळी स्वगणनेसाठी असलेल्या ‘क्यूआर कोड’चं अनावरण उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झालं. त्यांनी ‘टॅब’वर हा ‘कोड’ ‘स्कॅन’ करून स्वगणना केली. १ ते १५ मे हा स्वगणनेचा कालावधी असून त्यानंतर १६ मे ते १४ जून या कालावधीत घरोघरी जाऊन जनगणना केली जाणार आहे.

****

जालना जिल्ह्यातल्या परतूर-मंठा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया याचं आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ७२ वर्षांचे होते, परतूर नगर पालिकेवर त्यांची दीर्घ काळ एकहाती सत्ता होती.

****

खेळाला प्रोत्साहन, खेळाडूंना नोकरी आणि सुविधा, विमा देण्यासाठी नवं क्रीडा धोरण आखलं जात आहे, असं उपमुख्यमंत्री तथा क्रीडामंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे. नागपूर नजीक कोराडी कामठी इथं काल सायंकाळी उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्य स्तरीय वरिष्ठ गट पुरुष -महिला कबड्डी स्पर्धेचं उद्घघाटन झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. या स्पर्धेचा येत्या चार मे रोजी समारोप होणार आहे.

****

आदी कैलास यात्रेला आजपासून उत्तराखंडमध्ये प्रारंभ झाला. यात्रेकरूंच्या सोयीसाठी प्रशासनानं पिथोडगड इथं सर्व प्रकारची सज्जता केली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.05.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 01 May 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्र...